Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

बोगस रेशनकार्ड : चौकशी करण्याचे तहसीलदारांचे आदेश
मनमाड / वार्ताहर

 

शहरात दारिद्रय़रेषेखालील नागरिकांना देण्यात येणारी बोगस रेशनकार्ड आढळत असल्याच्या तक्रारींची दखल घेत याबाबत तातडीने चौकशी करण्याचे आदेश तहसीलदार सुनील गाढे यांनी दिले. बोगस रेशनकार्ड तसेच रेशनचा काळाबाजार या प्रश्नावर रिपाइंतर्फे येवला रस्ता सुमारे अर्धा तास अडविण्यात आल्यानंतर तहसीलदारांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.
रिपाइंचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजाभाऊ अहिरे, शहराध्यक्ष गंगाभाऊ त्रिभुवन, महिला आघाडी शहराध्यक्ष पुष्पलता मोरे आदींच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते, पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनात महिलांची संख्या लक्षणीय होती. रास्ता रोकोमुळे मालेगाव व शिर्डी रस्त्यावरील वाहतूक ठप्प होऊन दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. बोगस रेशनकार्डच्या तक्रारींची दखल घेत त्यांची तातडीने चौकशी सुरू करण्यात आल्याचे तहसीलदारांनी मोर्चेकऱ्यांना सांगितले. चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्याविरूध्द कारवाई केली जाईल, अशी माहिती गाढे यांनी दिली. तसेच दारिद्र्यरेषेखालील कार्डवर रेशन व रॉकेलचा किती कोटा आहे, याची माहिती घेऊन पिवळे रेशनकार्ड गरजवंतांना तातडीने उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन शासनातर्फे देण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी विश्व पानसरे, पोलीस निरीक्षक रफीक शेख यावेळी उपस्थित होते.
मनमाड हे कामगार व हातमजुरांचे गाव आहे. शहरात अनेक दिवसांपासून रेशन व रॉकेलचा काळाबाजार सुरू आहे. शिवाय दारिद्रय़रेषेखालील बोगस रेशनकार्ड एक व दोन हजार रुपयात दिले जाते. परंतु हे कार्ड दुकानात नेल्यास ते बनावट असल्याचे उघड होते. कार्डधारकांना रेशन व रॉकेल मिळत नाही, अशी तक्रार रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ अहिरे, शहराध्यक्ष गंगाभाऊ त्रिभुवन, रऊफ मिर्झा, पुष्पलता मोरे यांनी यावेळी केली. लाभार्थ्यांना बीपीएल रेशनकार्ड त्वरित वाटप करावे, बोगस रेशनकार्डाचा तपास करून ते रद्द करावे, गरजवंताचे कार्ड अधिकृत करून द्यावे, धनदांडग्यांचे बीपीएल कार्ड रद्द करावे, बीपीएल कार्डावर किती धान्य व रॉकेल कोटा मिळतो ते जाहीर करावे, रेशनिंग व रॉकेलचा काळाबाजार करणाऱ्यांचे परवाने रद्द करावे, आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.