Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

महागाईच्या निषेधार्थ शिवसेनेचा जागर
मुंबई, २ ऑगस्ट/प्रतिनिधी

अन्नधान्याच्या वाढत्या महागाईच्या निषेधार्थ शिवसेनेने आज राज्यव्यापी रस्ता रोको आंदोलन केले. दादर येथील शिवसेना भवनासमोर पाच ते दहा हजार शिवसैनिकांनी दुपारी रस्ता रोको आंदोलन केल्याने वाहतूक कोलमडली. राज्यातील प्रमुख शहरे, जिल्ह्याची ठिकाणे येथील मुख्य रस्ते शिवसैनिकांनी अडवल्याने ठिकठिकाणी या आंदोलनाने लोकांचे लक्ष वेधून घेतले. दादर शिवसेना

 

भवन येथे सकाळपासून हजारो शिवसैनिक भगवे झेंडे व आपापल्या शाखांचे बॅनर घेऊन मोर्चाने दाखल होत होते. महागाई विरोधातील घोषणा व राज्याच्या सत्तेवरून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला खाली खेचण्याचा निर्धार शिवसैनिक व्यक्त करीत होते. मोर्चात काही तरुण-तरुणींनी वधू-वरांचे पोषाख केले होते. त्यांच्या अंगावर फळांचे अलंकार घालण्यात आले होते. फळांचे दर सोन्यापेक्षा जास्त असल्याचा संदेश यातून देण्यात येत असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले. थाळ्या, पळ्या यांचा खणखणाट करीत महिला रस्त्यावर उतरल्या व त्यांनी शिवसेना भवनासमोरील वाहतूक बंद पाडली. पुरुषही यावेळी मोठय़ा संख्येने हजर होते. महागाई सर्वाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. महागाईने गरीब, मध्यमवर्गीय यांचे जगण्याचे गणित कोलमडवून टाकले असल्याचे मत आंदोलकांनी व्यक्त केले. महागाई नियंत्रणात आणण्याकरिता सरकारने प्रयत्न केले नाहीत तर या प्रश्नावरील आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला. महागाईला जबाबदार असलेले राज्यातील काँग्रेसप्रणीत सरकार उखडून फेकण्याकरिता लोकांनी येत्या विधानसभा निवडणुकीचा वापर केला पाहिजे, असे आवाहन राऊत यांनी केले. तब्बल तासभर रस्ता रोको आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी शिवसैनिकांना अटक केली.