Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

येवला तहसील कार्यालयावर ‘बोंबाबोंब’ मोर्चा
येवला / वार्ताहर

 

शासनाच्या जाचक अटींमुळे भटक्या, आदिवासींची पिळवणूक सुरू असून भटक्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथे तहसील कार्यालयावर ‘बोंबाबोंब’ मोर्चा काढण्यात आला. जिल्हा बँकेचे संचालक नरेंद्र दराडे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.तहसील कार्यालयापुढे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. आपण गेले दोन महिने तालुक्याचा दौरा केला. त्यावेळी भटके व आदिवासींचे प्रश्न गंभीर असल्याचे दिसल्यामुळेच शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची वेळ आली, असे दराडे यांनी सांगितले. हा समाज शासकीय योजनांपासून जाचक अटींमुळे वंचित राहात आहे. नव्याने दारिद्रय़रेषेचा सव्‍‌र्हे करून आदिवासी, भटक्या समाजाचे नाव यादीत समाविष्ट करावे, प्रत्येक गरजूला घरकुलाचा लाभ द्यावा, राहत्या जागा तसेच वनजमिनी आदिवासींच्या नावावर कराव्या व शासकीय योजनांतील निकष शिथील करून त्यांचा लाभ भटक्या व आदिवासींना विनाअडथळा मिळवून द्यावा, अशी मागणी दराडे यांनी केली. शासनाकडे वारंवार मागण्या करूनही दखल घेण्यात येत नसेल तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. योजना अमलबजावणीतील त्रुटी पाहता, शासनाने विनाअट भटक्या व आदिवासींना योजना द्याव्यात, पुरावे नसल्यामुळे ग्रामसेवक अथवा तत्सम अधिकाऱ्यांचे दाखले ग्राह्य़ धरून या समाजाला जातीचे दाखले द्यावेत, अशी मागणी मल्हार सेनेचे तालुकाध्यक्ष डॉ. सुधीर जाधव यांनी केली.
भटक्या, आदिवासींना मोफत शिक्षण देऊन शिक्षणातील दरी दूर करावी, पुरावा न घेता मतदार यादीत नाव समाविष्ट करावे, अतिक्रमण नियमित करावे, पिवळे रेशनकार्ड द्यावे आदी मागण्या भगवान चित्ते यांनी केल्या. सुभाष शिककर, सुरेश गोंधळी, अशोक मोहारे, ज्योती सुपेकर, दीप लाठे, उस्मान शेख यांचेही यावेळी भाषण झाले. तहसीलदार अनिल पवार यांना यावेळी निवेदन देण्यात आले. त्यात लक्कडकोट भागात महिलांसाठी शौचालय बांधावे, नळ, गटारी, काँक्रिटीकरणाचे काम करावे, पथदीप बसवावे, शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारण्यात यावा, हातपंप बसवावा, बेघरांना घर, जमिनी मिळाव्यात, झोपडट्टीवासियांची नावे मतदार यादीत टाकावी, दारिद्रय़रेषेखालील लोकांना पिवळे रेशनकार्ड द्यावे, लक्कडकोटमध्ये स्वस्त धान्य व रॉकेल दुकान द्यावे, पारेगाव रोड व बाजीरावनगरात गढूळ पाणी येते म्हणून नवीन पाईपलाईन टाकाव्यात, तसेच नवीन डीपी बसवावी, भटक्या विमुक्तांना जात प्रमाणपत्रे द्यावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.