Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

आघाडी शासनाचे हात उखडा-ठाकरे
परभणी, २ ऑगस्ट/वार्ताहर

आघाडीच्या राज्यात शेतकऱ्यांना खत, पाणी, वीज तर मिळत नाही पण हक्कासाठी भांडणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीवर काठी पडत आहे. गोरगरिबांवर अन्याय करणारे हे हात आता मुळापासून उखडले जातील. नाकर्त्यां आघाडी शासनाला त्यासाठी आता मातीत गाडावे लागेल, अशी टीका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली.

टक्का घेणाऱ्या मंत्र्यांची नावे जाहीर करणार -जावडेकर
औरंगाबाद, २ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. या सरकारने राज्यच विकून टाकले आहे, असा आरोप करून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार प्रकाश जावडेकर यांनी या सरकारमधील पाच, सात आणि दहा टक्के रक्कम घेणाऱ्या मंत्र्यांची नावे भारतीय जनता पक्ष जाहीर करणार असल्याचे सांगितले.औरंगाबाद मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात खासदार जावडेकर बोलत होते.

अध्यात्माची नवी वाहिनी
दूरचित्रवाणीवरील विविध वाहिन्यांच्या गर्दीमध्ये धर्म आणि अध्यात्म याबद्दल जास्तीत जास्त माहिती देणाऱ्या दोन वाहिन्या म्हणजे ‘आस्था’ आणि ‘संस्कार’. या दोन वाहिन्यांवरती प्रवचन, कीर्तन, रामदेवजी महाराज यांचे योगा संदर्भातील मार्गदर्शन सातत्याने प्रसारित केले जात असते. या पाश्र्वभूमीवर पुण्यातून ‘नेक्स्ट जनरेशन’ या कंपनीचे संचालक बाबा शेख यांनी ‘धर्मात्मा’ ही नवी केबल वाहिनी सुरू केली आहे. धर्मविषयक व अध्यात्मिक स्वरुपाचे विविध कार्यक्रम व माहिती सखोलपणे या वाहिनीवरून दिली जाणार आहे.

सात ऑगस्टला पुण्यात गंध दरवळणार..
तुम्हाला वेगवेगळ्या चवी, माणसं, ठिकाणं लक्षात राहतात ते त्यांच्या एखाद्या वैशिष्टय़ामुळे. रस्त्यावरून जाताना अचानक झुळूक येते आणि मोगऱ्याचा सुगंध मन फ्रेश करून जातो. तरकधी मासळी बाजारातला मासळीचा दरुगध बऱ्याच दूपर्यंत आपला पिच्छा पुरवतो. एखाद्या गंधाचं आपल्या आठवणीतलं स्थान तसं नगण्य असतं. पण ‘गंध’ यासारख्या कोणाला छोटय़ाशा वाटणाऱ्या गोष्टीतही एखाद्या सर्जनशील माणसाला चित्रपटाची एक अख्खी कथा सापडते. आणि त्यातूनच ‘गंध’ सारख्या चित्रपटाची निर्मिती होते.

‘अग्निदिव्य’ येत्या शुक्रवारी प्रदर्शित
पारस मुव्हीजनिर्मित ‘अग्निदिव्य’ हा चित्रपट येत्या शुक्रवारपासून पुण्यात प्रदर्शित होत आहे. मराठी चित्रपट महामंडळातर्फेकाही दिवसांपूर्वी घेण्यात आलेल्या चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा खास शो झाला होता. त्या वेळी नामवंत मंडळीनी व अनेक जाणकार रसिकांनी त्याचे कौतुक केले होते. ऐंशी वर्षाच्या चित्तरंजन कोल्हटकर यांच्यासारख्या जुन्या जाणत्या अभिनेत्यापासून ते नवोदित अभिनेत्री नेहा पेंडसे हिच्यापर्यंतच्या सर्वच कलावंतांच्या यातील भूमिका लक्षवेधी अशा आहेत.

‘पॅकेजचा शेतक ऱ्यांना काय फायदा झाला?’
नांदेड, २ ऑगस्ट/वार्ताहर

लोकसभा निवडणुका झाल्या, आरोप-प्रत्यारोप झाले, जे मंत्री होते ते मंत्रीच राहिले. लोकांना काय मिळाले? पॅकेज जाहीर करून कोणत्या शेतकऱ्यांना फायदा झाला? शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज आहेच! कर्जमाफीचा फायदा कोणत्या शेतकऱ्यांना झाला, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण राज्यभर ‘शिवसंदेश यात्रे’च्या माध्यमातून फिरत आहोत. शिवसेना आपल्या आवडी-निवडीचा विचार करीत नाही तर जनतेचे काम करते, असे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

‘एमकेसीएल’सोबतचा करार ‘बामू’कडून वर्षभरासाठी स्थगित!
औरंगाबाद, २ ऑगस्ट/प्रतिनिधी

औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्य़ांतील सुमारे सव्वातीनशे महाविद्यालयांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नता असून आता एमकेसीएल सोबतचा करार वर्षभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेऊन विद्यापीठाने पुन्हा एकदा रटाळ, किचकट, वेळखाऊ अन् चुकांची भरपूर लेखी कारभाराकडे वाटचाल चालविली आहे. व्यवस्थापन परिषदेच्या मॅरेथॉन बैठकीत अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला.

औरंगाबाद जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद
दहा वर्षाखालील मुलींच्या एकेरीचे जेतेपद प्रचिती कानडेकडे
औरंगाबाद, २ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

औरंगाबाद जिल्हा बॅडमिंटन संघटनेतर्फे आयोजित अजिंक्यपद स्पर्धेत दहा वर्षाखालील मुले व मुलींच्या एकेरीचे विजेतेपद अनुक्रमे निशित कंडी व प्रचिती कानडे यांनी पटकाविले. १९ वर्षाखालील मुलींच्या एकेरीचा अंतिम सामना अवनी डबरी आणि मैत्रेयी बक्षी यांच्यात होणार आहे.

औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेमध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण, पाच समित्यांची स्थापना
औरंगाबाद, २ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

नवनिर्वाचित औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आता कामाला सुरुवात केली आहे. रविवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत मैदान, स्पर्धा, विधी, निवड आणि प्रसिद्धी अशा विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्या स्थापून सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे असे सचिव सचिन मुळे व सहसचिव शिरीष बोराळकर यांनी सांगितले.

राज्यात परतण्याचे गोपीनाथ मुंडे यांचे संकेत
अंबाजोगाई, २ ऑगस्ट/वार्ताहर

केंद्र सरकार संपूर्ण देशात एकाच पद्धतीचे शिक्षण आणू पाहत आहे. हा हास्यास्पद प्रकार असून शिक्षणाच्या वाढत्या खासगीकरणावर लगाम घातला पाहिजे. एकवेळ रस्ते, पूल बांधण्यासाठी उशीर करा, परंतु शिक्षणाच्या बाबतीत सुरू असलेला सावळागोंधळ थांबला पाहिजे. आपल्या बहुभाषिक देशाची, संस्कृतीची ओळख सांगणारे पूर्णपणे भारतीय पद्धतीचे शिक्षण देणाऱ्या विद्यापीठाची देशाला गरज असल्याचे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केले. ते भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या सत्कार कार्यक्रमात बोलत होते. किती काळ दिल्लीत राहणार आहे, हे मला माहीत नाही असे सांगून गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात परतण्याचेही संकेत यावेळी दिले. प्रश्नरंभी भा.शि.प्र.चे कार्यवाह प्रश्न. सतीश पत्की यांनी प्रश्नस्ताविक करताना संस्थेच्या विकासाचा आढावा घेतला आणि संस्थेच्या विकासात खासदार मुंडे यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले. संस्थेत पन्नास हजार विद्यार्थी हे शिक्षण घेत असून औरंगाबाद येथे संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करणार असल्याचे ते म्हणाले.

परभणी-वसमत रस्त्यावर अपघातात १ ठार, ३ जखमी
परभणी,२ऑगस्ट/वार्ताहर
परभणी-वसमत रस्त्यावर असोला पाटीजवळ इंडिका कार व ऑटोची धडक होऊन त्यात एकजण जागीच ठार झाला, तर तीनजण गंभीर जखमी झाले. जखमींवर परभणीच्या शासकीय रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत. आज दुपारी वसमतहून परभणीकडे येणाऱ्या एमएच-२२-एच-२२२३ क्रमांकाच्या इंडिका कारने परभणीकडून जाणाऱ्या एमएच-२२-डी-२६० क्रमांकाच्या ऑटोला आसोला पाटीजवळ जोराची धडक दिली. परभणी येथील शासकीय दवाखान्यातून एका पायाला फ्रॅक्चर झालेल्या शिरडशहापूर येथील मंगला साहेबराव जोगदंड यांना दवाखान्यातील औषधोपचार संपल्याने हा ऑटो गावाकडे घेऊन जात होता. दरम्यान, याच ऑटोला आसोला पाटीजवळ कारने धडक दिल्याने मंगलाबाईंचा दुसराही पाय निकामी झाला. पायाला व कंबरेला या अपघातात गंभीर मार लागल्यामुळे त्यांच्यावर परभणीच्या शासकीय दवाखान्यात औषधोपचार सुरू आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे पती साहेबराव भीमराव जोगदंड (रा. शिरडशहापूर, ता. वसमत, जि. हिंगोली) हेही होते.

नातेवाईकांच्या आंदोलनानंतर पतीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल
हिंगोली, २ ऑगस्ट/वार्ताहर

वसमत तालुक्यातील कुरुदवाडी येथील विवाहिता विमलचा विष घेतल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून घेण्यास पोलीस तयार नसल्याने तिच्या माहेरच्या मंडळींनी कुरुदा पोलीस ठाण्याला घेराव घातल्यानंतर पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्य़ाची नोंद करून घेतली. हदगाव तालुक्यातील विमलचा विवाह तीन महिन्यांपूर्वी करुदवाडी येथील रमेश उत्तम फोले याच्याशी झाला होता. लग्नानंतर विमल पंचमीच्या सणाला माहेरी गेली होती. ती शनिवारी कुरुदवाडीत परतली. विषारी औषध घेतल्याने तिचा मृत्यू झाल्याची फिर्याद तिचा पती रमेश फोले यांने दिली होती. आरोपींना अटक करून खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी या विमलच्या नातेवाईकांनी केली. त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. तेव्हा लक्ष्मण खोकले यांच्या फिर्यादीवरून विमलची सासू, नवरा, दीर, जावा आदींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून घेतला.

चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
लोहा, २ ऑगस्ट/वार्ताहर

कंधार विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षात आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी विकासकामे सुरू करत मोठा निधी आणला आहे. लिंबोटी धरण पूर्णत्वाकडे जात असल्यामुळे कंधार तालुक्यातील २२५३ तर लोहा तालुक्यातील ३७४७ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. कंधार-लोहा तालुक्यातील जवळपास ६ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आणणारा लिंबोटी प्रकल्प पूर्णत्वाकडे जात आहे. मागील पाच वर्षात या प्रकल्पासाठी प्रतापरावांनी आणलेल्या निधीमुळे प्रकल्प पूर्णत्वाकडे जात आहे . त्याचा फायदा वडगाव येथील ४६९ हेक्टर, किवळा ५६६ हेक्टर, बोरगाव ५५४ हेक्टर, लोढेसांगवी ३१९ हेक्टर तर सामूहिक १५४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
जिंतूर, २ ऑगस्ट/वार्ताहर

जिंतूर तालुक्यातील मौजे मानधनी शिवारात आढळलेल्या अनोळखी मृतदेहप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. २८ जुलैला जिंतूर-नांदेड मार्गावर जिंतूरपासून १० कि.मी. अंतरावर मौजे मानधनी शिवारात विवस्त्रावस्थेत एका २२ वर्षीय तरुणाचा अनोळखी मृतदेह आढळला. त्याची येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासण केली. मात्र त्याची ओळख पटली नाही. अशाच एका अज्ञात तरुणीचा मृतदेह याच दिवशी वसमत परिसरात आढळले. हे दोन्ही खून अनैतिक संबंधांतून घडल्याचा संशय पोलिसांचा असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

पालिका कर्मचाऱ्यांचा आजपासून संप
बीड, २ ऑगस्ट/वार्ताहर

केंद्राप्रमाणे सहावा वेतन आयोग लागू करून १०० टक्के अनुदान द्यावे यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील २२५ नगरपालिकांतील कर्मचारी उद्यापासून (दि. ३) बेमुदत संपावर जाणार आहेत, अशी माहिती कर्मचारी संघटनेचे महादेव गायकवाड यांनी दिली. बीडसह राज्यात २२५ नगरपालिकांमधील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत. विशेषत: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनाही सहावा वेतन आयोग आणि १०० टक्के अनुदान द्यावे, ही मागणी आहे. राज्य शासनाने ३१ जुलै २००९ पर्यंत या प्रमुख दोन्ही मागण्या मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते, पण ते पाळले नाही. त्यामुळे राज्यातील सर्व नगरपालिकांतील कर्मचारी संघटनांनी एकत्र येऊन उद्यापासून संपावर आहेत, तर ४ ऑगस्टला जिल्हाधिकारी कचेरीवर कर्मचारी मोर्चा काढून लक्ष वेधणार आहेत, अशी माहिती दिली.

पतीचा जाळून घेतल्याने मृत्यू
हिंगोली, २ ऑगस्ट/वार्ताहर

कळमनुरी तालुक्यातील डिग्रस (बु.) येथील अनिल मगरे (वय ३२) व त्याची पत्नी शांताबाई मगरे (वय ३०) या पती-पत्नीत किरकोळ कारणावरून शनिवारी रात्री भांडण झाले. एकमेकांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले व जीव देण्याची धमकी देऊ लागले. दरम्यान अनिलने अंगाला काडी लावून घेतली. तो चांगलाच भाजल्याने त्याला औषधोपचारासाठी नांदेडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी पहाटे पाच वाजता अनिलचा मृत्यू झाला.

पाईप अंगावर पडून कामगाराचा मृत्यू
औरंगाबाद, २ ऑगस्ट/प्रतिनिधी

ट्रॅक्टरमध्ये पाईप चढवत असताना त्यातील एक अंगावर पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत घडली. सोमनाथ बोटे असे या कामगाराचे नाव आहे. तीन सहकाऱ्यांसह सोमनाथ हे पाईप चढविण्याचे काम करत होते. एक पाईप त्यांच्या अंगावर पडला. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना सहकाऱ्यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी सिडको औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

आघाडी सरकारच्या पुतळ्याचे परभणीत दहन
परभणी, २ ऑगस्ट/वार्ताहर

महागाईच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने रविवारी सकाळी ११ वाजता शिवाजी पुतळा परिसरात ‘जोडे मारो’ आंदोलन केले. या वेळी आघाडी सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून शासनाच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. कालच शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी महागाईच्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज परभणी शहरात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अतुल कुलकर्णी, खासदार गणेशराव दुधगावकर, आमदार संजय जाधव, शहरप्रमुख डॉ. विवेक नावंदर, माजी आमदार हनमंत बोबडे, उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे, तालुकाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव, संदीप भंडारी, महिला जिल्हा संघटक विमलताई पांडे, तालुकाप्रमुख अंजली पवार, सविता मठपती, भाविसेचे जिल्हा संघटक डॉ. मदन लांडगे, प्रवीण गोमचाळे, अतुल सरोदे, विनायक काळे, शेख शब्बीर आदी शिवसैनिक सहभागी झाले होते.

रिक्षा-दुचाकीच्या अपघातात दोन जण ठार
औरंगाबाद, २ ऑगस्ट/प्रतिनिधी
मालवाहू रिक्षा आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने दोनजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारी वैजापूर-गंगापूर रस्त्यावर चिंचडगावनजीक घडली. अशोक भीमराज त्रिभुवन (वय २५, रा. कापूसवाडगाव) आणि सलाउद्दीन शबाहुद्दीन शहा (वय ३५, रा. बेलंदपूर, उत्तर प्रदेश) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. अविनाश गजानन त्रिभुवन (वय २२) या गंभीर जखमी झाले आहेत. अविनाश आणि अशोक हे दोघे दुचाकीवरून त्यांच्या गावाकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू रिक्षाला त्यांची दुचाकी धडकली. यात रिक्षात बसलेला सलाउद्दीन आणि दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. तिघांना तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी विरगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अविनाश याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

शहीद राजगुरू सामाजिक सभागृहाचे उद्घाटन
औरंगाबाद, ऑगस्ट/प्रतिनिधी

माजी आमदार श्रीकांत जोशी यांच्या आमदारनिधीतून सिडको एन-३ येथे बांधण्यात आलेल्या शहीद राजगुरू सामाजिक सभागृहाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज झाले. या वेळी माजी मंत्री हरिभाऊ बागडे, श्रीकांत जोशी, जिल्हाध्यक्ष व आमदार सांडू पाटील लोखंडे, महापौर विजया रहाटकर, माजी महापौर डॉ. भागवत कराड, शहराध्यक्ष अतुल सावे, माजी उपमहापौर विजयकुमार मेहेर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आसाराम तळेकर, विवेक देशपांडे व अनिल मकरिये उपस्थित होते. ‘राज्यात सामाजिक उपक्रम होणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांतूनच संस्कृती टिकून रहाते.’ असे श्री. जावडेकर या वेळी बोलताना म्हणाले तर माझा आमदार निधी अशाच प्रकारच्या सामाजिक उपक्रमांसाठीच वापरले असल्याचे श्री. जोशी यांनी या वेळी सांगितले. यंदाचे वर्ष हे राजगुरू यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. नेमके त्याच वर्षात हे सभागृह पूर्ण करून शहिदांचे स्मरण करण्यात आले असल्याचे महापौर श्रीमती विजया रहाटकर या वेळी म्हणाल्या.