Leading International Marathi News Daily
शनिवार १ ऑगस्ट २००९
  नागरी सौंदर्यात भर टाकणारी त्रिवेणीकला
  न्यायालयीन निवाडा
विकासकाच्या कर्तव्याची जाणीव करून देणारा निर्णय
  दैनंदिन खर्चासाठी निक्षेप निधी वापरता येणार नाही
  आठवणीतील घर
अन्वीकरांची गढी
  चर्चा
घरासाठी होणारी परवड
  वास्तुरंग
  मेलबॉक्स
  स्वस्त घरांची निर्मिती करणारं, दुर्लक्षित ‘भारतीय’ वास्तुरचना पर्व!
भाग १
  भारत-रशिया मैत्री भक्कम करणारे वास्तुसंकुल

 

नागरी सौंदर्यात भर टाकणारी त्रिवेणीकला
माणसाच्या दृक्संवेदनशक्तीला आवाहन करणारे दोन कलाप्रकार आहेत, एक आहे चित्र व दुसरा शिल्प. या दोन्ही कलाप्रकारांचा उपयोग आपल्या सर्वाच्या दैनंदिन जीवनामध्ये सतत होत असतो. कळत नकळत त्याचा प्रत्यय सर्वाना येत असतो. रोजच्या जीवनात असंख्य वस्तू अवतीभोवती असतात. प्रत्येकजण त्या सर्व वस्तूंचा उपयोग रोज प्रत्यक्षपणे करतो असे नाही. काही वस्तूंचा उपयोग नित्य नियमाने होतो, काहींचा प्रासंगिक असतो. कितीतरी वस्तू फक्त शोभेच्याच असतात, आपल्या आजूबाजूचा परिसर प्रसन्न करणाऱ्या. बिछान्याशेजारच्या मेजावरील गरजाचे घडय़ाळ, स्नानगृहातील श्ॉम्पूची किंवा तेलाची बाटली, वॉशहँड बेसिन, त्यावरील आरसा किंवा मोबाईल फोनचा हँडसेट, भिंतीवरची

 

दिनदर्शिका, मेजावरील फुलदाणी अशा प्रकारच्या रोजच्या वापरातील वस्तू, तशीच मुलांची खेळणी, स्वैपाकघरातील नानाविध उपकरणे, रस्त्यावरच्या दुचाक्या नि मोटरगाडय़ा, असंख्य प्रकारचे कपडे, पादत्राणे या अशा अगणित नेहमीच्या उपयोगाच्या वस्तू. प्रत्येक वस्तू जरा निरखून पाहा. त्या वस्तूचा आकार, रचना, रंगसंगती यांचे बारकाईने निरीक्षण केले तर लक्षात येईल की, प्रत्येक वस्तू कलात्मकतेने बनविली आहे. निदान तशी बनवण्याचा प्रयत्न केलेला असतो. अर्थातच प्रत्येक वस्तूच्या कलात्मकतेचा दर्जा कमी-अधिक असतो, पण चित्र व शिल्प या दृक्कलांचा उपयोग त्या वस्तूंच्या निर्मितीमध्ये थोडय़ाफार अंशाने केलेला असतो हे नक्की.
चित्र व शिल्प या दृक्कला प्रकारांचा उपयोग माणसाने फार पुरातन काळापासून केलेला आहे. अनेक ठिकाणच्या पुरातत्त्व उत्खननांतून त्याचे खूप पुरावे सापडले आहेत. असं म्हणतात की, शिल्प हा कलाप्रकार चित्रकलेच्या आधी अस्तित्वात आला. अप्रगत अवस्थेमधील मानवाने धुळीमध्ये किंवा वाळूमध्ये मारलेल्या रेघोटय़ा हे त्याने अजाणतेपणाने कोरलेले पहिले शिल्प किंवा चित्रशिल्प. असेच चित्रशिल्प त्याने मग त्याच्या गुहेच्या भिंतीवर टोकदार दगडाच्या मदतीने कोरले असेल. त्यातून उठावदार आकृत्या तयार होत गेल्या असतील. उत्थान शिल्पाचा-रिलीफ स्कल्पचरचा- उगम तेव्हा झाला असणार. धुळीत किंवा चिखलात, त्याच्या व अन्य प्राण्याच्या पावलांचे उमटलेले ठसे बघून त्याला शिल्पकलेची प्राथमिक जाण आली असावी. ओल्या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे कौशल्य पुढे क्रमाक्रमाने साध्य केले असावे. द्विमिती चित्रकलेच्या बाबतीतही असेच काहीसे घडले असेल. लहान, मोठय़ा, सरळ, वाकडय़ा रेषांनी आकार बंदिस्त होतात अशी जाण त्याला झाल्यावर त्याला हवे तसे आकार तो विविध रेषांनी करू लागला असेल. त्या आकारांमध्ये रंग भरू लागला असेल व त्या प्रक्रियेतून चित्रकला प्रस्थापित होत गेली असावी. जगात अनेक ठिकाणी अशा गुहा आढळल्या आहेत त्यांच्या भिंतींवर माणसाने शेकडो वर्षांपूर्वी शिल्पे कोरली आहेत व रंगीत चित्रेही काढली आहेत.
इ.स.पूर्व दोनशे ते इ.स. आठशे या हजार वर्षांच्या काळात ज्यांची निर्मिती झाली त्या अजिंठा नि वेरूळ येथील गुंफा व लेणी तर जगप्रसिद्ध आहेत. शिल्पकलेचे वर्चस्व वेरूळच्या लेण्यामध्ये दिसते, तर अजिंठय़ाच्या गुंफांमध्ये चित्रकलेचा प्रभाव जास्त प्रमाणात आहे. वेरूळचे कैलास लेणे तर शिल्पकलेचा महान आविष्कार समजले जाते. अजिंठय़ाची भित्तीचित्रे-फ्रेस्कोज् अथवा म्युरल पेंटिंग्ज यांना कला जगतात फार महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून अजिंठा, वेरूळ यांचा अंतर्भाव ‘जागतिक वारसा’मध्ये केला गेला. अजिंठा, वेरूळव्यतिरिक्त खजुराहो, हळेबीड-बेलूर, अबूची दिलवाडा मंदिरे, तशीच राणकपूर, कोनार्क यासारखी कितीतरी मंदिरं शिल्पकलेच्या दृष्टीने अतिसुंदर कलाकृती आहेत. अनेक मंदिरांमध्ये, राजमहालांमध्ये भिंतींवर अथवा छतांवर रंगवलेली चित्रं हीसुद्धा बघणाऱ्याच्या मनाचा ठाव घेणारी आहेत. भित्तीचित्रं तर लहानसहान गावांतील मंदिरांमध्ये व प्रार्थनास्थळांमध्ये बघायला मिळतात. त्यामधील धार्मिक व पौराणिक कथामालांचे चित्रीकरण अतिशय सुबक रेखाकृतींनी व मनोवेधक रंगसंगतीने केलेले दिसते. वास्तूंशी निगडित असलेल्या चित्र व शिल्प या दृककला भारतातच नव्हे तर जगात सर्वत्र आढळतात. पृथ्वीवर हजारो वर्षे वास्तव्य करून असलेल्या मानवजातीच्या सांस्कृतिक प्रगतीचा हा एक लक्षणीय व अमोल ठेवा आहे.
प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचिन वास्तुरचनेमध्ये या दोनही कलांना पुष्कळ वाव मिळाला. अगदी ऑस्ट्रेलियापासून अमेरिकेपर्यंत सगळीकडे. विशिष्ट उपयुक्ततेची वास्तू त्यासाठी असायला हवी असा काही खास नियम नाही. धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक अशा प्रकारच्या किंवा अन्य कोणत्याही उपयोगाची लहान-मोठी वास्तू त्याला अपवाद नाही. लहान-मोठय़ा गावांमधल्या आणि नगरांमधल्या इमारती जरा बारकाईने लक्षपूर्वक न्याहाळून पाहा, लक्षात येईल की, बऱ्याच इमारतींच्या रचनेत कुठे ना कुठे चित्र किंवा शिल्प यांचा उपयोग केला आहे. कधी प्रवेशद्वारावर वेलबुट्टी कोरलेला लाकडी पट्टा असेल ज्यांत विशेषकरून देवदेवतांच्या आकृत्या असतील, कधी दरवाजाची चौकट नक्षीकामाने कोरलेली असेल. खर्च कमी करण्यासाठी म्हणून. काही ठिकाणी दरवाजे-खिडक्यांच्या सभोवार भिंतीवरच्या गिलाव्यातच रुंद पट्टा बनवला असेल आणि रंगकामात तो उठावदारपणे रंगवला असेल. गुजरात, कच्छ, राजस्थान, ओरिसा या प्रदेशांच्या देहाती भागात असले प्रकार सर्रास आढळतात. प्रत्येक इमारतीचा आकार, मांडणी रंगसंगती, पोत यांचे निरीक्षण केले तर ध्यानात येते की, ती इमारत कलात्मकतेने बनविण्याचा प्रयत्न केला आहे. कलात्मकतेचा दर्जा विचारात घेता तो प्रयत्न किती यशस्वी झाला असेल, नसेल हा भाग वेगळा.
मध्ययुगीन व अर्वाचीन वास्तुरचनेमध्ये शिल्प आणि चित्र या दोन कलांना खूप वाव मिळाला. वास्तूच्या संदर्भात दोनही कलांचा उपयोग स्वतंत्रपणे केल्याचे दिसते. एकाच वेळी चित्र नि शिल्प या दोहोंचा आविष्कार वास्तूमध्ये सहसा एकाच वेळी एका दृष्टिक्षेपात दिसेल अशा प्रकारे आढळत नाही. मध्य युगीन काळात युरोपात, विशेषत: इटलीमध्ये, काही वास्तूंच्या बाबतीत चित्रकलेचा व शिल्पकलेचा उपयोग एकत्रितपणे केल्याचे दिसते. रोममधील सेंट पीटर्स कथ्रिडलच्या वास्तुप्रकल्पात मायकलेंजेलोने या दोन कलांचा एकत्रितपणे उपयोग केला आहे आणि तो तर सर्वानाच थक्क करून सोडणारा आहे. (क्रमश:)
भा.द.साठेलेखक
संपर्क -९३२३७५३०५८