Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

विशेष लेख

एक होती महाराणी
एक होता राजा. त्याला होत्या तीन राण्या..! - या मिथकावर, कल्पनाविश्वातल्या गृहीतकावर आपला सर्वाचा पिंड पोसलाय..
पण एक होती महाराणी! राजेशाहीच्या राजस जीवनशैलीचं ते कल्पनाविश्व सर्व सामर्थ्यांनिशी तिनं आम्हा सामान्यांना ‘याचि डोळा याचि देही’ दाखवलं. ‘महाराणी’ हा शब्द उच्चारता क्षणी गेल्या तीन-चार पिढय़ा तरी आपल्या डोळ्यापुढे उभं राहात आलंय ते जयपूर महाराणी गायत्रीदेवी यांचं व्यक्तिमत्त्व.
ती जन्मानं राजकन्या होती, विवाहानं राणी होती, तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या दिपवणाऱ्या प्रभावानं महाराणी होती आणि राजपदं लोकशाहीत विलीन झालेल्या आजच्या काळात मृत्यूतही ती महाराणीच राहिली. कारण ती होती मूर्तिमंत राजस राजेशाही जीवनशैली!
प. बंगालजवळच्या कूच बिहार या संस्थानची ती राजकन्या होती. कूच बिहारचे महाराजा जितेंद्र नारायण आणि महाराणी इंदिरादेवी यांची कन्या. स्वत: महाराणी इंदिरादेवी या बडोदा संस्थानच्या

 

राजकन्या. महाराणी इंदिरादेवींच्या सौंदर्याचा, अभिजात अभिरुचीचा आणि आधुनिक विचारशैलीचा बऱ्यापैकी दबदबा त्या काळातही होता. गायत्रीदेवींचा जन्म २३ मे १९१९ चा. लंडनमधला. शिक्षण शांतिनिकेतन, स्वित्र्झलड आणि इंग्लंडमध्ये लंडन स्कूल ऑफ सेक्रेटरीजमध्ये झालं.
जेमतेम १९ वर्षांच्या होतात न होतात तो त्यांचा जयपूर महाराजा सवाई मानसिंह (दुसरे) ऊर्फ ‘जय’ यांच्याशी प्रेमविवाह झाला. सवाई मानसिंह आणि त्यांच्या वयात खूप मोठं अंतर होतं. सवाई मानसिंहांच्या आधीच्या दोन राण्याही होत्या, मुलं होती; पण किशोरवयीन गायत्री त्यांच्या प्रेमात पडली आणि मानसिंह बहुतेक त्या आधीच तिच्या प्रेमात पडले असावेत! एखाद्या पौराणिक कथेतच शोभावी, अशी ही प्रेमकथा गायत्रीदेवींनीच अतिशय गाजलेल्या आपल्या ‘अ प्रिन्सेस रिमेम्बर्स’ या आत्मकथनात सांगितली आहे. (आत्मकथनांची ‘फॅशन’ येऊन त्यांचा सुकाळू झाला नव्हता, त्या काळात लिहिलेल्या- शांताराम राव यांनी शब्दांकित केलेल्या - या आत्मकथनाने वर उल्लेख केलेल्या राजेशाही जीवनशैलीचं वास्तवदर्शन सामान्यांना घडवलं. अन्यथा संस्थानिकांच्या, राजेमहाराजांवरच्या कल्पित कथा-कादंबऱ्या हेच राजमहालातल्या जगाची कल्पना करण्याचं साधन असे.) एकदा त्यांच्या कुटुंबाच्या एका जयपूर भेटीनंतर महाराणी इंदिरादेवींनी त्यांना सांगितलं, की ‘जय- मानसिंह- म्हणाले, गायत्रीदेवी मोठी झाली, की मला तिच्याशी लग्न करायची इच्छा आहे.’ एवढं सांगून त्यांनी त्यावर कॉमेंटही केली, ‘असली भावुक वटवट मी यापूर्वी कधी नव्हती ऐकली!’ गायत्रीदेवींनाही ही कल्पना अविश्वसनीय अशी वाटली होती. सर्वार्थानं संपूर्ण आणि ऐश्वर्यसंपन्न आयुष्य जगणाऱ्या आणि सर्वार्थानं आपल्या कक्षेच्या बाहेर खूप दूरवर असलेल्या या पुरुषश्रेष्ठाला आपल्याविषयी असं वाटू शकतं?- किशोरवयीन राजकन्येनं स्वत:ला विचारलेला हा प्रश्न. पण त्या प्रश्नानंच एका ध्यासाचं बीज मनात रोवलं. त्याचा ध्यासच लागला. त्याच्याविषयी जे जे बोललं जाईल ते ते ऐकावं, लिहून येईल ते ते वाचावं. त्याचं दिसणं, त्याचं बोलणं, त्याचं वागणं सारं सारंच आदर्श वाटावं, एकमेव वाटावं, अशी मनाची अवस्था होऊ लागली. अगदी उषेनं अनिरुद्धाचा आणि दमयंतीनं नलाचा घ्यावा असा ध्यास. कुणालाही हा किशोरवयीन वेडेपणाच वाटला असता. पण वडीलधाऱ्यांच्या विरोधाला तो ध्यास पुरून उरला आणि सवाई मानसिंहांशी विवाह होऊन गायत्रीदेवींनी त्यांची तिसरी राणी म्हणून जयपूर संस्थानात प्रवेश केला.
तुलनेनं छोटय़ा असलेल्या कूच बिहार संस्थानातून कितीतरी मोठय़ा, अधिक प्रतिष्ठित, अधिक ऐश्वर्यसंपन्न जयपूर संस्थानात त्या आल्या. कूच बिहारचा दरबार महाराजांच्या राहत्या प्रासादातच भरत असे; पण इथे जयपूरमध्ये रामबाग पॅलेस हा राहण्याचा प्रासाद, तर दरबार आणि सारे शाही समारंभ पार पडत सिटी पॅलेसमध्ये. रामबाग पॅलेसमध्ये जरा अनौपचारिक वागलं तरी चालायचं, पडदा पाळावा लागत नसे; पण सिटी पॅलेसमध्ये जाताना मात्र पडदे लावलेल्या कारमधून जावं लागायचं आणि तिथे वावरताना आपल्या राणीपदाची शान सांभाळावी लागायची. तसंच शाही रीतिरिवाज, संस्थानातल्या कूच बिहारहून वेगळ्या अशा प्रथा-परंपरांचं पालन होतंय की नाही यावर राजघराण्यातल्याच नव्हे तर इतर स्त्रियांचंही बारीक लक्ष असे. पण गायत्रीदेवींनी पाहता पाहता ते सारं सहज आत्मसात केलं आणि ‘जयचं प्रोत्साहन नसतं तर ते आपल्याला जमलं नसतं’ असं त्याचं श्रेयही पतिराजांना देऊन टाकलं. राणीवशाच्या ‘हायरार्की’मध्ये त्यांचा क्रमांक होता तिसरा, पण त्या आल्या आणि त्यांनी जिंकलं! त्यांनी केवळ राजालाच जिंकलं असं नाही, त्यांनी जयपूर जिंकलं. आज सवाई मानसिंह यांच्या पहिल्या दोन राण्यांची नावं कुणाला आठवत नाहीत. माहीतही नाहीत. ‘जयपूर महाराणी’ म्हणताच आठवतात त्या गायत्रीदेवी. जयपूरच्या या महाराणीनं पाहता पाहता सारा देश, देशातली राजघराणी जिंकली, तिनं जग जिंकलं! भारतीय राजघराण्यांचं प्रतिनिधित्व जगात त्यांच्या प्रतिमेनं केलं- आणि जगभर गायत्रीदेवींच्या सौंदर्याचा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातल्या राजस रुबाबाचा बोलबाला झाला. इंग्लंडच्या राजघराण्याशी मैत्रीचे संबंध दृढ झाले. युरोपीय राजघराण्यांशी मैत्री जुळली. ब्रिटिश आणि अमेरिकन नियतकालिकांना त्यांच्याविषयी सतत कुतूहल असे- हे ‘पेज थ्री’ संस्कृती भारतात बोकाळली त्याही आधीपासूनचं घटित! ही होती गायत्रीदेवींच्या व्यक्तिमत्त्वाची किमया. जयपूरच्या परंपरानिष्ठ राजघराण्याला, संस्थानाला आपलंसं करतानाही महाराणीनं आपल्या आधुनिक विचारांना आणि जीवनशैलीला मुरड नाही घातली. महाराजांची साथही मिळाली. महाराणी महाराजांची खऱ्या अर्थानं सहधर्मचारिणी, सहचरी म्हणून जगल्या. मानसिंह जगातल्या उत्कृष्ट पोलो खेळाडूंपैकी एक होते. महाराणी पोलो आणि गोल्फमधल्या दर्दी होत्या. देशातले आणि इंग्लंडमधले पोलोचे सामने कधी त्यांनी चुकवले नाहीत. शिकार हा शाही शौक त्या करीत. मोटारगाडय़ांची जुनी मॉडेल्स जमवणं हा त्यांचा छंद प्रसिद्ध होता. ‘व्होग’ या नियतकालिकानं तर जगातल्या सर्वात सुंदर दहा स्त्रियांमध्ये त्यांची जाहीर गणती केली होती. (त्या सूचीतली दुसरी भारतीय होती लीला नायडू.) गायत्रीदेवींची पोषाखातली, दागदागिन्यातली चोखंदळ निवड हे उच्चभ्रू समाजापुढचं ‘रोल मॉडेल’ ठरल आणि त्यातलं अभिजातपण असं की, उतारवयातही त्याच्या ‘ग्रेस’सहित ते ‘रोल मॉडेल’ म्हणून शेवटपर्यंत अगदी शिरोधार्य केलं गेलं. अभिनेत्री रेखा हे बॉलिवूडमध्ये डौलदार व्यक्तिमत्त्वाचं असं रोल मॉडेल मानलं गेलंय. स्वत: रेखानं महाराणी गायत्रीदेवींच्या आपल्यावर पडलेल्या प्रभावाविषयी सांगितलंय. ‘गंगा की सौगंध’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जयपूरला गेलेली असताना आणि जयपूरच्या प्रासादात वास्तव्य करीत असताना तिला महाराणींचा सहवास लाभला. गायत्रीदेवींच्या पतिप्रेमानं ती प्रभावित झाली. लोकांमध्ये वावरताना त्यांचा जो आब असे तो केवळ एखाद्या महाराणीतच असू शकतो, असं रेखा म्हणते आणि त्यांच्या सामाजिक कार्यापुढे नतमस्तक होते. श्याम बेनेगल यांच्या ‘जुबैदा’मध्ये रेखानं साकारलेल्या महाराणी मंदिरादेवीवरचा गायत्रीदेवींचा प्रभाव न लपणारा आहे.
राजघराण्याचा पारंपरिक आब जपतानाच गायत्रीदेवींच्या रूपानं जयपूरच्या राजघराण्यात आधुनिकतेचं वारं शिरलं. स्त्रियांना पडदा प्रथेच्या सीमा ओलांडायला उद्युक्त करण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम केले. मुलींसाठी, विशेषत: अभावग्रस्त मुलींसाठी शाळा सुरू केली. महाराणी गायत्रीदेवी स्कूल आणि सवाई मानसिंह विद्यालयाची स्थापना केली. हे सर्व घडवलं जात असताना पारंपरिक राजपरिवारात या राणीला विरोधाला, धुसफुशीला, टीकेला आणि मनस्तापाला तोंड द्यावं लागलंच नाही, असं नाही. वेदना चुकणं शक्यच नव्हतं. पण गायत्रीदेवींच्या जगण्यात, वावरण्यात त्या वेदनेचा आविष्कार त्यांनी जगाला कुठे जाणवू दिला नाही- हे त्यांचं ‘महाराणी’पणच! कळत नकळत इतर भारतीय राजघराण्यातल्या स्त्रियांपुढे त्यांचा आदर्श उभा राहिला नसता, तरच नवल! त्यांचं अनुकरण करण्याचा मोह झाला नसतातरच नवल! देश स्वतंत्र झाला आणि संस्थानं भारतीय प्रजासत्ताकात विलीन झाली. महाराणींच्या जीवनातलं हे खूप मोठं स्थित्यंतर. परंतु त्या स्थित्यंतरानंही त्यांचा आब झाकोळून गेला नाही, तो सतत काळाच्या गतीबरोबर चालण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे. सत्ताधारी असला, तरी काँग्रेसशी तडजोड त्यांनी केली नाही. चक्रवर्ती राजगोपालचारी यांच्याबरोबरीने स्वतंत्र पार्टीची स्थापना केली, १९६२ मध्ये निवडणुकीला उभ्या राहिल्या आणि विक्रमी बहुमतानं निवडूनही आल्या. त्यांच्या या विक्रमी बहुमताची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये झाली! लोकशाहीत त्यांना मिळालेलं हे बहुमत म्हणजे मतदारांच्या मनातल्या ‘महाराणी’च्या अस्तित्वाची ग्वाही होती. त्यानंतरही १९६७ आणि १९७१ अशा दोन वेळा त्या लोकसभेवर निवडून गेल्या. १९७० साली महाराजा सवाई मानसिंहांचा पोलो खेळताना मृत्यू झाला. तेव्हा त्यांचे पुत्र भवानीसिंह महाराज झाले. पद्मिनीदेवी महाराणी झाल्या. परंतु ‘राजमाता’ गायत्रीदेवींचा जनमानसावरचा प्रभाव कमी झाला नाही. १९७० साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संस्थानिकांचे तनखे, राजेशाहीची द्योतकं असलेली बिरुदं, पदं रद्द केली. आधीच विलीन झालेल्या संस्थानांचे अधिपती राजे-महाराजे ‘सामान्य जनता’ झाले. राजेशाहीची उरलीसुरली रया ओसरली. तरी जयपूरच्या महाराणीचा आब कमी झाला नाही. पुढे आणीबाणीला विरोध केल्यामुळे महाराणींनी पाच महिने तिहार जेलमध्ये तुरुंगवासही भोगला. (त्यावेळी त्यांच्याबरोबरच ग्वाल्हेर राजमाता विजयाराजे शिंदेही होत्या.) परंतु राजपद हे केवळ ऐश्वर्यानं आणि अधिकारानंच सिद्ध होत नसावं! ऐश्वर्यहीन, वनवासी राजा हा तरीही ‘राजा’च राहतो, असं आपली पुराणं, आर्ष महाकाव्यं सांगत आली आहेत. त्याचा प्रत्यय म्हणून आजच्या काळात आपसूक बोट उठतं ते गायत्रीदेवींच्या दिशेनं. १९७६ नंतर त्यांनी देशाच्या राजकारणातून संन्यास घेतला. याच काळात लिहिलेल्या त्यांच्या आत्मकथनाने जगभर पुन्हा एकदा गायत्रीदेवींच्या नावाची द्वाही फिरवली. उत्तरायुष्य त्यांनी जयपूरच्या रामबाग पॅलेस परिसरातल्या त्यांच्या ‘लिली पूल’ या निवासस्थानी, कधी लंडन, कधी कोलकात्यात तर कधी दिल्लीत समाधानानं घालवलं. ९० वर्षांच्या आयुष्यात गायत्रीदेवींनी युगांतर अनुभवलं. राजेशाहीचं प्रजातंत्रात विलीनीकरण हा व्यक्तिगत अनुभव घेतला. देशाची जीवनशैली आमूलाग्र बदलताना पाहिली. आज लोकशाहीतही, ‘जनतेच्या राज्या’तही नवे ऐश्वर्यसंपन्न निर्माण होताना आपण पाहात असतो. आकाशाच्या पोटात सुरा खुपसण्याच्या आविर्भावात उभे राहणारे टॉवर आहेत, भूखंडांचे दिग्विजय गाजवत निघालेले ‘नवे राजे महाराजे’ आहेत, स्वत:चे पुतळे उभारणाऱ्या ‘नव्या महाराण्या’ आहेत. आणि तरीही.. एक युगान्त झालेला आहे. वर्तमानपत्रवाले जेव्हा तेव्हा ‘युगान्त झाल्या’चं जाहीर करायला उत्सुक असतात, हे मान्य. पण एक युग खरोखरीच संपलं आहे. कारण एक संपूर्ण जीवनशैलीच अस्ताला गेली आहे. अखेरच्या महाराणीबरोबर!
रेखा देशपांडे

गीतारहस्य : सात्त्विक कर्मयोगाचे तत्त्वज्ञान
लोकमान्य टिळकांनी लिहिलेला ‘गीता रहस्य’ अथवा ‘कर्मयोग शास्त्र’ हा ग्रंथ म्हणजे शंकराचार्याच्या ‘गीता भाष्या’नंतर हजार वर्षांनी गीतेवर लिहिलेला मोठा ग्रंथ होय. हा ग्रंथ टिळकांनी १९१०-११ सालच्या हिवाळ्यात लिहिला व तो १९१४ ला तुरुंगातून सुटल्यावर १९१५ च्या जूनमध्ये प्रसिद्ध केला. पण गीता टिळकांच्या मनात खऱ्या अर्थाने ठसली ती १८७२ साली. ‘गीता रहस्य’च्या प्रस्तावनेत म्हटले आहे की, लोकमान्यांचे वडील मृत्युशय्येवर असताना त्यांना ‘भाषाविवृत्ती’ ही प्राकृत गीता ते वाचून दाखवित. त्या वेळी टिळक १६ वर्षांचे होते. वाचन करत असताना त्यांच्या मनात शंका निर्माण झाली की ‘युद्धविन्मुख’ झालेल्या अर्जुनास त्याच युद्धास प्रवृत्त करण्यासाठी सांगितलेल्या गीतेत ब्रह्मज्ञानाने किंवा भक्तीने मोक्ष कसा मिळवावा याचे विवेचन कशाला? या शंकेचे समाधान होण्याकरिता त्यांनी वाचनाचा प्रवास कसा केला हे पाहणे उद्बोधक आहे. त्यांनी गीतेवरची संस्कृत परीक्षणे व भाष्ये पाहिली, तसेच इंग्रजीमध्ये केलेली विवेचने वाचली. परंतु त्याने त्यांचे समाधान झाले नाही. मग टिळकांनी स्वतंत्र बुद्धीने विचारपूर्वक गीतेची पारायणे केली तेव्हा ‘योग’ हा शब्द ‘कर्मयोग’ या अर्थी उपयोगात आलेला आहे असा बोध झाला व त्यानंतर महाभारत, उपनिषद, वेदान्त सूत्रे व वेदान्तावरील इतर ग्रंथ वाचून गीतेचे अंतिम तात्पर्य कर्मयोगपर आहे हे त्यांचे मत दृढ झाले. ते लिहून काढायचे असे त्यांनी ठरविले. गीता रहस्यात सर्वप्रथम अर्पण पत्रिका, प्रस्तावना, विषय प्रवेश, कर्म जिज्ञासा, कर्मयोग शास्त्र, अधिभौतिक सुखवाद, सुख-दु:ख विवेक, अधि-दैवत पक्ष व क्षेत्रक्षेत्रज्ञ विचार, सांख्य शास्त्र, विश्वाची उभारणी व संहारणी, अध्यात्म, कर्मविपाक व आत्मस्वातंत्र्य, सिद्धावस्था व व्यवहार, संन्यास व कर्मयोग, भक्ती मार्ग, गीताध्याय संगती व शेवटी १५ वे प्रकरण उपसंहार अशी रचना आहे. ही १५ प्रकरणे गीतार्थ विवेचनाची आहेत. त्याला टिळकांनी अंतरंग परीक्षण असे म्हटले आहे तसेच त्यांनी गीतेचे बहिरंग परीक्षणही केले आहे. नंतर गीतेच्या संपूर्ण ७०० श्लोकांचे मराठीत भाषांतर केले आहे. पहिल्या १५ प्रकरणांना त्यांनी ‘रहस्य विवेचन’ असे म्हटले आहे. यातील निष्काम कर्मयोग या शब्दाचा अर्थ फलोद्देशविरहित कर्म असा नसून त्या कर्माच्या फलावर आसक्ती नसणे असा आहे व ही आसक्ती सोडणे म्हणजेच निष्काम- कर्म होय. गीता रहस्य हा ग्रंथ टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात लिहिला. संपूर्ण ग्रंथ त्यांनी स्वहस्ते शिसपेन्सिलीने ३।। महिन्यांत लिहिला. वास्तविक टिळक ‘केसरी’तील लेख लेखनिकाकडून लिहून घेत असत. तसेच त्यांचे इंग्रजी ग्रंथ ‘ओरायन’ व ‘आक्र्टिक होम इन द वेदाज्’ हेही ग्रंथ लेखनिकाकडून लिहून घेतलेले असे आहेत. या पाश्र्वभूमीवर त्यांनी गीता रहस्य स्वत:च्या हाताने तोही एवढय़ा कमी अवधीत लिहिण्याचा पहिलाच प्रसंग. पहिली आठ प्रकरणे त्यांनी ३० दिवसांत लिहून काढली यावरून त्यांची लिहिण्याची गती लक्षात येते. गीतेच्या तत्त्वज्ञानाची पाश्चात्य तत्त्वज्ञानाशी तुलना करून गीतेचे तत्त्वज्ञान किंवा कर्मयोग कसे श्रेष्ठ आहे हे सांगितले आहे. पाश्चात्यांचा कर्मयोग गीतेच्या परिभाषेप्रमाणे राजस तर गीतेचा कर्मयोग सात्त्विक असा भेद आहे.
विनायक रामकृष्ण जोशी