Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

‘सांस्कृतिक प्रदूषण साहित्यिकांनी रोखावे’
नगर, २ ऑगस्ट/प्रतिनिधी

सध्या हवा, पाणी, निसर्ग, विचार व संस्कृतीचे प्रदूषण झाले आहे. हे प्रदूषण साहित्यिकांचे शब्द रोखू शकतात. जिव्हारी लागणारे शब्द माणसाला बदलतात. माणसाचे अंतरंग सजविणारे लेखन म्हणजे ईश्वरसेवा आहे, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी केले.
येथील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात आज सातव्या शब्दगंध साहित्य संमेलनाचा समारोप पाचपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ कवी फ. मुं. शिंदे, स्वागताध्यक्ष नंदकुमार पवार, प्राचार्य शिवाजी देवढे, प्रा. डॉ. शंकर चव्हाण आदी या वेळी उपस्थित होते.

सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा- न्या. पटेल
नगर, २ ऑगस्ट/प्रतिनिधी

स्वातंत्र्यपूर्व काळात वकिलांनीही मोठा त्याग केला होता. आजच्या वकिलांनी किमान सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असावे, अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांनी व्यक्त केली. सरकारी वकिलांनी केवळ सरकारचीच बाजू मांडण्याऐवजी सत्य परिस्थिती पुढे आणली पाहिजे, असेही ते म्हणाले. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवातर्फे येथील माऊली सांस्कृतिक भवनात आयोजित विभागीय वकील परिषदेत न्यायमूर्ती पटेल बोलत होते. त्यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले.

अण्णासाहेब शेलारांनी फुंकले विधानसभेसाठी रणशिंग
श्रीगोंदे, २ ऑगस्ट/वार्ताहर

नेत्यांच्या भावनेपेक्षा लोकहिताला महत्त्व देऊन जनतेचा उमेदवार या नात्याने आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे जि. प.सदस्य अण्णासाहेब शेलार यांनी आज विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. वनमंत्री बबनराव पाचपुते यांचे कट्टर समर्थक शेलार यांनी नेत्याविरोधात बंड करून विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा आज बेलवंडी येथे समर्थकांच्या मेळाव्यात केली. आता अण्णा उभा राहिला, नेत्यांना सांगा, असा इशाराही त्यांनी दिला. अध्यक्षस्थानी माजी उपसभापती व नागवडेसमर्थक बाळासाहेब नलगे होते. चार तास चाललेल्या मेळाव्यास सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. बहुतेक वक्तयांनी आता तडजोड नको, निवडणूक लढवा, असा आग्रह धरला.

सावंत यांच्या उपोषणास चार गावांमधून पाठिंबा
निघोज, २ ऑगस्ट/वार्ताहर

संत निळोबाराय सेवा मंडळाचे अध्यक्ष अशोक सावंत यांच्या उपोषणास आज दुसऱ्या दिवशी कडूस, पानोली, वडुले व पिंपळनेर येथील गावकऱ्यांनी ग्रामसभेत पाठिंबा जाहीर केला. पिंपळनेरच्या सरपंच सुनंदा रासकर ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. सावंत यांना पाठिंब्यासाठी या ग्रामसभेचे आयोजन केले होते. जि. प. सदस्या कुसूमताई कळमकर या वेळी उपस्थित होत्या. या वेळी बोलताना राळेगणसिद्धीचे माजी सरपंच सदाशिव मापारी यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर कडक टीका केली.

पिंपळगाव तलावातील बेकायदा नौकानयन अखेर बंद
संबंधित व्यावसायिकाविरुद्ध कारवाई नाहीच
नगर, २ ऑगस्ट/प्रतिनिधी

महापालिकेची परवानगी नसताना पिंपळगाव माळवी तलावात सुरू असलेले बेकायदा नौकानयन अखेर बंद पडले. मात्र यात मनपाच्या कर्तबगारीचा भाग नसून संबंधित व्यावसायिकाने नुकसान टाळत स्वत:च नौका बंद करून टाकल्या. सुमारे वर्षभरापासून सुरू असलेल्या या सर्रास बेकायदेशीर प्रकाराकडे प्रशासनाने पूर्ण दुर्लक्ष केले होते. त्यासंबंधी बातम्या येत असूनही पदाधिकारी किंवा अधिकारी कोणीही हा प्रकार गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळेच मनपाला ५ पैसेही न देता पर्यावरणाची हानी करणारा हा उद्योग कसल्याही अडथळ्याविना सुरू होता.

आदिवासी संघर्ष समितीतर्फे राजूरला आज ‘रास्ता रोको’
अकोले, २ ऑगस्ट/वार्ताहर

निळवंडे धरणात पाणी अडविल्यामुळे आदिवासी भागातील २५ गावांमधील जनतेच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत. पिंपरकणे उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याशिवाय निळवंडे धरणात पाणी अडवू नये, अशी मागणी तालुका आदिवासी संघर्ष समितीने केली. या प्रश्नी सरकारला जाब विचारण्यासाठी उद्या (सोमवारी) राजूरला रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. ‘निळवंडय़ा’त पाणी अडविण्यास सुरुवात झाल्यामुळे प्रवरा नदीवरील पिंपरकणे येथील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे राजूरचा उत्तरेकडील २५ गावांशी संपर्क तुटला आहे. या गावांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या प्रश्नी राजूरला कोल्हार-घोटी मार्गावर पेट्रोलपंपासमोर रास्ता रोको आंदोलन आयोजित केले असल्याचे समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर झडे, संघटक विजय पिचड यांनी म्हटले आहे.

‘नगर तालुक्यातील निष्ठावंतांना राहुरी, श्रीगोंदे मतदारसंघात संधी द्या’
नगर, २ ऑगस्ट/प्रतिनिधी

मतदारसंघ पुनर्रचनेत नगर तालुका विधानसभा मतदारसंघाचे अस्तित्व संपुष्टात आल्याने आता या मतदारसंघातील पक्षाच्या निष्ठावंतांना राहुरी व श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघात उमेदवारीची संधी द्यावी, अशी मागणी नगर तालुका भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आली.
नगर तालुका मतदारसंघ आता राहुरी व श्रीगोंदे मतदारसंघात समाविष्ट झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील पक्षाच्या निष्ठावंतांचाच तिथे उमेदवारीसाठी हक्क आहे. बाहेरून पक्षात आलेल्यांना संधी देऊ नये, असा ठरावही या बैठकीत करण्यात आला. पक्षाचे तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा सरचिटणीस भानुदास बेरड, सुनील पंडित, बाळासाहेब पोटघन, रामदास आव्हाड, युवराज पोटे, रमेश पिंपळे, दादा बोठे, उदय अनभुले, विकास कोथंबिरे व तालुक्यातील अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.

हजारे यांच्या आंदोलनाला केडगावच्या नागरिकांचा पाठिंबा
नगर, २ ऑगस्ट/प्रतिनिधी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत केडगावमधील नागरिकांनी जाहीर सभेद्वारे आपल्या विविध मागण्यांचे निवेदन स्थानिक लोकप्रतिनिधींना दिले. बहुजन शेतकरी बहुउद्देशीय विकास प्रतिष्ठानने या सभेचे आयोजन केले होते. रस्ता चौपदरीकरणात केडगाव येथे भुयारी रस्ता किंवा उड्डाणपूल करावा, केडगाव शिवारातील शेतकऱ्यांना मनपाच्या मालमत्ता करातून वगळावे आदी २३ मागण्यांचे निवेदन या वेळी तात्यासाहेब कोतकर यांनी नगरसेवक भानुदास कोतकर, दिलीप सातपुते व अन्य लोकप्रतिनिधींना दिले. नानासाहेब शेजवळ यांनी ज्येष्ठ नागरिकांसंबंधी कायद्याची माहिती दिली.

लिपीकवर्गीय कर्मचारी उद्यापासून संपावर
श्रीरामपूर, २ ऑगस्ट/प्रतिनिधी

जिल्हा परिषदेचे लिपीकवर्गीय कर्मचारी मंगळवार (दि. ४)पासून विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन कडलग यांनी दिली.
जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वाहतूकभत्ता, घरभाडेभत्ता मिळावा, कनिष्ठ सहायक व कक्ष अधिकारी यांना ग्रेड पे व पे बॅण्ड देण्यात यावा, वेतनत्रुटी दूर कराव्या, अर्जित रजा पूर्ववत सुरू करून ती ३६० दिवस करावी, कालबद्ध पदोन्नतीची अट सात वर्षे करावी, एलटीसी रजा सवलत लागू करावी, अनुकंपा तत्त्वावरील पदे भरावीत, स्वेच्छानिवृत्ती लागू करावी आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत. बेमुदत संपात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा सचिव बाळासाहेब व्यवहारे, राजेंद्र मोरगे, कार्याध्यक्ष जयराज बारवकर, जालिंदर कांबळे, सखाराम शेळके, भाऊसाहेब मुरदारे यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास होणे आवश्यक- शिंदे
नगर, २ ऑगस्ट/प्रतिनिधी

केवळ गुणपत्रिकेतील गुणांवरून विद्यार्थ्यांची गुणवत्ता ठरत नाही. शिक्षणातील गुणांबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आर्य इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटचे प्राचार्य गणेश शिंदे यांनी येथे केले. कायनेटिक इंजिनिअरिंग एम्प्लॉयमेंट क्रेडिट सोसायटीच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सोसायटीचे अध्यक्ष पी. के. कटारिया अध्यक्षस्थानी होते. शिंदे म्हणाले, की विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास साधण्याची जबाबदारी त्यांच्या पालकांची आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच सामाजिक बांधीलकी, परोपकारी भावना, संस्कृती-देश-मातृभाषेबद्दल आदर ठेवण्याचे संस्कार त्यांच्यावर करावेत. शिंदे यांच्या हस्ते इयत्ता १ ली ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र व शालेय भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. सी. एम. कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. जे. एस. बोरगे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला कंपनीचे व्यवस्थापक एस. एस. गुळवे, सोसायटीचे उपाध्यक्ष बी. आर. महाडिक, संचालक एस. बी. मुनोत आदींसह संचालक, सभासद, त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

महात्मा फुले व डॉ. आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी
नगर, २ ऑगस्ट / प्रतिनिधी

शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांचे पूर्णाकृती पुतळे उभे करावेत, असे नगरसेवक विजय गव्हाळे यांनी अंदाजपत्रकीय सर्वसाधारण सभेत सुचवले. नगरसेवक निखिल वारे व बाळासाहेब पवार यांनी सावेडी परिसरात स्मशानभूमीसाठी तरतूद करण्याची मागणी केली. गणेश भोसले यांनी सार्वजनिक उद्यानात खेळणी बसविण्यासाठी केलेली पाच लाख रुपयांची तरतूद वाढविण्याची सूचना केली. सभेतील चर्चेनंतर महापौर संग्राम जगताप यांनी सर्व नगरसेवकांना त्यांच्या मागण्या लेखी स्वरूपात देण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत विनय गव्हाळे व अन्य नगरसेवकांनी सूचना केल्या. बाजार समिती चौकातील सध्याचा डॉ. आंबेडकर यांचा अर्धपुतळा काढून तेथे पूर्णाकृती पुतळा उभा करावा व सुशोभीकरण करावे, महात्मा फुले यांचाही पूर्णाकृती पुतळा शहरात कुठेही नाही, या विषयी खंत व्यक्त करत गव्हाळे यांनी मनपा प्रशासनाने फुले-आंबेडकरवादी जनतेचे हे स्वप्न पूर्ण करावे, असे सुचविले. अंदाजपत्रकावर अखेरचा हात फिरविण्यापूर्वी गव्हाळे व अन्य नगरसेवकांच्या मागण्यांचा विचार करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले.

वाहनांतील पेट्रोल चोरीमुळे नागरिक वैतागले
नगर, २ ऑगस्ट/प्रतिनिधी

पेट्रोल चोरणारी टोळी शहरात कार्यरत झाली असून, पोलिसांची गस्त नसल्याने या टोळीचे चांगलेच फावले आहे. मोटारसायकलीच्या चोऱ्यांपाठोपाठ आता पेट्रोल चोरांनी नागरिकांना त्रस्त केले आहे. सुडकेमळा येथे पेट्रोल चोरण्याचे प्रकार घडत आहेत. किरकोळ घटना म्हणून त्यांची दखल कोणी घेत नाही. रोज अर्धा लीटर पेट्रोल चोरी जात असेल तर नागरिक तरी फिर्याद कशी देणार असा प्रश्न आहे. या परिस्थितीचा फायदा उठवत भुरटे चोर पेट्रोल लांबवतात. सुडके मळा येथे तीन-चार दिवसांपूर्वी मोटारसायकलमधून तिघेजण पेट्रोल काढून घेत असताना एका वकिलाने पाहिले. ते ओरडल्याने चोर पळाले. रात्री बाराच्या पुढे हे चोर बाहेर पडतात आणि पहाटेपर्यंत फिरतात. जमलं तर दुचाकी चोरायची, ते न जमल्यास पेट्रोल चोरायचे, असा उद्योग या भुरटय़ांचा आहे.