Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

ज्ञानवंतांची दखल घेणारी दृष्टी महत्वाची - सदानंद मोरे
मालेगाव / वार्ताहर

 

१९१३ मध्ये इतिहासकार वि. का. राजवाडे यांनी समाजातील कर्तबगारांची यादी तयार केली. त्या यादीत महात्मा फुले यांचा समावेश नव्हता, समाजाने कालांतराने त्याची दखल घेतल्याने गुणवंत, ज्ञानवंतांची दखल घेणारी दृष्टी फारच महत्वाची असते, असे विचार इतिहासाचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी येथे मामको जनकल्याण ट्रस्टतर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात मांडले.
ट्रस्टतर्फे शहर व तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या तसेच लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा कॅम्परोडवरील आय. एम. हॉलमध्ये सत्कार करण्यात आला. सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मोरे बोलत होते. विज्ञानाचे अभ्यासक व काकाणी विद्यालयाचे प्रश्न. संजय पाठक हे अध्यक्षस्थानी होते.
समाजातील ज्ञानवंत शोधण्याची प्रतिभावान दृष्टी मामको ट्रस्टकडे आहे. सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने ट्रस्टचे सुरू असलेल कार्य व राबविण्यात येणारे उपक्रम हे उल्लेखनीय आहेत. फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून गरजवंत येईल याची वाट न पाहता त्याच्या दारात ट्रस्ट स्वत: पोहचत आहे, ही बाब उल्लेखनीय आहे, असेही मोरे म्हणाले. प्रश्न. पाठक यांनी तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसाय करावा तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन उच्चपदस्थ अधिकारी बनावे, असे आवाहन केले. दूरचित्रवाहिन्यांमुळे वाचन संस्कृती लोप पावत असल्याने ती जोपासावी व संस्काराचे विद्यापीठ असलेल्या आजी-आजोबांकडे लक्ष द्यावे असे आवाहनही त्यांनी केले. संस्थापक संचालक हरिलाल अस्मर यांनी ट्रस्ट मार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक बैरागी यांनी प्रश्नस्तविक केले. व्यासपीठावर बँकेचे अध्यक्ष राजेंद्र भोसले, संचालक स्वातंत्र्यसैनिक ओंकारअप्पा लिंगायत, ट्रस्टचे उपाध्यक्ष गौतम शहा, बँकेचे उपाध्यक्ष भरत पोफळे उपस्थित होते. एव्हरेस्ट सर करणारी कृष्णा पाटील, स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेले नितीन येवला, प्रशांत पाटील, विनोद बैरागी, नाशिक विभागात बारावीत प्रथम आलेली युगंधरा घोडेगावकरसह विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये दहावी-बारावीत प्रथम आलेल्या तसेच क्रीडा क्षेत्रात विशेष नैपुण्य मिळविलेल्या गुणवंतांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
संचालक नंदूतात्या सोयगावकर रविष मारू यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सतीश कलंत्री यांनी सूत्रसंचालन केले.