Leading International Marathi News Daily
शनिवार, १ ऑगस्ट २००९
  एक रिकामी जागा!
  समस्या नीट समजून घ्या
  हा कॅन्सर टाळता येतो..
  पण बोलणार आहे!
कुडियोंका है जमाना!
  मी समर्थ...
मूल, चूल आणि मी
  प्रतिसाद
  मैत्री सर्वाशीच करावी..
  नकाराचा स्वीकार
  जबाबदार तरुणाई
  दुहेरी नाव, एक नावाडी!
  चिकन सूप...
लहानसा काळा डबा
  'ति'चं जग
ब्लॉगवरच्या गप्पा
  सृजनतेचा गौरव
  पाकशास्त्र पुराण!
  आषाढपाटी
  आंतरराष्ट्रीय तिठ्ठा
  चेरी पिकिंग एक अनोखा अनुभव

 

सृजनतेचा गौरव
२ ऑगस्ट २००९ रोजी कविवर्य पु. शि. रेगे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या काव्याचा थोडक्यात आढावा घेणारा हा लेख.
स्त्रीहा अनेक कवींच्या, लेखकांच्या काव्याचा विषय असतो, पण कविवर्य पु. शि. रेगे यांच्या कवितेचे वेगळेपण म्हणजे स्त्री हा त्यांच्या काव्याचा एकमेव विषय होता. जीवनात ज्या ज्या रूपात स्त्री भेटते ती माता, पत्नी, प्रेयसी, मुग्धा, बाला, सर्वसामान्य स्त्री अशी सर्वच रूपे त्यांच्या काव्यातून त्यांनी रेखाटली आहे, पण रेगे यांना खरे आकर्षण आहे ते म्हणजे स्त्री देहाचे.
युगानुयुगीची विलोभन शक्ती
एकवटून उधळली जणू
तपोनिधी श्रीनारायणाने
युगानुयुगीची स्वप्नबीजे रे
हिच्यात आहेत सामावलेली
चाळविते ही म्हणून ऐसी
अशी त्यांची भावना आहे. विश्वातील चैतन्यमयी सृजनशक्तीचे एक उत्कट रूप म्हणजे स्त्री, असे त्यांना वाटते. या सृजनशक्तीलाच ते ‘जीवनोत्सुकता’ किंवा 'passion of life' असे म्हणतात. या सृजनशक्तीची सांगड स्वाभाविकपणे

 

ते स्त्रीशक्तीशी घालतात. ही स्त्री विश्वाचे शांत, संपूर्ण आनंदमय असे शक्तिपीठ आहे. अर्थात रेगे आदर्श देवता स्वरूपात तिचे दर्शन घडवीत नाहीत तर नैसर्गिक पातळीवर एक भावभावना असणारी मानुषी असेच तिचे स्वरूप त्यांना भावते. ही सृजनशक्ती जीवनात विविध रूपाने वावरते आणि त्यांच्या कुतूहलाचे विषय बनते. हे कुतूहल, स्त्रीदेहाची वाटणारी ओढ ही त्यांच्या काव्यनिर्मितीची प्रेरणा आहे.
उत्पत्ती, स्थिती आणि लय हे सृष्टीच्या निर्मितीचे तीन घटक आहेत. सृष्टिचक्राचे रहस्य उत्पत्तीतून सुरू होते. या उत्पत्तीमागील आदिम प्रेरणा म्हणजे शृंगार. रेग्यांची कविता या रूपात रमते. शृंगाराच्या प्रेम व विरह या दोन रूपांत ती हेलकावे खाताना दिसते. आपल्या कवितेविषयी रेगे म्हणतात, ‘‘वास्तविक पाहता काव्याचे दोनच विषय संभवतात. पहिला सृजन. यातच प्रेम, शृंगार, करुणा यांचा अंतर्भाव होतो. दुसरा मरण. माझी प्रकृती सध्या तरी पहिल्याच विषयाशी अधिक मिळतीजुळती आहे.’’ हे प्रेमही कसे, तर नैसर्गिक, मुक्तपणाने अनुभवावे असे. अगदी शारीर पातळीवरील प्रेमही त्यांना मोकळेपणाने अनुभवावे असे वाटते. या दृष्टीने त्यांची ‘तू हवीस यात न पाप’ ही कविता पाहावी.
तू हवीस यात न पाप;
पण हवी असताना
नसावीस तू, नकोच तू, नाहीस तू
छे छे पापच तू
यातच पाप
तू हवीस यात न पाप
प्रेमातील बंधनांना, सामाजिक रूढी, संकेत यामध्ये अडकून कृतक् , कृत्रिम वाटणाऱ्या, ठरणाऱ्या प्रेमाला रेगे नाकारतात. यातून त्यांचा स्त्री शरीराविषयीचा निकोप आणि निर्भेळ दृष्टिकोन व्यक्त झाला आहे.
रेग्यांच्या कवितेतील स्त्री ही ‘उपभोगाचा’ विषय म्हणून येते, असा आक्षेप त्यांच्या कवितेवर घेतला गेला. स्त्री देहाचे आकर्षण व त्यातून होणारे तिच्या शरीराचे दर्शन यामुळे हा आक्षेप घेतला गेला. तिच्या उरोजाचे उभार, वक्षाचे, ओतीव काशाच्या मांडय़ांचे सविस्तर व मुक्तपणे वर्णन त्यांनी केले. त्यामुळेच
‘लंपट ओले वस्त्र होऊनी
अंग अंग तव लिंपुन घ्यावे
हुळहुळणारे वस्त्र रेशमी
होऊन वर वर घोटाळावे’
अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. पण रेग्यांच्या कवितेचे वैशिष्टय़ म्हणजे ती स्त्री-शरीराचे वर्णन करताना त्यात गुंतून पडत नाही. प्रेम, आसक्ती, अनासक्ती व ताटस्थ अशा वळणाने तिचा प्रवास चालू राहतो. या दृष्टीने ‘शेवगा’
ही कविता त्यांच्या प्रेमाचे वैशिष्टय़ स्पष्ट करते.
दोन प्रहर, निवान्त सारे
श्रमभाराने बाजेवरती
पांगुळलेली तू
खिडकीबाहेर ढाळितो चवरी
आसुसलेला शेवगा दारचा
दुपारच्या वेळी सगळे निवांत असताना पत्नीकडे वैषयिक भावनेने पाहणारा पुरुष ती दमलेली आहे, हे लक्षात घेऊन श्रमभार कमी व्हावा, या भावनेने तिच्यासाठी चवरी ढाळू लागतो. ही संपूर्ण कविता म्हणजे त्यांच्या कवितेचा स्वभाव म्हणावा लागेल. स्त्री-विषयक आसक्ती, शृंगार भावना ही तिची मूळ प्रेरणा, पण ती दमलेली, श्रमलेली आहे. या जाणिवेने त्याच्यातील शृंगाराची भावना ही तटस्थतेत बदलते. ही तटस्थता निर्विकारपणातून आलेले नसून तिच्यावरच्या प्रेमातून, समंजसपणातून आलेले आहे. शारीरसंवेदना या त्यांच्या प्रेमभावनेचा विशेष असला तरी ती तिथेच थांबत नाही, ती शरीरातीत पातळीवर जाते. मनापासून शरीराकडे आणि त्याही पुढे जाऊन शरीरातीत आत्मिक असा तिचा प्रवास असतो. दैहिक जाणिवेपलीकडे जाऊन सौंदर्याचा अनुभव देणारी व घेणारी स्त्री त्यांच्या कवितेतून दिसते.
‘पुष्कळा’ कवितेतील ती-
‘पुष्कळ अंग तुझं, पुष्कळ पुष्कळ मन
पुष्कळातली पुष्कळ तू
पुष्कळ पुष्कळ माझ्यासाठी’ अशीही कवीला वाटू लागते.
स्त्रीच्या शरीराच्या पुढे जाऊन आत्मतत्त्वाचा शोध या कवितेतून घेतला जातो. म्हणूनच त्यांची कविता कोठेही उत्तान होत नाही, त्यात अश्लीलता येत नाही की, बीभत्सता डोकावत नाही.
सनातन स्त्रीत्वाचे प्रकटीकरण त्यांच्या काव्यातून घडते. ती कधी शहनाज, कधी अहिल्या, कधी राधा, कधी मस्तानी तर कधी उर्वशी असते, पण बरेचदा सामान्य स्त्रीच्या भावना व्यक्त करणारी ती आहे. यातून परस्परविरोधी भावनाही प्रकट झाल्या आहेत. ती कठोरही आहे आणि मायाळूही आहे. निर्मम आणि वेल्हाळही आहे. प्रियकराविषयी उदासीन आहे आणि त्याची उत्कट ओढही तिला आहे. शृंगारात पुढाकार घेणारी धीट आहे, तेवढीच लाजरी, संकोची वृत्तीची आहे. तिचे उग्र प्रलंयंकारी रूपही रेगे दाखवतात आणि सुकुमार नवसर्जनाला उत्सुक असे स्वरूपही प्रकट करतात, पण एक मात्र निश्चित उग्र प्रलयंकारी रूपातूनही ती नवसृजनाच्या दिशाच सूचित करते. सगळे नष्ट झाल्याखेरीज नवनिर्मिती होऊ शकतच नाही, हेच तिला सांगायचे आहे.
या तिच्या रूपामुळेच पुरुषाला ती भुरळ घालते. पुरुष हा स्त्रीशिवाय अपूर्ण आहे. जीवनात स्त्री व पुरुषाची पूरक भूमिका आहे. पुरुष व प्रकृतीच्या मीलनातूनच सृष्टीची निर्मिती, सृजनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. ‘अपूर्ववस्तू निर्माणक्षम’ असे स्त्रीचे प्रतिभेचे रूप आहे.
स्त्री-पुरुष संबंधांतील आदिबंध त्यांच्या काव्यातून आपल्यापुढे उलगडत राहतो. या नातेसंबंधांची सार्वत्रिकता, सार्वकालिकता ‘त्रिधा राधा’ या कवितेतून दिसते.
या कवितेत एकही क्रियापद नाही. स्त्री-पुरुष संबंधांतील चिरंतनत्व दाखविण्यासाठी रेगे जाणीवपूर्वक क्रियापद टाळताना दिसतात.
जलवाहिनी निश्चल कृष्ण
बन झुकले काठी राधा
या ओळींतील झुकले हेही ‘झुकलेले’ बन असे विशेषण स्वरूपात आले आहे.
परंपरागत भारतीय स्त्रीवर झालेले आधुनिकतेचे संस्कार याचे चित्रण त्यांनी त्यांच्या काव्यातून केले. म्हणून हे चित्रण वैश्विक भावनेपर्यंत पोहोचू शकले. त्यांच्या प्रतिभेने स्त्रीच्या शरीर- मनाचे नानाविध गुण वेचून एक कलापूर्ण स्त्री-प्रतिमा म्हणजे स्त्रीचे जणू एक नवे (Myth) मिथ निर्माण केले आहे. त्यांच्या कवितेची इंग्रजी, जर्मन, डॅनिश, स्पॅनिश व चिनी भाषेत भाषांतरे झाली, याचेही कारण हेच असेल, असे वाटते.
डॉ. वैखरी वैद्य