Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

विविध

बंदी घातलेल्या ‘घोडय़ां’ची पाकिस्तानात बेलगाम दौड!
इस्लामाबाद, ३० जुलै/पी.टी.आय.

पाकिस्तानमध्ये सबमशिनगसह बंदी घातलेली हजारो शस्त्रास्त्रे अवैधरित्या परवाने देऊन वितरित करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या घोटाळ्यामुळे पाकिस्तान सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या विविध भागांमध्ये केलेली घुसखोरी व चालविलेल्या कारवायांमुळे पाकिस्तान सरकार आधीच हैराण झाले आहे. त्यातच वायव्य सरहद्द प्रांतातून तालिबानी दहशतवाद्यांना हुसकावून लावण्याकरिता पाकिस्तानी लष्कराने याआधीच कारवाई सुरू केली आहे.

ओमर यांनाच मुख्यमंत्रीपदी राहण्याचा राज्यपालांचा आदेश
नवी दिल्ली, ३० जुलै/वृत्तसंस्था

जम्मू आणि काश्मीरमधील ‘सेक्सस्कॅण्डल’मध्ये ओमर अब्दुल्ला सामील असल्याच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही, असे स्पष्ट करीत राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी त्यांनाच मुख्यमंत्रीपदी कायम राहण्याचा आदेश दिला आहे. पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीचे नेते मुफ्ती महम्मद सईद यांनी ओमर यांच्यावर केलेला आरोप खोटा आहे, असेही विधान राज्यपालांनी केले. आपण केंद्रीय गृहखात्याशी चर्चा केली असून ओमर यांचा त्यात दूरान्वयानेही संबंध नाही, असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे व्होरा म्हणाले.

मायदेशी परतण्यासाठी प्राण तळमळला..
लंडन, ३० जुलै / वृत्तसंस्था

वर्षअखेरीस आपला आगामी चित्रपट सर्वासमोर आणण्यासाठी चित्रकार एम. एफ. हुसेन सज्ज आहेत. मी भारतात परतण्यास उत्सुक आहे, परंतु त्यासाठी अजून वेळ लागेल, असे हुसेन यांनी सांगितले. ९४ वर्षांच्या हुसेन यांनी आतापर्यंत ‘थ्रू द आइज ऑफ पेन्टर’ (१९६७), ‘गज गामिनी’ आणि ‘मीनाक्षी : अ टेल ऑफ थ्री सिटीज’ अशा तीन चित्रपटांची निर्मिती केली आहे. सध्या दुबई आणि लंडननिवासी असलेले हुसेन म्हणतात की, भारतात परतण्याचे स्वप्न मी नेहमी पाहात असतो.

तांदूळ निर्यात ‘घोटाळ्या’वरून विरोधकांचा सभात्याग
नवी दिल्ली, ३० जुलै/खास प्रतिनिधी

काही खासगी कंपन्यांच्या माध्यमातून आफ्रिकन देशांना करण्यात आलेल्या गैरबासमती तांदळाच्या निर्यातीत अडीच हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून या प्रकरणाची सीबीआय किंवा संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करीत आज लोकसभेत विरोधकांनी सभात्याग करून केंद्रातील युपीए सरकारचा निषेध नोंदविला.

तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष गैरव्यवहारप्रकरणी निलंबित
व्यवसायशिक्षणाला दणका
नवी दिल्ली, ३० जुलै/वृत्तसंस्था

अभियांत्रिकी-वैद्यकीय, व्यवस्थापनासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी-पालकांची लूट केली जात असल्याची समाजभावना दृढ झाली असतानाच केंद्रीय गुप्तचर विभागाने व्यवसायशिक्षणाला आज दणका दिला. देशातील व्यावसायिक शिक्षणसंस्थांचे नियंत्रण करणाऱ्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) या सर्वोच्च संस्थेचे अध्यक्ष आर. ए. यादव यांना भ्रष्टाचारप्रकरणी काल निलंबित करण्यात आले.

वसंत बोजेवार यांचे निधन
दिग्रस, ३० जुलै / वार्ताहर

ज्येष्ठ साहित्यिक, नाटय़ - कलावंत वसंत बळीराम बोजेवार यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. ‘लोकसत्ता’चे सहसंपादक श्रीकांत बोजेवार यांचे ते वडील होत. गुरुवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांचे कथा व कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. दिग्रसचे दैवत ब्रह्मानंद स्वामी यांचे चरित्र त्यांनी लिहिले आहे. दिग्रस पालिकेत रोखपाल म्हणून त्यांनी नोकरी केली. यवतमाळ जिल्ह्य़ाच्या सांस्कृतिक चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते.

जळगाव ‘तरुण भारत’चा उद्या तपपूर्ती सोहळा
जळगाव, ३० जुलै / वार्ताहर

येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक ‘तरूण भारत’चा तपपूर्ती सोहळा येत्या १ ऑगस्ट रोजी ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक सुधीर जोगळेकर आणि ज्येष्ठ पत्रकार तसेच खासदार भारतकुमार राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. येथील ला. ना. विद्यालयाच्या भय्यासाहेब गंधे सभागृहात दुपारी साडे तीन वाजता हा कार्यक्रम होईल.जळगाव तरुण भारतच्या गेल्या १२ वर्षांतील वाटचालीचा आढावा घेणारा तपपूर्ती विशेषांकही या निमित्ताने प्रसिद्ध करण्यात येणार असून त्याचे प्रकाशन जोगळेकर यांच्या हस्ते होणार आहे. संस्थेच्या आजवरच्या वाटचालीत मोलाचे योगदान देणारे सहकारी, हितचिंतक तसेच मान्यवरांचा सत्कार राऊत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता तरुण भारतच्या गोलाणी मार्केट परिसरातील कार्यालयात स्वागत समारंभ आणि चहापानाचा कार्यक्रम होणार असून यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानने केले आहे.

गायत्रीदेवी पंचत्वात विलीन
जयपूर, ३० जुलै/पीटीआय

जगातील सवरेत्कृष्ट दहा सौंदर्यवतीच्या ‘व्होग’ मासिकाने तयार केलेल्या यादीमध्ये स्थान मिळविणाऱ्या आणि देशाच्या राजकारणात एकेकाळी सक्रिय भूमिका बजावलेल्या राजमाता गायत्रीदेवी यांच्या पार्थिवावर जयपूर येथील महाराणी की छत्री या स्थानी आज सायंकाळी अंतिम संस्कार करण्यात आले. राजमाता गायत्रीदेवी यांचे सावत्र पुत्र ब्रिगेडिअर भवानीसिंग व जयसिंग यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नि दिला. गायत्रीदेवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी आरएसीच्या जवानांनी हवेत गोळीबाराच्या फैरी झाडून त्यांना सलामी दिली. यावेळी लष्करप्रमुख जनरल दीपक कपूर यांनीही गायत्रीदेवी यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहिले.

पैशासाठी मित्रांनीच केला खून
नवी दिल्ली, ३० जुलै / पी.टी.आय.

कर्जबाजारी युवकाने खंडणीसाठी मित्राचे अपहरण करून त्याचा खून केल्याचे उघडकीस आल्याने राजधानी दिल्ली हादरली आहे. या प्रकरणात पोलिसांनी वेळीच हालचाली केल्या असत्या तर अपहृत रिभू चावला या १७ वर्षांच्या विद्यार्थ्यांचे प्राण वाचू शकले असते, असा आरोप शोकाकूल आप्तांनी केला आहे. मात्र, पोलिसांनी या आरोपाचा इन्कार केला असून सोमवारपासून दीडशे पोलीस या अपहरणाचा छडा लावण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्नशील होते, असा दावा केला आहे. रिभूच्या वडिलांकडे ६० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. त्यापैकी १५ लाख रुपये देऊनही रिभूची अत्यंत निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह रस्त्यावर फेकून देण्यात आला. या प्रकरणात चार अपहरणकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

मेट्रो रेल्वे अपघात : अबतक १००
नवी दिल्ली, ३० जुलै/पी.टी.आय.

वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या दिल्ली मेट्रो रेल्वेच्या उभारणी दरम्यान आतापर्यंत १०० जणांचे बळी गेले आहेत. यापैकी ९३ जण हे या प्रकल्पाच्या उभारणीतील अभियंते आणि मजूर असल्याचे उघड झाल्याची माहिती शहर विकासमंत्री जयपाल रेड्डी यांनी आज राज्यसभेत दिली. १९९८ मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाचे काम तब्बल ११ वर्षे सुरू आहे. या उभारणीत किरकोळ दुर्घटनाही झाल्या असल्या तरी १२ जुलैच्या दुर्घटनेत सर्वाधिक बळी गेल्याचे रेड्डी म्हणाले. सेवारत असताना मृत्यू झाल्यास वारसांना नोकरी देण्याचे धोरण दिल्ली मेट्रो महामंडळाकडे नसल्याचेही रेड्डी यांनी यावेळी सांगितले.

गिलानींकडून मनमोहन सिंग यांची प्रशंसा
इस्लामाबाद, ३० जुलै/पीटीआय

पंतप्रधान मनमोहन सिंग यांची मुत्सद्देगिरी आणि शांतता व विकासाच्या दिशेने धाडसी पावले उचलण्याची त्यांची दृष्टी याविषयी पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांनी प्रशंसोद्गार काढले आहेत. उभय देशांत शांततेसाठी चर्चा हाच मार्ग असल्याचे ते म्हणाले.