Leading International Marathi News Daily
शनिवार, १ ऑगस्ट २००९
  एक रिकामी जागा!
  समस्या नीट समजून घ्या
  हा कॅन्सर टाळता येतो..
  पण बोलणार आहे!
कुडियोंका है जमाना!
  मी समर्थ...
मूल, चूल आणि मी
  प्रतिसाद
  मैत्री सर्वाशीच करावी..
  नकाराचा स्वीकार
  जबाबदार तरुणाई
  दुहेरी नाव, एक नावाडी!
  चिकन सूप...
लहानसा काळा डबा
  'ति'चं जग
ब्लॉगवरच्या गप्पा
  सृजनतेचा गौरव
  पाकशास्त्र पुराण!
  आषाढपाटी
  आंतरराष्ट्रीय तिठ्ठा
  चेरी पिकिंग एक अनोखा अनुभव

 

एक रिकामी जागा!
गर्भाशयाशी निगडीत आजारांचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी त्या आजारांवर एक उपाय रामबाण होता.. तो म्हणजे गर्भाशय काढणं. आता अनेक नवनवे इलाज निघाले आहेत. मात्र काही केसेसमध्ये गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. या शस्त्रक्रियेबाबत सुशिक्षित समाजातही अजून बरेच गैरसमज आहेत. समस्या आणि त्याचे परिणाम यांची नीट माहिती घेतली तर ते गैरसमज दूर होऊ शकतात..
२२जून १८९७ या चित्रपटातलं एक गाणं, गाणं नव्हे खरं तरं.. पण जे स्त्रीगान आहे, ‘सीताबाईला चाफेकळीला नहाण आलं.’ ते मला आवडतं. मासिक पाळी नामक महिन्याच्या शरीरधर्माला आता सामोरं जावं लागणार, ते चुकणार नाही, तर त्यासाठी नवथर, अजाण मुलीला तयार करण्याची आपल्याकडे पद्धत होती. (अजूनही असल्यास माहीत नाही.) आता या

 

आधुनिक काळात अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने त्याबद्दल मुलींना सांगितलं जातं. मासिक पाळी ही आता लपवायची गोष्ट राहिलेली नाही, हे खरं तर अत्यंत चांगलं लक्षण आहे. शरीरात घडणाऱ्या बदलाची आणि त्याच्या मागच्या जुन्या परंपरागत विचारांना, गैरसमजुतीने दूर करून हल्ली व्यवस्थित माहिती दिली जाते.
साधारणपणे वयाच्या १३ व्या वर्षांपासून पाळी येऊ शकते. (हल्ली वयाची मर्यादा कमी होतेय.) आणि ती साधारणपणे ५५ ते ६० वर्षांंपर्यंत संपते. या संपूर्ण काळात स्त्री प्रजोत्पादन करू शकते. मासिक पाळी एकदम बंद होत नाही. ती एक प्रक्रिया असते. त्याला रजोनिवृत्ती म्हणतात. वयाच्या ३६-३७ वषार्ंपासून पुढे ५० वषार्ंपर्यंत या काळात काही जणींना रजोनिवृत्तीचा प्रचंड मानसिक, शारीरिक त्रास होऊ शकतो. तर काही जणींच्या बाबतीत ते अगदी सहज घडतं. रजोनिवृत्तीच्या काळात घडणारा एक शारीरिक त्रास म्हणजे स्रावाचं प्रमाण. हल्ली मात्र खूपच स्त्राव होतो, अशा तक्रारी घेऊन अनेक स्त्रिया येऊ लागल्या आहेत, असे काही स्त्री- रोगतज्ज्ञांशी बोलल्यावर कळलं आणि याचं प्रमुख कारण सांगितलं गेलं ते म्हणजे फायब्रॉइडस्- गर्भाशयावरच्या गाठी.
गर्भाशयावर आणि आतमध्ये जी मांसल वाढ होते, त्याला फायब्रॉइड्स म्हटलं जातं. त्यात वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक स्त्रीला या गाठी असतातच असं नाही. त्याचप्रमाणे काही जणींना त्या असून त्याच्यामुळे काहीही त्रास होत नाही. पण बऱ्याच जणींना म्हणजे १० मधल्या ४-५ जणींना यामुळे प्रचंड रक्तस्रावाला दर महिन्याला तोंड द्यावे लागते. अति रक्तस्रावाचं फायब्रॉइड्स हे एकमेव कारण नसलं तरी ते महत्त्वाचं कारण आहे.
पूर्वी अति रक्तस्राव होणं तसं गंभीरपणे घेतलं जायचं नाही. म्हणजे ‘होतं असं..’, ‘बाईचा जन्म..’, ‘आम्ही पण गेलो या सगळ्यातून..’ या सूचना कुटुंबाकडून ऐकाव्या लागायच्या. आणि अथांग सहनशीलता हा स्त्रीचा सद्गुण मानला गेल्यामुळे सहन करणं भाग असायचं.. बाई अगदीच चक्कर येऊन पडली किंवा हिमोग्लोबीन धोकादायकरीत्या खाली गेलं तर मग डॉक्टरांकडे नेलं जायचं आणि तेव्हा एक उपाय रामबाण होता.. तो म्हणजे गर्भाशय काढणं. खरं तर मुलं वगैरे झाल्यावर असा त्रास सुरू झाला तर गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेला हरकत नसणं स्वाभाविक होतं. एका बऱ्याच जुन्या स्त्री- रोगतज्ज्ञांनी मला सांगितलं की, २५/३० वर्षांपूर्वी त्या हा सल्ला द्यायच्या.. आणि आजही काही केसेसमध्ये देतात. पण जी प्रतिक्रिया तेव्हाच्या महिला द्यायच्या अगदी तशीच आताच्याही देतात.. त्यांचा प्रश्न असतो.. अगदी ठरलेला.. ‘यामुळे माझं स्त्रीत्व जाणार ना डॉक्टर?’ गंमत म्हणजे असे प्रश्न विचारणारा वर्ग तसा सुशिक्षित, नोकरी करणारा, आधुनिक असतो. तरीही त्यांचं हे अज्ञान कायम राहिलंय. ग्रामीण आणि दारिद्रय़रेषेखालील स्त्रियांच्या बाबतीत तर बोलायलाच नको.
स्त्रीत्व म्हणजे नक्की काय? स्त्रीचं शरीर? प्रजननशक्ती? की कामेच्छा? अनेकांना आणि अनेक जणींनाही स्त्रीची कामेच्छा ही गर्भाशयाशी निगडित आहे, असं ठामपणे वाटतं. म्हणजे जर गर्भाशय काढला तर आपण स्त्री उरणार नाही (स्पष्ट सांगायचं तर नवऱ्याला आपल्यात ‘तसा’ रस वाटणार नाही), ही भीती काही महिलांना असते.
वास्तविक पाहता गर्भाशयाचा कामेच्छेशी (libido लिबिडो) काहीही संबंध नसतो. गर्भाशयाबरोबर जे अंडाशय (Overies ओव्हरीज) असतात, त्यातून इस्ट्रोजन, प्रोजेसस्ट्रॉन हे स्त्राव निर्माण होतात. त्याचबरोबर टेस्टेस्टरॉन नावाचा एक स्राव शरीरात असतो. या सर्वावर स्त्रीची कामेच्छा अवलंबून असते. म्हणजे शारीरिकदृष्टय़ा तसं पाहायला गेलं तर Sex is in the brain्ल. पण इथे आपण वैद्यकीय दृष्टीने पाहतोय. जर हे अंडाशय काढलं तर मग स्त्रीवर त्या दृष्टीने परिणाम होतो. जर गर्भाशयावर गाठी असतील आणि त्यामुळे अत्यंत रक्तस्त्राव होत असेल तर स्त्री-रोगतज्ज्ञ त्या रुग्णाच्या शारीरिक स्थितीनुसार निदान करतात.
अनेकदा त्यात शस्त्रक्रिया हा शेवटचा उपाय असतो. गोळ्या, काही तपासण्या, हार्मोनल ट्रीटमेंट याद्वारे जर रक्तस्त्राव कमी झाला तर उत्तम. पण काही जणींना फायब्रॉइडस् असतात. त्यांच्यामुळे किंवा गर्भाशयाच्या अस्तराच्या अतिरिक्त जाडीमुळे (एंड्रोमेट्रीयल लेयर) रक्तस्त्राव होत असेल, तर औषधाशिवाय लेझर किरणांद्वारे ते काढले जाते.
या कशानेच फरक पडला नाही तर मग गर्भाशय काढणं हा उपाय असतो. ज्याला आजही चांगल्या नोकरदार स्त्रिया नकार देतात. कारण हेच.. माझं स्त्रीत्व! शस्त्रक्रियेची भीती वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण हल्ली ‘की होल सर्जरी’द्वारा टाकेविरहित शस्त्रक्रिया होऊ शकते. पूर्वी तसं नव्हतं. टाक्यांना पर्याय नव्हता. आता या शस्त्रक्रियेने अंगावर कुठलीही खूण राहात नाही. दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करून योनीमार्गाद्वारे गर्भाशय काढला जाऊ शकतो आणि बाई काही तासांनी व्यवस्थित शुद्धीवर येऊन नॉर्मल होते. (अर्थात अन्य व्याधी उदा. रक्तदाब, मधुमेह इत्यादी नसल्यास.)
मी हे अत्यंत अधिकारवाणीने सांगतेय, कारण साधारणपणे दोन वर्षांपूर्वी माझी ही शस्त्रक्रिया झाली. फायब्राइडस्मुळे मला अचानक प्रचंड त्रास व्हायला लागला. सहन करणं हा बाईचा उपजत (?) गुणधर्म, त्यामुळे तसं दीडेक वर्ष काढलं, पण जेव्हा अगदी घरात बसण्याची पाळी आली तेव्हा मात्र मी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. अर्थात माझ्या डॉक्टरांनी मला पर्याय दिले होते. त्यातला एक लेझरचा होता, पण त्रास थांबण्याची शाश्वती नव्हती. मी तशी फार सहनशील नसल्याने शस्त्रक्रियेचा पर्याय निवडला.
अर्थात अनेक जणींनी याबाबतीत संशय व्यक्त केला. मी जाडी होईन इथपासून ते कदाचित दाढीमिशाही येतील इथपर्यंत संभाव्य धोके सांगितले. गंमत वाटली की आजही आपल्याला स्त्रीची कामेच्छा ही फक्त गर्भधारणेसाठीच असते, असं वाटतं. बाईला आपणहून कामेच्छा होणं, हे आपण का मान्य करू शकत नाही? इथे मी फक्त सुशिक्षित नोकरदार महिलांविषयी बोलतेय. महिलांचं या बाबतीतील ज्ञान अगाध असतं आणि मुख्य म्हणजे चुकीचं असतं. समागम/ संभोग आणि गर्भाशय यांचा संबंध जर गर्भधारणा झाली तरच असतो. एका अशाच ‘ज्ञानी’ बाईने ‘जर मी गर्भाशय काढला तर यांना ते सुख कसं मिळेल हो?’ हे माझ्या स्त्री-रोगतज्ज्ञ मैत्रिणीला विचारलं होतं. प्रश्नाच्या जोडीला डबडबलेले डोळे होतेच. स्त्री जन्मा तुझी कहाणी! या क्रियेत पुरुषाचं इंद्रिय थेट गर्भाशयापर्यंत जात,ं अशी मतधारणा असल्याचं आढळलेलं आहे. इथे मला त्या क्रियेविषयी ऊहापोह करायचा नाही. तर हा विचार कसा आणि का येतो याकडे लक्ष वेधायचं आहे.
मघाशी म्हटल्याप्रमाणेच समागम हा पुरुषासाठी आणि प्रजोत्पादनासाठी असल्याचं मानलं जातं. (या आय-पीलच्या जमान्यातही) आणि म्हणून पाळीचा अगदी कितीही त्रास होऊ दे.. बाया सहन करतात. करतात त्या करतात, पुन्हा एखाद्या शौर्यकथेसारख्या ऐकवतात.
अती रक्तस्रावावर गर्भाशय काढणं हा अगदी शेवटचा पण रामबाण उपाय आहे. या विषयाबाबतीत मी शस्त्रक्रिया केलेल्या अनेकजणींशी बोलले. एखाददुसरा अपवाद वगळता सगळ्यांनी सांगितलं की त्यांना काहीही साइड इफेक्ट जाणवले नाहीत, आणि स्त्रीत्व नष्ट झाल्यासारखं अजिबात वाटलं नाही. पाल्र्याच्या अनिता नागले यांनी तर वयाच्या ३६व्या वर्षी फायब्रॉइड्समुळे गर्भाशय काढला होता. आजही त्या तेवढय़ाच चपळ, सडसडीत व आकर्षक आहेत. त्यांच्याकडे पाहून त्या ६६ वर्षांच्या आहेत, हे अजिबात पटत नाही. त्यांच्या मते उलट त्यांना अधिक निरोगी आयुष्य जगण्याची संधी मिळाली. डोक्यावरची टांगती तलवार दूर झाली. दुसरं उदाहरण माझ्या आईचं आहे (उमा प्रभू).. तिचा दर महिन्याचा त्रास मी लहानपणापासून पाहात आले होते.. एकदा तर तिचं हिमोग्लोबिन खूप खाली गेलं होतं. पारंपरिक विचारांची असल्याने तिने ते सहन केलं, पण जेव्हा अगदी बेशुद्ध पडायची पाळी आली तेव्हा तिने शस्त्रक्रिया करून घेतली. आज तिचं वयही ६६ आहे. आणि आपण हे आधी का केलं नाही, म्हणून ती पस्तावते.
या दोन उदाहरणांमागचा हेतू हा की तशा ज्येष्ठ नागरिकांच्या गटात मोडणाऱ्या आणि अगदी पूर्ण भारतीय आचारविचारांच्या, परंपरा पाळणाऱ्या या स्त्रियांनी सरळ मत मांडलं, जे आज तुलनेने तरुण स्त्रियांना पटत नाही.
हल्ली निदान शहरात तरी महिलांची निर्णयक्षमता वाढली आहे, अनेक नवनवे शोध, पर्याय उपलब्ध आहेत.. असं असताना फक्त स्त्रीत्व जाणार, या खोटय़ा भीतीने अनेकजणी हा त्रास अंगावर काढतात.
ऐरोली येथील डॉ. विद्या राजन पाठारे यांच्याकडे रोज अशी एखादी तरी केस असतेच. त्यांनी ज्या ज्या स्त्रियांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आणि ज्यांनी तो मानला, त्यांच्यापैकी जवळपास ५०% ‘सुटलो एकदाचे’ अशा विचारांच्या आहेत. जवळपास ८०% स्त्रियांना त्यांचं आरोग्य अधिक सुधारल्यासारखं वाटतं. फक्त ५% स्त्रियांना मामुली तक्रारी आहेत.
विज्ञान आणि वैद्यकशास्त्राने आपल्याला जर योग्य पर्याय दिले असतील तर ते स्वीकारण्यात अडचण काय? डॉक्टर ऑपरेशन सांगतात, म्हणजे त्यांना पैसे काढायचे आहेत असं म्हणून किंवा मी मग बाईच राहणार नाही असं खंतावून दर महिन्याला बेजार होण्याची शिक्षा करवून घेण्यात हशील नाही.
माझ्या बाबतीत मी जरा थोडा आगाऊपणाच केला. मी ऑपरेशन माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच करून घेतलं. ज्या दिवशी हा अवयव घेऊन आले, त्याच दिवशी तो काढला.. त्यानंतर अनेकांनी म्हटलं की तू जाडी झालीयस.. थकल्यासारखी वाटतेस.. पण मला मात्र खरंच मुक्त झाल्यासारखं वाटतंय. (आणि हो.. कुणी म्हटलंय वाढत्या वजनाविषयी तर कारण आहेच..)
अर्थात हे सर्व मी फक्त शहरी स्त्रियांच्या मतांना विचारून लिहिलेलं आहे. इथे एवढा आनंद असेल तर ग्रामीण किंवा निमशहरी भागात विचारायलाच नको.
थोडक्यात, सोसायचंच असेल तर हा त्रास का बरं सोसायचा? आपले राजकारणी, पाऊस, वीज, महागाई असे त्रास काय कमी आहेत का? ते तर पाचवीला पूजलेले.. त्यांना सोसूया!
(या लेखासाठी मला या सर्वानी सहकार्य दिले, त्यांचे मन:पूर्वक आभार- डॉ. विद्या राजन (ऐरोली), डॉ. सुचेता किंजवडेकर (नेरूळ), अनिता नागले (विलेपार्ले), शर्मिला सामंत (गोरेगाव), सुजाता साटम (सी.बी.डी., बेलापूर), क्रांती कठोच (नवी मुंबई), स्निग्धा पाटणकर (ठाणे)
शुभा प्रभू-साटम