Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

मुंबई, २ ऑगस्ट / क्री.प्र.
वर्ल्ड अ‍ॅन्टी डोपिंग एजेन्सीच्या (वाडा) नियमातील वादग्रस्त ठरलेला ‘ठावठिकाणा’ कळवण्याबाबतचा भाग फेटाळून लावत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आज अ‍ॅन्टी-डोपिंग मुद्यावरून भारतीय खेळाडूंची पाठराखण केली आहे. मुंबईला आज झालेल्या बीसीसीआयाच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. १ जानेवारी २००९ पासून आयसीसीने लागू केलेला खेळाडूंच्या खाजगी आयुष्यावर घाला

 

घालणाऱ्या वाडाच्या या नियमात बदल करण्याचे सुचवून हा वादग्रस्त मुद्दा पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कोर्टात ढकलून दिल्यामुळे आयसीसीची पुरती कोंडी झाली आहे.
आयसीसीचे कार्यकारी बोर्ड आता हा मुद्दा पुन्हा चर्चेद्वारे निकाली काढणार आहे. ठावठिकाणा, एकांतता आणि व्यावहारिक बाब, याबाबत मनात किंतू असतानाही भारताच्या ११ खेळाडूंचा अपवाद वगळता सर्व देशांच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी आयसीसीच्या अ‍ॅन्टि-डोपिंग चाचणीसाठी सहमती दर्शवली आहे. आयसीसीचे कायदेविषयक सल्लागार यांच्यासह भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार धोनी, हरभजन व युवराज हे आज झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीला उपस्थित होते. पुढच्या तीन महिन्यातील ठावठिकाणा जर दरदिवशी तासातासाने आधीच कळवून दिला तर आमच्या सरकारने दिलेल्या सुरक्षेला अर्थच राहणार नाही. त्यामुळे वाडाच्या या नियमातील ठावठिकाणाविषयक भागात बदल गरजेचा आहे, या विषयावर आज या बैठकीत चर्चा रंगली. खेळाडूंची उत्तेजक द्रव्य चाचणी घेण्यास आमची काहीही हरकत नाही. कुठल्याही स्पर्धेत किंवा क्रिकेटविषयक कार्यक्रमात ती खुशाल घेण्यात यावी. खेळाडू त्यांच्या ठावठिकाणाबाबतची माहिती देण्यासही तयार होतील पण, आयसीसीने ते कुठल्या खेळाडूंची चाचणी कधी व कुठे घेणार आहेत, याबाबत भारतीय क्रिकेट बोर्डाला पूर्वसूचना दिल्यास आम्ही त्या खेळाडूला २४ तासात त्यासाठी हजर करू, असे आम्ही आयसीसीच्या अधिकाऱ्यांना कळवले असल्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी आज झालेल्या बैठकीनंतर सांगितले.