Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

मोलकरणींसाठीच्या कायद्याची कार्यवाही करवून घेण्याचे आव्हान कायम- पानसरे
कोल्हापूर, २ ऑगस्ट / विशेष प्रतिनिधी
राज्यात २५ जिल्हय़ांमध्ये आयटकच्या झेंडय़ाखाली उभारलेल्या घरेलू मोलकरणींच्या संघटनेची ताकद लक्षात आल्यामुळेच राज्यकर्त्यांना घरेलू मोलकरणींसाठी कायदा मंजूर करणे भाग पडले आहे. तथापि या कायद्याची अंमलबजावणी करवून घेणे हे सर्वात मोठे आव्हान अद्यापही कायम असून, या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी संघर्षाला तयार रहा, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांनी येथे केले.

आंबा घाट बहरला घनदाट हिरवाईने
शाहूवाडी, २ ऑगस्ट/वार्ताहर

शाहूवाडी तालुक्यातील आंबा घाट व परिसर वर्षा पर्यटनाने फुलला असून, भुरभुरणारा पाऊस, बोचरा व झोंबणारा वारा आणि गर्द धुक्याची झालर यामुळे हा परिसर पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. दरम्यान, शाहूवाडी तालुक्यात आंबा, विशाळगड, बर्की आणि अणुस्कुरा घाट हे पावसाळ्यात आणि विशेषत: श्रावण महिन्यात पर्यटकांना भुरळ घालतात.

सांगली जिल्ह्य़ावर अद्याप वरुणराजाचा रुसवाच!
सांगली, २ ऑगस्ट / गणेश जोशी

‘आला पावसाळा.. पण कोरडा ठणठणीत’ असेच मान्सूनचे वर्णन करावे लागेल! मान्सूनच्या आगमनानंतर तब्बल महिनाभराने सांगली जिल्ह्य़ात काहीप्रमाणात पावसाने हजेरी लावली होती. परंतु गेल्या १५ दिवसात पावसाने पुन्हा पाठ फिरविल्याने जिल्ह्य़ातील शेतकरी हवालदिल झाले असून खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात मोठय़ा पावसाने हजेरी लावली नाही, तर खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जाऊ लागली आहे.

संकटातील ठेवीदारांसाठी १२०० कोटींचे पॅकेज द्यावे- जाधव
सांगली, २ ऑगस्ट/ प्रतिनिधी

ठेवीदारांचा शेवटचा रुपया मिळेपर्यंत निकराचा लढा देणार असल्याचा निर्धार व्यक्त करून शासनाने ठेवीदारांच्या ठेवी देण्यासाठी १२०० कोटी रुपयांचे पॅकेज द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष दिगंबर जाधव यांनी केले. येथील ठेवीदारांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

विठ्ठल मंदिर समितीवर वारकरी प्रतिनिधी नसल्याने तीव्र नाराजी
पंढरपूर, २ ऑगस्ट/वार्ताहर
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीवर वारकरी सांप्रदायातील एकही प्रतिनिधी नसल्याने वारकरी, फडकरी मंडळीतून तीव्र नाराजी पसरली असून, या संदर्भात पंढरीतील प्रमुख वारकरी मंडळींनी शनिवारी आमदार सुधाकर परिचारक यांचे निवासस्थानी भेट घेऊन कानावर ही बाब घातली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, आपणास समिती नेमताना विचारणा केली नाही.

उद्यापासूनच्या संपात शासकीय वाहनचालकही
कोल्हापूर, २ ऑगस्ट/प्रतिनिधी

मंगळवार दिनांक ४ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या बेमुदत संपात शासकीय वाहनचालकही सहभागी होणार आहेत. यासंबंधीचा निर्णय आज झालेल्या एका बैठकीत घेण्यात आला. सहाव्या वेतन आयोगाने शासकीय वाहनचालकांची वेतनश्रेणी गोठवून मोठा अन्याय केला आहे. केंद्र शासनातील वाहनचालकांप्रमाणेच राज्यातील शासकीय वाहनचालकांना सहावा वेतन आयोग लागू करण्यात यावा, गोठवलेली वेतनश्रेणी पूर्ववत लागू करावी, कालबद्ध पदोन्नती मिळावी, घरभाडे व वाहनभत्ता मंजूर करण्यात यावा, अशा काही मागण्या प्रलंबित आहेत. त्यासाठी शासकीय वाहनचालक ४ ऑगस्टच्या बेमुदत संपामध्ये सहभागी होणार आहेत.

मुचंडी तपासणी नाक्यावर पाच लाखांचा दंड वसूल
जत, २ ऑगस्ट/वार्ताहर
जत तालुक्याच्या कर्नाटक सीमेवरील मुचंडी येथे उपप्रश्नदेशिक परिवहन खात्याच्या वतीने सुरू केलेल्या प्रश्नयोगिक तत्त्वावरील चेक पोस्टद्वारे पाच लाख १५ हजार रुपयांचा महसूल मिळाला असल्याची माहिती प्रश्नदेशिक परिवहन प्रश्नधिकरणचे सदस्य बाबा ऊर्फ अनंत शिंदे यांनी दिली.
राज्य शासनाच्या परिवहन विभागाकडून एका महिन्यासाठी प्रश्नयोगिक तत्त्वावर चेक पोस्ट लावण्यात आले. चोरटी वाहतूक, वाहन कर न भरलेले, वाहतूक कर न भरणारे व क्षमतेपेक्षा जादा माल भरलेल्यांवर कारवाई करण्यात आली. कराराच्या अटी भंग करून जादा फेऱ्या करणाऱ्या कर्नाटकच्या दोन एसटी बसेसवरही कारवाई करण्यात आली.

अकलूजमध्ये आजपासून डाळिंबाच्या सौदेबाजारास प्रश्नरंभ
माळशिरस, २ ऑगस्ट/वार्ताहर

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने अकलूजमध्ये आज (रविवार)पासून डाळिंबाच्या सौदेबाजारास प्रश्नरंभ झाला. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी सुमारे २८ टन डाळिंबाचे आवक झाली होती, तर भगवा जातीच्या वाणाला प्रत पाहून १७ रुपयांपासून ७० रुपयांपर्यंतचा भाव प्रतिक्विंटल मिळाला. या वेळी समितीचे अध्यक्ष व सोलापूर जि.प. पक्षनेते मदनसिंह मोहिते-पाटील, जि.प. माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील तसेच परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकरी बारामती, फलटण, पंढरपूर तालुक्यातील व्यापारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

संतोष जाधवला अटक
सातारा, २ ऑगस्ट/ प्रतिनिधी

सातारा पंचायत समितीचे सदस्य, शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष जाधव याचा अटकपूर्व जामीनअर्ज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. डी. जोशी यांनी फेटाळला. त्यानंतर त्यास पोलिसांनी अटक केली. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान येथील विसावा नाका परिसरातील ए-वन स्थानिक वृत्तवाहिनीच्या कार्यालयाची जमावाने मोडतोड केली. त्या प्रकरणी संतोष जाधव याच्यावर संशयित म्हणून तक्रार दाखल करण्यात आली होती. संतोष जाधव याच्या वतीने अ‍ॅड. एस. एम. साखरे तर सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील अ‍ॅड. श्यामप्रसाद बेगमपुरे यांनी काम पाहिले. संतोष जाधव याचे साथीदार सचिन आढाव, विकास पवार, विलास भोसले, यशवंत आढाव (सर्व रा. क्षेत्र माहुली) व सचिन साळुंखे (रा. देगाव) या पाच जणांचे अटकपूर्व जामीनअर्ज न्या. डी. डी. जोशी यांनी मंजूर केले. मात्र त्यांची जामीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पोलिसांनी त्यांना ताब्यात ठेवले आहे. तोडफोड झाल्यानंतर संतोष जाधव व राजे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मेजर घनवट यांना पीएच. डी. पदवी प्रदान
फलटण, २ ऑगस्ट/ वार्ताहर

येथील मुधोजी महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्रसेनेचे कंपनी कमांडर मेजर मोहन घनवट यांनी सादर केलेल्या ‘महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन व लोकसंबंध’ या शोधप्रबंधास शिवाजी विद्यापीठाने त्यांना पीएच.डी. ही शिक्षण क्षेत्रातील उच्च पदवी बहाल केली आहे. या यशाबद्दल प्रश्न. घनवट यांचे शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

शाहीर सुरेश लोखंडे यांना हिंदू मावळा पुरस्कार
कोल्हापूर, २ ऑगस्ट/विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा हिंदू महासभा व मासिक प्रभातीचे रंग यांच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या उमाकांत राणिंगा हिंदू मावळा पुरस्कारासाठी यंदा शाहीर सुरेश लोखंडे यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संघटनेचे विभागीय कार्यवाह संजय कुलकर्णी यांनी येथे दिली. येथील करवीरनगर वाचन मंदिरात बुधवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी सकाळी प्रश्नचार्य के.एस.गुरव यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. कोल्हापूरचे महापौर उदय साळोखे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या समारंभाचे अध्यक्षस्थान हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष अनिल पवार हे असणार आहेत. समारंभात गोविंद गांधी, उद्योगपती बापूसाहेब तेंडुलकर, उद्योगपती दिलीप जाधव, उद्योगपती नितीन वाडीकर, गगनबावडय़ाचे माजी सरपंच नंदकुमार पोवार यांचा समाजकार्याबद्दल सत्कार करण्यात येणार आहे.

साताऱ्यात मान्सून मॅडनेस दुचाकी रॅली
सातारा, २ ऑगस्ट/प्रतिनिधी

येथील अ‍ॅडव्हेंचर इन कार्पोरेटेड या संस्थेमार्फत दुचाकी मान्सून मॅडनेस रॅली काढली होती. या रॅलीचा शुभारंभ खासदार उदयनराजे भोसले यांनी झेंडा दाखवून केला. रॅलीची सुरुवात पोवईनाका परिरातील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यापासून झाली. सातारा बोगदा मार्गे शेंद्रे नागठाणे, मुरुड तारळे, जळव, चाळकेवाडी, ढोसेघर, सज्जनगड व पुन्हा सातारा अशी १५० किलोमीटर रॅलीत पुणे येथील रोड शेकर्स, बुलेट ग्रुप, सातारचा कल्पना ग्रुप सहभागी झाले. संस्थेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश शानभाग, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव सुधाकर शानभाग, आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू अमित आंबेडकर, माजी उपनगराध्यक्ष अ‍ॅड. दत्ताजी बनकर, उषा शानभाग, श्रीकांत शहा आदी मान्यवर या रॅलीत सहभागी झाले होते.

महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष परेरा आज साताऱ्यात
सातारा, २ ऑगस्ट/प्रतिनिधी
बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अ‍ॅलन सी. ए. परेरा सोमवारी ३ ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या हस्ते कोरेगाव शाखेत बचत गटांसाठी स्वतंत्र कक्षाचे उद्घाटन होणार आहे. बचत गटांसाठी वेगळा कक्ष सुरू करणारी राज्यात महाबँक पहिली असल्याचे सातारा विभागाचे सरव्यवस्थापक रघोत्तम देवळे यांनी सांगितले. बचत गटातील महिलांना अधिक तत्पर व गतिमान सेवा देण्यासाठी अग्रणी बँक असलेल्या महाबँकेच्या कोरेगाव शाखेत सुमारे एक हजार बचत गट आहेत. त्यापैकी ४०० च्या वर बचत गटांना बँकेने अर्थसाहाय्य दिले आहे. या वर्षी २५० बचत गटांना अर्थसाहाय्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बँकेच्या कोरेगाव, रहिमतपूर, वाठार स्टेशन, पिंपोडे बुद्रुक या शाखांमार्फत ग्रामीण महिला व बालविकास मंडळी या संस्थेच्या साहाय्याने २०० गटांना अर्थसाहाय्य देण्यात आल्याचे रघोत्तम देवळे यांनी सांगितले.

शिवसेनेच्या संतोष जाधवला ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
सातारा, २ ऑगस्ट/प्रतिनिधी

सातारा पंचायत समितीचे सदस्य शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष जाधव याचा अटकपूर्व जामीन अर्ज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. डी. जोशी यांनी शुक्रवारी फेटाळला व त्यानंतर त्यास पोलिसांनी अटक केली होती. आज मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान येथील विसावा नाका परिसरात ‘ए वन’ स्थानिक वृत्तवाहिनीच्या कार्यालयाची जमावाने तोडफोड केली. त्याप्रकरणी संतोष जाधव यांच्यावर संशयित म्हणून तक्रार दाखल करण्यात आली होती. संतोष जाधव यांच्या वतीने अ‍ॅडव्होकेट एस. एम. साखरे तर सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील अ‍ॅडव्होकेट श्यामप्रसाद बेगमपुरे यांनी काम पाहिले.

शिक्षकांना पगार न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा
सोलापूर, २ ऑगस्ट/ वार्ताहर

केंद्र शासन पुरस्कृत अपंग एकात्म शिक्षण योजनेंतर्गत विशेष शिक्षकांचा पगार मार्च-२००९ पासून झालेला नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. या शिक्षकांना पगार त्वरित न मिळाल्यास अपंग एकात्मिक शिक्षण संवर्धन संस्थेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा संस्थेचे उपाध्यक्ष विकास कंकाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिला आहे. केंद्र शासनाच्या अपंग एकात्म शिक्षण योजनेंतर्गत महाराष्ट्रात ५८१ प्रश्नथमिक व माध्यमिक अपंग युनिट कार्यरत आहेत. या योजनेंतर्गत विशेष शिक्षकांचा पगार हा पुणे येथील शिक्षण संचालनालयाकडून करण्यात येतो. मात्र मार्च-०९ पासून हा पगार झालेलाच नाही. या शिक्षकांचा पगार त्वरित व्हावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा कंकाळ यांनी दिला आहे.

शकुंतला उबाळे यांचे निधन
सातारा, २ ऑगस्ट/प्रतिनिधी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) पश्चिम महाराष्ट्रचे संघटक अशोकराव उबाळे यांच्या पत्नी शकुंतला यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ल्हासुर्णे (ता. कोरेगाव) या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष किशोर तपासे, जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, उपाध्यक्ष अमोल आवळे, जनशक्ती सेनेचे प्रेमानंद जगताप, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शिरसाट यांच्यासह कार्यकर्त्यांनी त्यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांचा जलदान कार्यक्रम मंगळवारी, ४ ऑगस्ट रोजी ल्हासुर्णे या ठिकाणी होणार आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

मैंदर्गीत लहान मुलांच्या भांडणातून दलित-सवर्णात दंगल; १२ जखमी
सोलापूर, २ ऑगस्ट/प्रतिनिधी

लहान मुलांच्या भांडणाचे पर्यवसान दलित सवर्णाच्या दंगलीत झाल्याचा प्रकार अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी यथे रविवारी सकाळी घडला. या दंगलीत दोन्ही जमातींकडून बाराजण जखमी झाले असून, पोलिसांत परस्परविरुद्ध फिर्याद नोंदविण्यात आली. दरम्यान, दुपारनंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले असून, गावात शांतता समितीची बैठक गेऊन शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मैंदर्गीत किरकोळ कारणावरून दोघांत बाचाबाची होऊन त्याचे पर्यवसान दलित-सवर्ण दंगलीत झाले. दोन्ही समाजाचे तरुण एकमेकांमसोर आले. परस्परांवर दगडफेक करण्यात आल्याने एरव्ही शांत असलेल्या मैंदर्गीत जातीय तणाव वाढला. दंगलीची माहिती समजताच सोलापूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी पी. आर. पाटील व अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी तातडीने मैंदर्गीत धाव घेऊन परिस्थती आटोक्यात आणली.