Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

पवारांच्या आदेशाला ‘राष्ट्रवादी’ नेत्यांकडूनच केराची टोपली
दिलीप शिंदे, ठाणे, २ ऑगस्ट

होर्डिग्ज आणि पोस्टर्स यांच्यावर स्वत:चे मोठ-मोठे फोटो झळकावून नेतेगिरी करणे बंद करा आणि प्रत्यक्ष लोकांची कामे करीत प्रतिष्ठा मिळवा. जंगी होर्डिग्ज लावून शहर व परिसर विद्रुप होतातच, पण त्यावर असलेल्या प्रतिमा देखिल अधिक विकृत होतात, असा काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढलेल्या पक्षाध्येशासह उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करीत राष्ट्रवादीचे सर्वच नेते इतर पक्षांच्या नेत्यांप्रमाणेच आपापली मोठ मोठी होर्डिग्ज

 

लावून स्वत:च्या नसलेल्या कर्तृत्वाची दवंडी पिटवत आहेत.
खुद्द उच्च न्यायालयानेच समाजात तेढ निर्माण करणाऱ्या, पर्यावरणावर आघात करणाऱ्या, तसेच शहराचे सौंदर्य बिघडविणाऱ्या अशा होर्डिग्जवर बंदी घालण्याचे आदेश दिलेले असूनही राज्यभरातील तमाम पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आदी नोकरशहा राजकारण्यांना घाबरून त्या होर्डिग्जना हात लावत नाहीत. राष्ट्रवादीचे जानेमाने नेते जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:ची रंगीबेरंगी प्रसिद्धी करण्यासाठी ५ ऑगस्टच्या आपल्या वाढदिवसानिमित्त सबंध ठाण्यात होर्डिग्ज लावून शहर विद्रुप केले आहे. त्याहीपेक्षा लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की, ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर यांच्या घरावर हल्ला करण्याच्या आरोपावरून अटक झालेले मुख्य आरोपी पांडुरंग काळे यांच्या मोठय़ा फोटोसहीत शुभेच्छा आव्हाड यांनी स्विकारल्याचे होर्डिग्ज वरून दिसत आहे. अर्थात या गुर्मीबाजीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाला साक्षात शरद पवार वेसण घालू शकले नाहीत, तर कोण घालणार? शहरातील होर्डिग्जवर कारवाईची नाटकं महापालिका अनेकदा करते, मात्र पालिकेची कारवाई पुढे जाताच मागे पुन्हा होर्डिग्ज उभी राहतात. या होर्डिग्ज बाजीवरूनच शहरात दंगल आणि हाणामारीचेही प्रसंग अनेकदा उद्भवले आहेत. गेल्याच आठवडय़ात या विद्रुपीकरणाची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने पालिका आयुक्त नंदकुमार जंत्रे यांच्यासह तीन अधिकाऱ्यांना दंड ठोठावला. एवढेच नव्हे तर वेळीच ही होर्डिग्ज हटवली नाहीत तर दहापट दंड ठोठावण्याचा इशाराही उच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र न्यायालयाचा हा इशारा पालिका प्रशासन अथवा राजकीय नेते यापैकी कोणालाच तमा नसावी. नाहीतर न्यायालयाच्या निर्णयानंतरही खुद्द महापालिकेची आणि महापौरांची होर्डिग्ज शहरात झळकली नसती. दोन दिवसांपूर्वी तर राजकीय पक्षांच्या होर्डिग्जना हात लावण्याची हिंमत नसलेल्या पालिका प्रशासनाने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लागलेल्या होर्डिग्जवर कारवाई केली. त्यातून मोठा वादंग निर्माण झाला, परंतु त्यानंतरही काँग्रेसचे नारायण पवार, शिवसेनेचे राजन विचारे यांच्या वाढदिवसाची तर जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाची शहरभर लागलेली होर्डिग्ज पालिकेला हटवता आलेली नाहीत.