Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

नवनीत

योगीजनांमध्ये परिवर्तन झाले. ते नानकदेवांचे शिष्य बनले. त्यांनी विचित्र पोषाख सोडले. विचित्र मुद्रांचा त्याग केला. ते समाजाच्या पूर्ण स्तरात जाऊन मिळूनमिसळून राहू लागले. त्यांच्या सुखदुखात सहभागी झाले. ते जनमित्र झाले. आपल्या शक्तिसामर्थ्यांने त्यांनी इतरांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सुरू केला. नानकदेवांना हेच हवे होते. ते शिष्यांना म्हणाले, ‘हे जे इथे शक्य झाले ते मला

 

आपल्या देशात गावोगावी व्हावे असे वाटते. संन्यास, विरक्ती ही सेवासाधना आहे. अकर्मण्यतेचा तो परवाना नव्हे. आपल्याकडे बहुतेक साधुयोगी निष्क्रिय असतात. ते घरीदारी जाऊन भिक्षा मागतात. त्या भिक्षेवर उदरनिर्वाह करतात. हे अगदी लाजिरवाणे आहे. जो माणूस म्हणून जन्माला येतो, त्याला शरीर आणि अवयवसंपदा मिळाली, त्याने या सर्वाचा प्रथम सदुपयोग करायला हवा. जर विरक्त व्हायचे तर मग कोणाकडे काहीच मागायचे नाही. केवळ विभूती फासून वावरणे हा खरा धर्म नव्हे. अशा विकृत व्यक्तींनीच आपला पुरातन धर्म मोडकळीला आणला. सर्वसामान्य माणसांना दिशाहीन करून ठेवले.’ एका शिष्याने विचारले- ‘गुरुजी, यामुळेच तर आपल्या देशावर अतिक्रमणे झाली नाहीत काय?’ गुरुजी- ‘अगदी बरोबर. आपल्या देशावर कितीतरी आक्रमणे केवळ यातून आली. इथल्या लोकांची निष्क्रियता, साधुत्वाच्या नावाखाली ढोंगबाजी, अध्यात्माच्या-आत्मज्ञानाच्या ऐवजी चमत्कार वाढले. यामुळे जे इथले चांगले ते मलिन झाले. वाईटच फोफावले. जे बाहेरून आले ते सज्जन नव्हते. त्यांचे क्रौर्य तर मोठे होतेच, पण त्यापेक्षा त्यांचे धैर्य का मोठे ठरले? त्यांना वाटले की, जर आपण असंस्कृत आहोत तर हे लोक तरी कुठे सुसंस्कृत आहेत? आपण बाहेरून येऊन या लोकांना गुलाम बनवतो. त्यात पुरुषार्थ तरी आहे. इथे तर इथलेच लोक आपल्याच लोकांना फसवतात. हे काय थोर परंपरेचे वारसदार आहेत? आपण यांच्यावर सहज राज्य करू शकतो.’ गुरुजींच्या या साऱ्या सांगीमध्ये एक विलक्षण समाजभावना होती. देशनिष्ठाही होती. सिद्धजनांवर या साऱ्याचा पुष्कळ खोल परिणाम झाला. हिमाचलच्या कुशीत निरुद्देश भरकटणारे शक्तिमान लोक पुन्हा आपल्या गावाकडे परतू लागले. एकाने गुरुजींना म्हटले, ‘आम्हाला उपरती तर झाली. आम्ही आमच्या गावी परत गेल्यावर लोक आमच्याकडे संन्यासी म्हणूनच पाहणार. आम्ही नेमके काय करावे, ज्यामुळे आम्हाला पुन्हा जनजीवनात सहजपणे सामावून जाता येईल?’ गुरुजींनी त्यांच्यासमोर कर्तारपूरचा आदर्श ठेवला. एखादा उजाड माळ पाहावा, तिथे भरपूर कष्ट घेऊन फळबाग फुलवावी, मशागत करून शेती करावी. निसर्गापाशी जे जे आहे -हवा, पाणी, प्रकाश- याला कर द्यावा लागत नाही. थोडे कष्ट मात्र करायला हवे असतात. जसे निसर्गाचे देणे कोण्या एकटय़ादुकटय़ासाठी असत नाही. ते सर्वाना मिळते, तसेच आपल्या श्रमाचे करावे. श्रमाची फळे साऱ्यांनी वाटून खावीत. अनेक सिद्धयोगी कर्तारपूरकडे वळले. तिथे सफल झालेला सामूहिक शेतीचा प्रयोग त्यांनी पाहिला आणि त्यापासून प्रेरणा घेऊन ते आपल्या गावाकडे निघाले.
अशोक कामत

न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताचं खगोलशास्त्राच्या दृष्टीने महत्त्व काय आहे?
जमिनीवर पडणारी वस्तू, समुद्राला येणारी भरती, चंद्राचं पृथ्वीशी (आणि विविध ग्रहांचं सूर्याशी) जखडलेलं असणं, ताऱ्यांचं दीर्घिकेत एकत्र राहणं, या सगळय़ामागचं कारण गुरुत्वाकर्षण हे आहे. या गुरुत्वाकर्षणाचं स्वरूप सर्वप्रथम आयझ्ॉक न्यूटनने जाणलं. दोन वस्तू गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे एकमेकांकडे खेचल्या जातात. वस्तू जितक्या वजनदार तितकं हे बल जास्त. या बलामुळेच आपल्या ग्रहमालेचं ९९.८ टक्क्यांहून अधिक वस्तुमान आपल्याकडे बाळगणारा प्रचंड वजनाचा सूर्य हा ग्रहमालेवर अधिराज्य गाजवत आहे. गुरुत्वाकर्षणाची तीव्रता ही वस्तूंच्या वजनाबरोबरच त्या वस्तूंमधील अंतरावर अवलंबून असते. या वस्तूंमधील अंतर जितकं कमी, तितकी या बलाची तीव्रता अधिक. चंद्रावर सूर्याचं गुरुत्वाकर्षण असूनही चंद्र हा पृथ्वीशी अधिक दृढपणे जखडला गेला आहे, तो पृथ्वीच्या अगदी जवळ असल्यामुळे!
गुरुत्वाकर्षणाचं बल हे दोन्ही वस्तूंवर कार्यरत असतं. यामुळे फक्त सूर्यच ग्रहांना ओढत असतो असे नाही, तर ग्रह हेसुद्धा सूर्याला आपल्याकडे ओढत असतात; परंतु सूर्याला परिणामकारकरीत्या ओढण्यासाठी प्रचंड बलाची आवश्यकता असल्यामुळे ग्रहांनी सूर्यावर घडवलेला परिणाम लक्षात येत नाही. एकमेकांना ओढणाऱ्या दोन्ही वस्तू जवळपास सारख्या वजनाच्या असल्या तर मात्र हा परिणाम सहज लक्षात येतो. अशा परिस्थितीत दोन्ही वस्तू या दोघांच्या दरम्यान असलेल्या एका सामाईक बिंदूभोवती ओढल्या जात असतात. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटनने इ.स. १६८७ साली प्रिंसिपिआ या ऐतिहासिक ग्रंथाद्वारे प्रसिद्ध केला. मूळ लॅटिन भाषेतील हा ग्रंथ तीन खंडांत लिहिला गेला आहे. या ग्रंथाच्या पहिल्या खंडात न्यूटनने आपल्या गतीविषयक सर्वसाधारण नियमांचं विवेचन केले आहे, तर तिसऱ्या खंडात न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा नियम मांडून त्याच्या साहाय्याने ग्रहगोलांच्या गतीचं स्पष्टीकरण दिलं आहे.
राजीव चिटणीस
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या पत्नी गोपिकाबाई या पेशव्यांच्या सर्व स्त्रियांत हुशार, गुणग्राहक होत्या. त्यांच्या महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे त्या अधिक करारी, उग्र बनल्या. त्यांना इतरांचा मोठेपणा सहन होत नव्हता. भाऊसाहेबांचा दरबारातील वचक, राघोबाचा दरारा, मस्तानीचा पुत्र, समशेर बहाद्दराचा पराक्रम हे गोपिकाबाईंना खुपत असे.त्यांच्या वाटेला जेवढे दुख आले तेवढे कोणत्याही पेशव्यांच्या स्त्रीला आले नाही. स्वतच्या हयातीत पतीसह पाचही मुले -दोन बालपणी व तीन कर्तर्ेेपणी- मृत्यू पावल्याने त्यांची अवस्था भ्रमिष्टासारखी झाली. काही काळ जोगीण बनून त्या मठात राहिल्या. पुढे आपला नातू सवाई माधवरावांना पेशवेपद मिळाल्याचे पाहिल्यावर त्या पुण्यात आल्या होत्या, असे म्हणतात. ३ ऑगस्ट १७८८ रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. संजय शा. वझरेकर

दूर क्षितिजापलीकडे पऱ्यांचा गाव होता. छोटी सुंदर घरं चमचम करायची. बागांमधली रंगीबेरंगी फुले सुगंध उधळायची. झाडांना पानापेक्षा फळेच जास्त असायची. पक्षी सोनेरी रंगाचे, तर प्राणी चंदेरी रंगाचे. पऱ्यांच्या गावात रस्ते मात्र नव्हते, कारण पऱ्या चालायच्याच नाहीत कधी. त्या फक्त आपले नाजूक पंख पसरून हवेत उडायच्या. पऱ्यांच्या गावात माणसाच्या गावासारखेच प्रत्येकाला काम करावे लागे. कामं ठरलेली असायची प्रत्येकाची. ‘चमचमीत’ परी जेवण करायची, ‘करकर’ परी कापड कापून कपडे शिवायची, ‘ठाकठोक’ परी जोडे करायची. प्रत्येकीला एक ठराविक काम दिले गेले होते. ही गोष्ट आहे त्यातल्याच एका परीची. तिचं नाव फुगूचिडू. फुगुचिडू सतत वैतागलेली, रागावलेली, रुसलेली असायची. खरंतर पऱ्यांनी कसं आनंदी, हसरं असावं. पण फुगूचिडू तशी नव्हती. अगदी एकाकी होती. कारण तिला मैत्रिणी नव्हत्या. दोष तिचाच होता. ज्याच्या-त्याच्यावर ती फक्त चिडायची. चमचमीत परीवर ती खेकसली, किती मीठ घालतेस? नीट जेवण करता येत नाही का? करकर परीवर चिडली- ब्लाऊज लांब का शिवलास म्हणून. तिच्या पुतणीला गोडूसोनूला कळायचं नाही की, आपली आत्या अशी सारखी फुगून का बसते. ‘तू दुसऱ्यांचे नेहमी दोष काढून स्वतला का त्रास करून घेतेस?’ गोडूसोनू विचारे. फुगूचिडू ओरडून म्हणे, ‘कारण सगळे मूर्ख आहेत. काही उपयोगाचे नाहीत.’ सगळय़ा पऱ्या तिच्या स्वभावाला कंटाळल्या. चमचमीत म्हणाली, ‘मला मिठाचा अंदाज नाही. तुझं तूच कर जेवण.’ करकर म्हणाली, ‘मला नीट शिवता येत नाही. तूच शिव तुझे कपडे.’ छुनछुन परीने नाच शिकवणे सोडून दिले. गोडगोड परीनं मध देणं नाकारलं. नाक उडवून फुगूचिडू म्हणाली, ‘त्यात काय एवढं. करीन माझं मी सगळं. मुळीच गरज नाही मला तुमची.’ तिने कणिक मळली. पण पोळय़ा लाटताना नकाशे झाले. भाजी सगळी जळून गेली. पण फुगूचिडूनं हार मानली नाही. कापड आणून तिनं ब्लाऊज, परकर कापला. शिवताना लक्षात आले की, ब्लाऊजचे हात उलटे लागलेत अन् परकर आखूड झालाय. मध खाऊन भूक भागवू म्हणून ती मध आणायला गेली, तर मधमाशांचा थवा तिच्यामागं लागला. तिला डंख मारू लागला. सुजऱ्या चेहऱ्याने, भुकेल्या पोटाने फुगूचिडू घरी आली. तिला रडू आले. गोडूसोनूनं तिच्या सुजलेल्या चेहऱ्याला औषध लावत विचारलं, ‘असं किती दिवस करणार तू?’ फुगूचिडूनं विचार केला. ती गोडूसोनूला म्हणाली, ‘सगळय़ा पऱ्यांची मी माफी मागते. मी आजपासून स्वतला बदलेन. सगळय़ांशी मिळूनमिसळून, गोडीने वागता येते. दुसऱ्याची एखादी गोष्ट आपल्याला आवडली नाही तर त्याचा अपमान न करता चांगल्याप्रकारे सांगता येते. नाहीतर एकटेपणा वाटय़ाला येतो.’ आजचा संकल्प- मी सर्वाशी नीट वागेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com