Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

संप सरकारी कर्मचाऱ्यांचा उद्यापासून
मुंबई, २ ऑगस्ट/प्रतिनिधी

सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी तंतोतंत लागू कराव्यात या मागणीकरिता महाराष्ट्रातील २२ लाख सरकारी कर्मचारी ४ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. यामध्ये माध्यमिक व

 

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचाही समावेश आहे.
महाविद्यालयीन प्राध्यापक व विद्यापीठातील सुमारे ३० हजार शिक्षक १४ जुलैपासून सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीकरिता बेमुदत संपावर असताना आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरूवात होण्याची चिन्हे दिसत असल्याने राज्यात अनागोंदी व निर्नायकी माजण्याची भीती व्यक्त केली जात आहे. र. ग. कर्णिक यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेने परवापासून बंदची हाक दिली आहे. कर्णिक यांनी सांगितले की, शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर १३ मे २००९ च्या सरकारी आदेशाने कुऱ्हाड कोसळली आहे. घरभाडेभत्ता, प्रवासभत्ता व अन्य काही भत्ते हे जुन्या वेतनश्रेणीवर दिले जाणार असल्याने शिक्षक व कर्मचारी यांचे हजारो रुपयांचे नुकसान होणार आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारे सर्व भत्ते सहाव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीशी जोडलेले असावे, प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना सरकारी कर्मचाऱ्यांना दिले जाणारे सर्व लाभ दिले जावे, या दोन प्रमुख मागण्यांकरिता संप पुकारल्याचे कर्णिक यांनी सांगितले.
राज्य सरकारने २००६ पासून सहाव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. यामुळे राज्य शासनावर दरवर्षी ८०९१ कोटी रुपयांचा वार्षिक बोजा पडणार आहे. पुढील पाच वर्षांत थकबाकीपोटी सरकारला १६ हजार ३७० कोटी रुपये कर्मचाऱ्यांना द्यावे लागणार आहेत, याकडे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लक्ष वेधले आहे.