Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

वनाधिकाऱ्यांच्या भूमिकेने राज्यकर्त्यांना धक्का
व्याघ्र प्रकल्प संचालकांच्या बैठकीत‘अदानी’च्या कोळसा खाणीचा विषय
चंद्रपूर, ३० जुलै/ प्रतिनिधी
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने आयोजित केलेल्या व्याघ्र प्रकल्प संचालकांच्या बैठकीत ताडोबाजवळ होणाऱ्या कोळसा खाणीचा विषय उपस्थित करू नये, असे निर्देश राज्यकर्त्यांकडून वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत अधिकाऱ्यांनी हा विषय उपस्थित करून केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री जयराम रमेश यांचे त्याकडे लक्ष वेधले, अशी माहिती आता समोर आली आहे.

तणनाशकाच्या फवारणीमुळे सोयगावात मका पीक उध्वस्त!
बुलढाणा, ३० जुलै/ वार्ताहर

धाड येथील एका कृषी सेवा केंद्रातून खरेदी केलेले धानुका कंपनीचे विंडमार सुपर या तणनाशकाची फवारणी केल्यानंतर सोयगाव येथील चार शेतकऱ्यांच्या शेतातील समारे साडेपाच हेक्टर मका पीक उध्वस्त झाल्याची तक्रार संबंधित शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे केली आहे. मका पीक उध्वस्त झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची सौदाजी रामराव बुधवत, शिवहरी नामदेव बुधवत, गणेश दिनकर बुधवत, संजय तुळशीराम बुधवत अशी नावे आहेत.

‘मान्सून बोनांझा’चा समारोप
गुल्हाने यांची निसर्गचित्रे
रसिका नागपुरे
मुंडले एज्युकेशन ट्रस्ट द्वारा संचालित सेंट्रल इंडिया स्कूल ऑफ फाईन आर्ट्सतर्फे आयोजित चित्रकार संजय गुल्हाने यांच्या निसर्गचित्रणाचे प्रदर्शन लक्ष्मीनगरातील सिस्फाच्या छोटय़ा गॅलरीत सुरू आहे. खामगावच्या दिवं. पंधे गुरुजी चित्र शिल्प कला महाविद्यालयाचे प्रश्नचार्य असलेले संजय गुल्हाने त्यांच्या निसर्गचित्रण आणि व्यक्तीचित्रणासाठी प्रसिद्ध आहेत. प्रदर्शनात विविध ठिकाणी चित्रित केलेल्या जलरंग माध्यमातील १५ कलाकृती ठेवण्यात आलेल्या आहेत. नाशिक आणि अजंठासारख्या रम्य परिसरातील जलरंगातील चित्रण हे गुल्हाने सरांच्या जलरंगावरील प्रभुत्वाची प्रचिती अगदी सहजपणे देतात.

‘नॉनस्टॉप नाटय़संगीत’ आणि ‘सरींवर सरी’
डॉ. सुलभा पंडित

स्थानिक ‘स्वराली’ संस्था गेली १६ वर्षे सातत्याने महिलांकरवी विविध कार्यक्रम रसिकांसाठी सादर करीत आहे. प्रथितयश कलाकारांशिवाय, नवोदित महिला कलाकारांशिवाय त्यांना व्यासपीठ देऊन या संस्थेचे हे सांगीतिक कार्य सुरू आहे, हे विशेष. महिलांचा वाद्यवृंद हे त्यांचे एक वेगळेपण आहे. महाराष्ट्राबाहेरही या वाद्यवृंदाने त्यांचा ठसा उमटवला आहे. वृंदवादन प्रस्तुतीबरोबर सुगम संगीताचा कार्यक्रम देण्याची या संस्थेची प्रथा आहे. केवळ हौशी महिला कलावतींनी, हळूहळू का होईना पण, सातत्य ठेवून त्यांची प्रगती सुरू ठेवली आहे.

मत्स्यबीज उत्पादनात भंडारा जिल्हा अग्रेसर
प्रतिकूल परिस्थितीत ‘मोग्राबांध’ पद्धतीने दिला हात
भंडारा, ३० जुलै / वार्ताहर
कडक उन्हाळा, शुष्क झालेले तलाव आणि पावसाचे सुमारे एक महिन्यानंतरचे आगमन अशा मत्स्यबीज उत्पादनाकरिता अतिशय भीषण प्रतिकूल परिस्थितीत, जिल्ह्य़ातील मत्स्योत्पादन करणाऱ्या १९ सहकारी संस्थांनी हिंमत न हारता १३ कोटी ९ लाख मत्स्यबीज तयार करून एक विक्रम प्रस्थापित करीत, उत्पादनात भारतात अग्रस्थान मिळवले.

वासणी प्रकल्पाच्या पाण्यामुळे पिकांचे नुकसान
परतवाडा, ३० जुलै / वार्ताहर

अचलपूर तालुक्यात वासणी, बोरगावपेठ या दोन मध्यम सिंचन प्रकल्पाचे काम सुरू आहे. या कामाकरिता शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेतजमीन शासनामार्फत संपादित केली गेली. संपादित केलेल्या शेतजमिनीचा पुरेसा मोबदला न मिळाल्याच्या तक्रारी असून या प्रकल्पाच्या सांडव्यामुळे शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या संत्री फळबागेसोबतच या हंगामात पेरलेल्या आंतरपिकांचे नुकसान झाल्याची तक्रार बोरगाव तळणी येथील शेतकरी रवींद्र नारायण जायले या शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे.

कुसुम मृत्यू प्रकरण; वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी
‘मनसे’चा आंदोलनाचा इशारा
हिंगणा, ३० जुलै / वार्ताहर
रायपूर प्रश्नथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे गॅस्ट्रोग्रस्त कुसुम रतन पवार यांचा आरोग्य केंद्रात मृत्यू झाल्याचा आरोप करून वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष अजय तायवाडे यांनी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. आठ दिवसात दोषी डॉक्टरवर कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

राज्यपालांच्या ‘औपचारिक’ दौऱ्याचे फलित काय?
न.मा. जोशी ,यवतमाळ, ३० जुलै

‘राज्यपालांच्या घटनात्मक मर्यादा सर्वसामान्य माणसांना माहीत नसल्यामुळे राज्यपालांकडून असलेल्या अपेक्षांचा जेव्हा भंग होतो तेव्हा सामान्य माणूस हकनाक व्यथित होतो’, असे मत माजी राष्ट्रपती रामास्वामी व्यंकटरमन यांनी व्यक्त केले होते. त्याचा अनुभव यवतमाळकरांनी नुकताच घेतला आहे. यवतमाळात राज्यपाल एस.सी. जमीर तीनदा येऊन गेले. त्यापूर्वी राज्यपाल एस.एम. कृष्णा यांनीही यवतमाळकरांना दर्शन दिले होते. एस.एम. कृष्णा यांचा दौरा शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी होता. या व्यथा जाणून घेतल्यानंतर सिंचनाशिवाय पर्याय नाही,

चिमूर मतदारसंघ दारूमुक्त करणार -वडेट्टीवार
महिला बचत गटाच्या मेळाव्याचे उद्घाटन
चिमूर, ३० जुलै/प्रतिनिधी
महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक क्रांती केली. त्याच माध्यमातून आता चिमूर मतदारसंघात दारूबंदी आंदोलन चालवून हा मतदारसंघ दारूमुक्त करण्याची घोषणा जलसंपदा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने येथे आयोजित महिला बचत गट मेळाव्यात ते बोलत होते.

शेतकऱ्याची आत्महत्या
वाशीम, ३० जुलै / वार्ताहर

तालुक्यातील धुमका येथील तरुण शेतकरी बबन विश्वनाथ जोजार (२८) याने बुधवारी रात्री शेतातील निंबाच्या झाडय़ाला गळफास लावून आत्महत्या केली. बबन जोजार हा बुधवारी त्याच्या बोराळा शिवारातील शेतामध्ये डवरणी करण्यासाठी गेला होता. तो रात्री उशिरापर्यंत घरी परत आला नाही. त्याचा शोध घेतला असता गुरुवारी सकाळी त्याच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास लावून त्याने आत्महत्या केल्याचे आढळले. या प्रकरणाचा तपास जमादार वासुदेव डाबेराव करत आहेत.

डायरियाग्रस्त रत्नापूरचा पाणीपुरवठा बंद
धारणी, ३० जुलै / वार्ताहर
डायरियाग्रस्त रत्नापूरला पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून आता डायरियाची लागण आटोक्यात आली आहे. दूषित पाण्यामुळे तिघांचा डायरियाने मृत्यू झाला असून तीनशेवर रुग्णांवर उपचार करण्यात आले. गेल्या आठवडय़ात रत्नापूर येथे तारा बाबल्या पटोरकर, भुरई बुडा जावरकर व रिना सुनील जावरकर या तिघांचा दूषित पाणी पिल्याने मृत्यू झाला. आणि तीनशेच्यावर आदिवासींना डायरियाची लागण झाली होती. नळातून दूषित पाणी येत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे तात्काळ पाणीपुरवठा बंद करून विहिरीचे पाणी वापरात घेणे आदिवासींनी सुरू केले होते. पाणीपुरवठा योजनांची कामे झाली नसल्यामुळे अनेक योजनातून आदिवासींना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे आरोग्य सेवा कोलमडून पडलेली आहे. आरोग्य खात्याने अनेक खेडय़ातील पिण्याच्या पाण्याचे नमुने घेतले असून हे पाणी पिण्या योग्य नाही, असे पाणीपुरवठा विभागाला कळविण्यात आल्यानंतरही पाणीपुरवठा बंद करण्यात आला.

अग्रसेन महिला समितीचा श्रावण मेळावा
गोंदिया, ३० जुलै / वार्ताहर
श्री अग्रसेन महिला समितीच्यावतीने अग्रसेन भवनात श्रावण मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्याचे उद्घाटन स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. निर्मला जयपुरिया यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून त्रिवेणीप्रसाद अग्रवाल, हेमेंद्र पोद्दार, उमा पोद्दार, अग्रसेन स्मारक समितीचे सचिव अविनाश बजाज, विजय अग्रवाल, मोहन अग्रवाल, प्रेमादेवी अग्रवाल, अलका अग्रवाल, ज्योती इसरका, राजकुमार सिंघानिया, ममता अग्रवाल आदी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. निर्मला जयपुरिया म्हणाल्या की, अशा आयोजनातून समाजातील महिलांना आपले कला, कौशल्य आणि व्यावसायिक चातुर्य दाखवण्याची संधी मिळते. स्वावलंबी होण्याची प्रेरणासुद्धा अशा आयोजनातून मिळते. अन्य पाहुण्यांचीही यावेळी भाषणे झालीत. या तीन दिवसीय मेळाव्यात महिलांद्वारे विविध गृहोपयोगी, पारंपरिक हस्तकला, सजावटीच्या वस्तू, परिधान, राखी, लोणचे, मसाले, पापड, विविध खवय्ये व्यंजन आदी स्टॉल लावण्यात आले होते. यामध्ये महिलांनी उत्साहाने भाग घेतला. श्रावणात विशेष महत्त्व असलेल्या श्रावण झोक्यांची व्यवस्थाही प्रश्नंगणात करण्यात आली होती.

जकातच्या विरोधात ९ ऑगस्टपासून आंदोलन
अकोला, ३० जुलै/ प्रतिनिधी
महापालिका क्षेत्रातील जकात रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी ९ ऑगस्टपासून विविध टप्प्यांमध्ये आंदोलन करण्याचा इशारा विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने दिला आहे.
या आंदोलनामध्ये मुंबईसह राज्यातील २३ महापालिका क्षेत्रातील व्यापारी सहभागी होणार आहेत. कोणत्याही कर न भरणे, मंत्रालयासमोर सामूहिक आत्मदहन, सत्ताधारी पक्षाला मतदान न करणे, जनजागरण मोहीम राबविणे, असे या आंदोलनाचे स्वरूप आहे. श्रावगी संकुलात पार पडलेल्या विदर्भ चेंबरच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अशोक डालमिया व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. जकातीमुळे शेतकरी व ग्राहकांना भरुदड सहन करावा लागत असून यामुळे व्यापाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचे सांगण्यात आले.

अकोल्यात शिवसेना, विद्यार्थीसेनेचे ‘रास्ता-रोको’
अकोला, ३० जुलै / प्रतिनिधी
‘सच का सामना’ ही खाजगी चॅनेलवरील मालिका बंद करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना आणि विद्यार्थीसेनेच्यावतीने गुरुवारी अकोल्यात ‘रास्ता-रोको’ आंदोलन करण्यात आले. नेहरू पार्क चौकातील वाहतूक तासभर रोखून कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला. ‘सच का सामना’ या मालिकेत विचारले जाणारे प्रश्न खाजगी आणि अभिरुचीहीन असल्याचा आरोप करीत ही मालिका बंद करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या आंदोलनामुळे नेहरू पार्क चौकातील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. शिवसेना शहरप्रमुख अतुल पवनीकर यांच्यासह विद्यार्थीसेनेचे मंगेश काळे तसेच योगेश अग्रवाल, सुरेंद्र विसपुते, सागर भारूका, अनिल शुक्ला, आदी कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

सर्वसामान्यांच्या पाठबळामुळेच जीवनात यश -खरात
चिखली, ३० जुलै/ वार्ताहर
माझ्या राजकीय व सामाजिक वाटचालीत समाजातील सर्वसामान्य माणसांचे महत्त्वपूर्ण योगदान असून त्यामुळेच आयुष्यातील विविध क्षेत्रात यश मिळाल्याचे प्रतिपादन समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष दत्ता खरात यांनी केले. खरात यांच्या ४०व्या वाढदिवसानिमित्त विविध संघटना व मित्र मंडळाच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. जन्मदिवसानिमित्त दत्ता खरात यांची पेढेतुला करण्यात आली. महात्मा फुले नागरी पतसंस्थेच्यावतीने संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश महाजन, शेख अनीस आदींनी चांदीचा रथ देऊन खरात यांचा सत्कार केला. माजी आमदार जनार्दन, काँग्रेस नेते राहुल बोंद्रे यावेळी प्रश्नमुख्याने उपस्थित होते. अजीम नवाज राही यांनी संचालन व प्रश्नस्ताविक केले तर आभार अनीस यांनी मानले.

वन जमिनीची मोजणी
देसाईगंज, ३० जुलै/ वार्ताहर
वन जमिनीचे जी.पी.एस. यंत्राद्वारे मोजणी करून प्रकरणे निकालात काढण्यात आली. देसाईगंज तालुक्यातील तलाठी कार्यालय व आमगाव ग्रामपंचायतच्या वन हक्क समितीकडे गावनिहाय एकूण ५१ प्रकरणे प्रश्नप्त झाली. वनजमिनी मोजणी करण्यासाठी नियोजित वेळी निवड निरीक्षक मंडळ अधिकारी व्ही.एच. खरवळे यांच्या नेतृत्वाखाली सन १९५४-५५ च्या जमाबंदीप्रमाणे मोठय़ा झाडांची नोंद असलेल्या एकूण २१ प्रकरणे जी.पी.एस. यंत्राद्वारे मोजणी करण्यात आली. जी.पी.एस. यंत्राद्वारे मोजणी करणारे ग्राम विकास अधिकारी पी.एस. पेशने, तलाठी, एस.टी. सुकरे, वनरक्षक रमेश घुटके, वन अधिकार समितीचे अध्यक्ष केवळराम घोरमोडे, सचिव वसंत ठाकरे, सदस्य आनंद वाढई, हिरालाल चन्न्ो, गावातील वन जमिनीचे दावेदार व गावकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

शिक्षकांचा आज मोर्चा
अंजनगावसुर्जी, ३० जुलै / वार्ताहर
उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी ३१ जुलैला शिक्षकांचा पुणे येथील शिक्षण संचालकांच्या कार्यालयावर मोर्चा जाणार आहे. मोर्चा दुपारी १ वाजता शनिवारवाडय़ावरून निघणार आहे. मोर्चात सर्व शिक्षकांनी सहभागी व्हावे, मागण्यांची पूर्तता न झाल्यास ४ ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारण्यात येईल तेव्हा सर्व शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशनचे अमरावती जिल्हाध्यक्ष प्रश्न. रमेश खाडे, सचिव शरद पुसदकर यांनी केले आहे.

बीएसएनएलची दूरध्वनी सेवा विस्कळीत
साकोली, ३० जुलै / वार्ताहर

भारत दूरसंचार निगम लिमिटेड अंतर्गत तालुक्यातील दूरध्वनी सेवा कोलमडली आहे. अनेक दूरध्वनी ग्राहकांना तसेच एसटीडी, पीसीओधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून दूरध्वनी विभाग तांत्रिक कारण समोर करून टाळाटाळ करीत आहे. भारत दूरसंचार निगम लिमिटेड अंतर्गत तालुक्यात साकोली, सानगडी व गोंडउमरी या केंद्रांतर्गत दूरसंचार सेवा आहे. दूरसंचार क्षेत्रात खाजगी कंपन्यांचा शिरकाव झाला असला तरी सामान्य नागरिक, व्यापाऱ्यांनी बीएसएनएलची दूरध्वनी सेवा सुरू ठेवली आहे. तालुक्यात आजमितीस ३ ते ४ हजार ग्राहक आहेत. सध्या तालुक्यातील दूरध्वनी सेवा गेल्या आठवडय़ापासून ठप्प आहे. ग्राहक कमालीचा त्रस्त झाला असून एसटीडी, पीसीओधारकांचा व्यवसाय मंदावला आहे. दूरध्वनी सेवा सुरळीत करून खंडित कालावधीतील बिल कमी करावे, अशी मागणी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष सुशील बनकर यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्यता मोहीम
बल्लारपूर, ३० जुलै / वार्ताहर
बल्लारपूर शहरातील उमिया मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्यता नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल, माजी जिल्हाध्यक्ष वामनराव झाडे, डॉ. आनंद अडवाले, शरद मानकर, अ‍ॅड. आय.आर. सैयद, देवेंद्र यादव, गिरीश शुक्ला, महादेवराव गेडाम आदी मान्यवर नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमास मोठय़ा संख्येने राकाँचे कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. इच्छुकांची सदस्यता नोंदणी करण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात निवडणूक लढविण्याचा निर्धार राजेंद्र वैद्य यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी त्या दृष्टीने संघटनात्मक बाबीकडे विशेष लक्ष पुरवून पक्षकार्य समाजातील दलित, शोषित, पीडित व्यक्तीपर्यंत पोचविण्याचे कार्य करावे, असे आवाहन दीपक जैस्वाल यांनी केले. संचालन गिरीश शुक्ला यांनी केले. अ‍ॅड. सैय्यद यांनी आभार मानले.

‘राखी का स्वयंवर’विरुद्ध मनसेचे अभिनव आंदोलन
अकोला, ३० जुलै / प्रतिनिधी
राखी सावंतचे गाढवाशी प्रतिकात्मक लग्न दाखवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी ‘राखी का स्वयंवर’ या कार्यक्रमाचा बुधवारी अकोल्यात निषेध केला.‘राखी का स्वयंवर’ या कार्यक्रमात सुरू असलेल्या देह प्रदर्शनाला मनसेने विरोध केला. याचा निषेध म्हणून शहरातील इन्कमटॅक्स चौकात एका गाढवाचे राखी सावंतशी प्रतिकात्मक लग्न लावण्यात आले. या अभिनव आंदोलनामुळे नागरिकांची एकच गर्दी तेथे झाली होती. लग्ना आधी गाढवाची वाजतगाजत मिरवणूकही काढण्यात आली. पंकज साबळे, राकेश शर्मा, अरविंद शुक्ला, अश्विन लोहाणा, योगेश शेळके, रवी पांडे, चेतन इंगळे, अजय पजई, प्रदीप बोबडे, कुणाल राठोड, राहुल कागे आदी या आंदोलनात सहभागी झालेत. राखी सावंतच्या देहप्रदर्शनामुळे खासगी चित्रवाहिनीवरील हा कार्यक्रम मनसेच्या टीकेचे लक्ष्य ठरला आहे.

ज्ञानदेव मानवतकर ‘आदर्श शिक्षक’
मेहकर, ३० जुलै / वार्ताहर

स्थानिक मे.ए.सो. जिजामाता माध्यमिक कन्या शाळेतील सहाय्यक अध्यापक लहूजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष पत्रकार ज्ञानदेव मानवटकर यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती आदर्श शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. हा पुरस्कार सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन औरंगाबाद येथील स्वयंसेवी सेवाभावी संस्था मातंग समाज सद्भावना मित्रमंडळाच्यावतीने देण्यात आला आहे. तसे निवड पत्र त्यांना नुकतेच प्रश्नप्त झाले असून औरंगाबाद येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहोळ्यात त्यांना २ ऑगस्टला मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

रॉकेलसाठी मारहाण; एकाला अटक
मेहकर, ३० जुलै / वार्ताहर

घरगुती वापरासाठी शिधापत्रिकेवर मिळणारे निळे रॉकेल नियमाने वितरित करा, अशी मागणी करणाऱ्या व्यक्तीला कुऱ्हाडीने व काठीने मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच जातीवाचक शिवीगाळ प्रतिबंधक कायद्यांतर्गत ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २९ जुलैच्या रात्री पार्डा गावात घडली.कडूबा शिंदे व इतर साथीदारांनी बबन क्षीरसागर याला घराबाहेर बोलावून कुऱ्हाड व काठय़ांनी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली. या घटनेची तक्रार मेहकर पोलीस ठाण्यात देण्यात आली. तक्रारी नुसार कडूबा महादू शिंदे, गणेश कडूबा शिंदे, अनंत एकनाथ तांगडे, कासाबाई कडूबा शिंदे सर्व रा. पार्डा यांच्या विरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश शिंदेला अटक करण्यात आली.

किरकोळ रॉकेल विक्रेत्याकडून अपहार; बचत गटाचा आरोप
मेहकर, ३० जुलै / वार्ताहर
मेहकर शहरातील किरकोळ रॉकेल विक्रेते व हॉकर्स शिधापत्रिका धारकांचा रॉकेल साठा परस्पर विकून अपहार करत आहेत. ग्राहकांना रॉकेल देत नाही. त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी यासह अन्य मागण्या लेखी निवेदनाद्वारे मेहकरच्या उपविभागीय अधिकारी नरेंद्र टावरे यांना मायावती स्वयंसहायता बचत गटाच्या २१ महिलांनी दिले. राज्य सरकारच्या लोकविरोधी धोरणामुळे महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव, धान्याचे भाव वाढले आहेत. याचा फटका सर्व सामान्य गृहिणींना बसत आहे. राज्य सरकारने तात्काळ महागाईवर नियंत्रण आणावे. दिवसेंदिवस तूर डाळीचे वाढत असलेले भाव लक्षात घेऊन कमी दरात स्वस्त धान्य दुकानांमार्फत वितरण करावे, मेहकर वळण रस्त्यांचे काम त्वरित सुरू करावे इत्यादी मागण्या तात्काळ मंजूर कराव्या. अन्यथा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व बेमुदत उपोषण करण्यात येईल, असे निवेदन देण्यात आले.

वसंत बोजेवार यांचे निधन
दिग्रस, ३० जुलै / वार्ताहर
‘लोकसत्ता’चे सह संपादक श्रीकांत बोजेवार यांचे वडील आणि ज्येष्ठ साहित्यिक, नाटय़ कलावंत वसंत बळीराम बोजेवार यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते ७८ वर्षाचे होते. गुरुवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन चिरंजीव, दोन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे.त्यांचे कथा व कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी नाटकातही कामे केली होती. दिग्रसचे दैवत ब्रह्मानंद स्वामी यांचे चरित्र त्यांनी लिहिले आहे. दिग्रस पालिकेत रोखपाल म्हणून त्यांनी नोकरी केली. यवतमाळ जिल्ह्य़ाच्या सांस्कृतिक चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते.

गोपीकिसन निमोदिया यांचे निधन
यवतमाळ, ३० जुलै / वार्ताहर

ज्येष्ठ समाजसेवक, नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती गोपीकिसन निमोदिया यांचे गुरुवारी निधन झाले. ते ७१ वर्षाचे होते. ‘मोक्षधाम’ येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लहान मुलांना दररोज किमान अर्धा किलो ‘चॉकलेट’ वाटणे हा गोपीकिसन निमोदिया यांचा ‘छंद’ होता, त्यामुळे त्यांना ‘चॉकलेटवाले चाचा’ याच नावाने आबालवृद्ध ओळखायचे.

पालिका कर्मचाऱ्यांचा इशारा
अंजनगावसुर्जी, ३० जुलै / वार्ताहर

राज्यातील पालिका कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू व्हावा, या मागणीसाठी ३ ऑगस्टपासून संपावर जाण्याचा इशारा पालिका कर्मचारी संघटनेने दिला आहे. संपकाळात नागरिकांच्या होणाऱ्या असुविधेबद्दल संघटनेने दिलगिरी व्यक्त केली आहे.