Leading International Marathi News Daily
रविवार, २ ऑगस्ट २००९

साद : गाभ्रीच्या पावसाची!
नेमेचि येणाऱ्या पावसानं यंदा पुण्या-मुंबईलाच नव्हे, तर देशालाच हवालदिल केलंय. जून कोरडा गेला. जुलैचा पंधरवडा सरत आला तरी आषाढघन काही बरसेनात. अचानक ‘पाऊस’ हा कळीचा मुद्दा बनला. महापालिकांनी पाणीपुरवठय़ात कपात केली. ‘शॉवर वापरू नका’, ‘गाडय़ा धुऊ नका, पुसा’ अशा सूचना वर्तमानपत्रे छापू लागली. अंधश्रद्धेला उधाण आलं. यज्ञ केले गेले. बेडकांची लग्नं लावली गेली. आपत्कालीन उपाययोजनांसाठी बैठका झाल्या. आणि नाही म्हणायला, पडणाऱ्या पावसाचं महत्त्व घरा-घरांत अधोरेखित झालं. कुणी म्हणालं, ‘क्लाऊड सीडिंग’ करा. कुणी म्हणालं, क्रिकेट सामने भरवा! पाऊस पडावा यासाठी लोक काकुळतीला आले. अपवादात्मकरीत्या शहरी-ग्रामीण, सुशिक्षित-अशिक्षित, गरीब-श्रीमंत सगळेच समाजघटक पावसाच्या प्रतीक्षेत एकभावानं समरस झाले. अशात पाऊस पडण्याचा खात्रीशीर उपाय हाती असल्याचा ठाम विश्वास उरी घेऊन प्रशांत पेठे नामक पुणेकर चित्रपट वितरकांच्या कार्यालयांचे खेटे घालत होता. ‘गाभ्रीचा पाऊस’ हा त्यानं निर्माण केलेला पहिला चित्रपट प्रदर्शित झाला की हमखास पाऊस कोसळेल, असं तो दृढतेनं म्हणायचा. त्याला ऐकणारे माफक हसून ऐकत असत. विदर्भातल्या एका शेतकऱ्याची नॉन-ग्लॅमरस गोष्ट ऐकून त्यावर चित्रपट तयार करायला त्यानं एका पहिलटकर दिग्दर्शकाच्या कन्व्हिक्शनवर आपली सगळी शिल्लक उधळली होती. ‘चालू’ सिनेमाचे कुठलेच घटक नसलेला असा सिनेमा बनवणं पुरेसं नव्हतं म्हणून की काय, आता तो पाऊस पाडायच्या गोष्टी करत होता. चित्रपट निर्माणाधीन असताना आलेल्या अडचणींचा सामना त्यानं याच इच्छाशक्तीनं केला.
अखेर १३ जुलैला ‘गाभ्रीचा पाऊस’चा प्रीमिअर मुंबईत सुरू झाला अन् बाहेर पावसानं संततधार लावली. चित्रपट संपला
 

आणि उपस्थित मान्यवर चिंब मनानं बाहेर झरणाऱ्या धारांशी स्पर्धा करीत भरभरून बोलत राहिले. कुणी मिठय़ा मारल्या, कुणी गदगदून गेलं, कुणाला शब्द फुटेना, तर कुणी रडू लागलं. एवढं काय होतं त्या सिनेमात? खरं तर एका शेतकऱ्याची साधेपणानं सांगितलेली गोष्ट! शेती, शेतकरी यांच्याशी सामान्यज्ञानापुरताच संबंध असलेली ही मुंबईतली प्रतिष्ठित मान्यवर मंडळी त्या गोष्टीनं हेलावून गेली. कुणाही संवेदनशील माणसाची व्हावी तशीच त्यांची अवस्था होती. आपल्याच समाजाचा घटक असलेल्या एका माणसाची आजवर न कळलेली गोष्ट त्यांनी पाहिली होती. त्या गोष्टीतल्या शेतकऱ्यासाठी त्यांच्यातल्या बऱ्याचजणांचं आतडं तुटलं. जन्माचं नातं असावं असा बंध मंडळींनी अनुभवला होता. चित्रपटाची परिणामकारकता कारण होतीच, पण वरकरणी निबर ‘प्रश्नेफेशनल’ चेहरा घेऊन वावरणाऱ्या शहरी समाजात आणिक बराच ओलावा शिल्लक असल्याचीही ती पावती होती. खूप हायसं वाटलं.
पुढे १७ जुलैला पुण्या-मुंबईत रीतसर वितरित झाल्यावरही चित्रपटाच्या प्रत्येक खेळानंतर अशाच प्रतिक्रिया प्रत्यक्ष फोनवरून ‘एसएमएस’नं मिळाल्या. परिणाम सार्वत्रिक होता. आश्वस्त करणारा होता. चित्रपट गर्दी खेचू लागल्याचा आनंद तर होताच; पण माणूस म्हणून एका उपेक्षित समाजघटकाबद्दल आपण फार काही करत नाही, हाही सल होता. तीच भावना जेव्हा प्रेक्षकांच्या मनातही उमटू लागली तेव्हा यातून काही बरं घडेल असं वाटलं. समाजाच्या सुसंस्कृततेबद्दलही दिलासा मिळाला. परपीडेनं व्यथित होण्याची सुसंस्कृतता काळाच्या वेगानं मागं पडते आहे, असं वाटत असताना लोक भरभरून स्वत:च्या अप्पलपोटीपणावर तोंडसुख घेत होते. दोन वेळा आंघोळ करायची शुचिता बाळगणारे पाण्याची किंमत न कळल्याबद्दल स्वत:ला दोष देत होते. दिव्यांचा लखलखाट मिरवणारी महानगरीय मानसिकता शेतकऱ्याच्या आयुष्याचा भाग बनलेल्या लोडशेडिंगची फिकीर करू लागली होती. हे सगळं एक-दीड तासाच्या मराठी चित्रपटाचं कर्तृत्व!
‘गाभ्रीचा पाऊस’! म्हणजे अवेळी कोसळून शेतकऱ्याच्या जिवाशी खेळणाऱ्या पावसाला त्यानं कातावून दिलेली शिवी. आपल्या व्यवसायावर, जमिनीवर कठोर निष्ठा ठेवून, व्यवस्थेवर वा इतर कुणावरही दोषारोप न करता प्रखर जीवनेच्छेनं परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या असंख्य कुटुंबांपैकी एकाची ही प्रश्नतिनिधिक गोष्ट! माणसांची गोष्ट! त्यांच्या जगण्याच्या लढय़ाची गोष्ट! आपल्या भवतालाचा समग्र अनुभव आत्मविश्वासानं सांगणाऱ्या सतीश मनवर या यवतमाळच्या दिग्दर्शकानं दाखविलेली ही गोष्ट! र्मचट नेव्हीतून जग पाहिलेल्या प्रशांत पेठेला आपली वाटून झपाटून टाकणारी ही गोष्ट! सुधीर पलसाने या अत्यंत मनस्वी छायाचित्रकारानं काळजाचे डोळे करून टिपलेली ही गोष्ट. श्रेयाची अपेक्षा न धरता हुन्नरीनं अडचणींवर मात करीत निर्मितीव्यवस्था सांभाळणाऱ्या नितीन वैद्यची ही गोष्ट! पुण्या-मुंबईच्या लोकांना कळावी म्हणून ताणून धरणाऱ्या पावसाची ही गोष्ट! एक अभिनेता म्हणून चित्रपटात काम करणं हा चरितार्थाचा किंवा करिअरचा भाग न उरता मला माणूसपण शिकवणारी ही गोष्ट! आता ती पाहणाऱ्या प्रत्येकाचीच गोष्ट होतेय. चित्रपटाच्या अर्थकारणाला न जुमानता कुणी वेडे असं धाडस करतात. त्यानं समाजमनावर चढलेली पुटं दूर होऊन जाणिवा निर्माण होतात. समाजाचा घटक म्हणून असलेल्या जबाबदारीचं आत्मभान येतं. आणि माणुसकीचा एक निश्चित बंध दृगोचर होतो. एका कलाकृतीच्या परिपूर्तीसाठी आणिक काय हवं!
आणखी प्रेक्षक हवेत. जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट पाहावा, यासाठी माध्यमांचं सहकार्य हवं. असं झालं तर पेठे दुसरा वेडाचार करू शकतील, हे तर झालंच; पण शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये जाहीर (कदाचित फक्त जाहीरच!) होणारी हजारो कोटींची पॅकेजेस् वाचून माझ्यासारखी जास्त शहाणी शहरी माणसं नाकं मुरडणार नाहीत. पाणी, वीज यांसारखे ऊर्जास्रोत अतिरिक्त उधळताना विचार करतील. कदाचित कुणी धनिक वा सेवाव्रती एखादं काम उभं करील! यातलं काहीतरी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या आमच्या त्या ‘जळू’ गावातल्या (जिथे या चित्रपटाचं शूटिंग झालं!) मुकुंदभाऊंपर्यंत पोहोचेल.
व्यक्तिश: मला या कलाकृतीचा भाग बनता आलं, याचं सारं श्रेय ज्येष्ठ अभिनेते नंदू माधव, सतीश मनवर आणि प्रशांत पेठे यांना! त्यांच्यामुळेच मी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांची आणखी एक अप्रतिम भूमिका साकारत जाताना अनुभवू शकलो. सोनाली कुलकर्णीसारख्या गुणी व ख्यातनाम अभिनेत्रीसह काम करण्याचं स्वप्न पूर्ण करू शकलो. या सर्वजणांना माझा कृतज्ञ सलाम!
ता. क.- ‘गाभ्रीचा पाऊस’ प्रदर्शित झाल्यावर सर्वत्र धो-धो पाऊस बरसला. प्रशांत पेठेच्या इच्छाशक्तीचं बळ; दुसरं काय?
गिरीश कुलकर्णी