Leading International Marathi News Daily

शनिवार , १ ऑगस्ट २००९

सरकारी दिरंगाईचा परिणाम
लाखो टन आयात डाळ कुजण्याच्या स्थितीत
नवी दिल्ली, ३१ जुलै/खास प्रतिनिधी

तूर डाळीचे भाव प्रतिकिलो शंभर रुपयांवर पोहोचले असले तरी देशातील प्रमुख बंदरांवर पडून असलेल्या ६ लाख १९ हजार टन आयात डाळी आणि कच्च्या साखरेची उचल करण्यासाठी सरकारी कंपन्यांपाशी वेळ नाही. हा साठा कित्येक दिवसांपासून कुजत पडला असून त्यापैकी मानवी सेवनाच्या दृष्टीने किती साठा सुरक्षित आहे, हे अजूनही स्पष्ट झाले नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे. आयात करण्यात आलेल्या डाळी आणि कच्च्या साखरेचा साठा बंदरांवर कुजत पडला आहे काय, असे विचारले असता आपल्याला ठाऊक नाही, असे उत्तर कृषी मंत्री शरद पवार यांनी दिले. जीवनावश्यक वस्तूंचे दर आकाशाला भिडल्यामुळे संसदेत व संसदेबाहेर सरकारवर टीकेचा भडिमार होत आहे. भाववाढीवर तात्काळ नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी मंत्रिमंडळाचे सचिव संबंधित मंत्रालयांना धडक कृतीवर भर देण्यास सांगत आहेत.

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील पाचही आरोपींचा ‘मोक्का’ रद्द
मुंबई, ३१ जुलै / प्रतिनिधी

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, लेफ्ट. प्रसाद पुरोहित, राकेश धावडे, अजय राहिरकर आणि दयानंद पांडे या एकूण पाच आरोपींवर लावण्यात आलेला ‘मोक्का’ मुंबईतील विशेष न्यायालयाने आज काढून टाकला. त्यामुळे हा खटला आता भारतीय दंड विधान आणि बेकायदा संघटना प्रतिबंधक कायद्याखालील गुन्ह्यांसाठी नाशिकच्या सत्र न्यायालयात वर्ग होऊन त्याची नियमित सुनावणी होणार असल्याने पाचही आरोपींचा जामिनावर सुटका होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. दरम्यान, राज्य सरकारने विशेष ‘मोक्का’ न्यायालयाच्या सदर निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मोक्का’ न्यायालयाच्या या निर्णयामुळे दहशतवादविरोधी पथकाला मोठा हादरा बसल्याचे मानले जात आहे. मालेगाव स्फोट हे हिंदुत्ववादी संघटनांनी घडविल्याचे आणि त्यामध्ये लष्करातील अधिकारी गुंतले असल्याचे उघडकीस झाल्याने देशभरात खळबळ उडाली होती.

संशयास्पद जहाजामुळे सुरक्षा यंत्रणेतील समन्वयाचा अभाव उघड
सावंतवाडी, ३१ जुलै/वार्ताहर

कोकण किनारपट्टीवर गुरुवारी एक संशयास्पद जहाज दिसून आल्याच्या पाश्र्वभूमीवर सर्व यंत्रणा हायअलर्ट झाली. मात्र या सुरक्षा यंत्रणेत जहाजाबाबत एकमत झाले नसल्याचे उघड झाले आहे. दरम्यान ते व्यापारी जहाज असून, गोवा येथे जात असल्याचे सांगण्यात आले. रत्नागिरी समुद्रात गुरुवारी संशयास्पदरित्या किनाऱ्यावरील नागरिकांना एक जहाज दिसले. ते काही वेळातच सिंधुदुर्ग दिशेने रवाना झाल्याने संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर सिंधुदुर्ग व गोवा येथील यंत्रणेला अलर्ट करण्यात आले. या संशयास्पद जहाजाने सर्वांची झोप उडाली.

पवारांनी दिले साखरेच्या भाववाढीचे संकेत
नवी दिल्ली, ३१ जुलै/खास प्रतिनिधी

देशात यंदा साखरेचे उत्पादन केवळ १५० ते १५५ लाख टनच होणार असून त्यामुळे सणासुदीच्या तोंडावर साखर महागण्याची शक्यता असल्याची कटु बातमी आज केंद्रीय कृषी, अन्न व पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री शरद पवार यांनी राज्यसभेत दिली. साखरेचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून भाव नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत, असा दिलासा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. साखरेचे उत्पादन ४१ टक्क्यांनी घटणार असल्याचे पवार यांच्या निवेदनामुळे स्पष्ट झाले आहे. उत्पादनात घट झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या साखर टंचाईवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने चालू वर्षांच्या जानेवारीत देशातील साखर कारखान्यांना परदेशातून आयात करमुक्त कच्ची साखर आयात करण्याची परवानगी दिली. मात्र, आयातदाराने प्रक्रिया करून ही साखर निर्धारित मुदतीत न विकल्यास तिचे लेव्हीच्या साखरेत रुपांतर करण्यात येईल, असेही पवारांनी स्पष्ट केले.

निव्वळ अफवा
मुंबई ३१ जुलै / प्रतिनिधी

कोकणातील देवगड बंदरात एक जहाज संशयास्पद फिरत असल्याची अफवा कालपासून पसरवली जात असून असे कोणतेही जहाज कोकण किनारपट्टीवर फिरत नसल्याचा खुलासा तटरक्षक दलाच्या वतीने करण्यात आला. गुरुवारी संध्याकाळी देवगड बंदरातील रेड्डी जेट्टी जवळून गोव्या कडे एक मालवाहू जहाज गेल्याची अफवा किनारपट्टीवर पसरली होती . तेव्हापासून रत्नागिरी, सिंधूदुर्ग, रायगड आणि ठाणे जिल्हयातील पोलीस व तटरक्षक दलाने सागरी गस्त वाढवली होती. तटरक्षक दलाने कोकण किनारपट्टी पिंजून काढली असून ही काही मच्छिमारांकडून अफवा पसरवण्यात आली असावी अशी शक्यता तटरक्षक दलाच्या उच्च अधिकाऱ्यांने व्यक्त केली. याचवेळी हे जहाज तटरक्षक दलाचेच असल्याचे तेथील सूत्रांचा हवाला देऊन चॅनलवरून सांगण्यात येत होते.

माणगावजवळील अपघातात चार ठार
महाड, ३१ जुलै/वार्ताहर

मुंबई गोवा महामार्गावर माणगावपासून तीन किलोमीटर अंतरावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिल्याने कारमधील दोन पुरुष आणि दोन महिला जागीच ठार झाले. अन्य दोन प्रवासी जखमी झाले आहेत. पुण्यातील कोथरुड येथील पाटील कुटुंबीय आपल्या सॅन्ट्रो कारने देव दर्शन घेण्यासाठी रत्नागिरीला जात असताना माणगाव जवळच्या रॉयल पॅलेस हॉटेलसमोर हा भीषण अपघात झाला. मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकने कारला समोरून जोराने धडक दिल्याने कारमधून प्रवास करणारे रमाकांत पाटील, रेखा पाटील तर एक महिला आणि एक पुरुष ज्यांची नावे समजू शकली नाहीत, असे सर्वजण अपघातामध्ये ठार झाले. यांच्यातील केवळ मयूरेश पाटील हा वाचला असून गंभीर जखमी झाला आहे. ट्रकने कारला धडक दिल्यानंतर कारमध्ये सर्व प्रवासी अडकले होते. माणगावमधील तरूण कार्यकर्त्यांना अपघाताचे वृत्त समजताच त्यांनी अपघातामुळे कारमध्ये अडकून पडलेल्या सर्व प्रवाश्यांना त्वरित बाहेर काढले.

 

प्रत्येक शुक्रवारी