Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

‘फ्रेंडशिप डे’ला तरुणाईचे उधाण
नागपूर, २ ऑगस्ट/प्रतिनिधी

रंगीबेरंगी कपडे.. हातावर आकर्षक फ्रेंडशिप बँड.. रस्त्यात भेटणाऱ्या ओळखीच्या व्यक्तीला

 

‘फ्रेंडशिप डे’च्या शुभेच्छा देत दरवर्षीप्रमाणे नागपुरातील तरुणाईने यंदाही ‘फ्रेंडशिप डे’ उत्साहात साजरा केला.
कुठलाही ‘डे’ उत्साहात साजरा करण्यासाठी शहरात प्रसिद्ध असलेला तेलंगखेडी तलाव परिसर, वेस्ट चिल्ड्रेन्स ट्राफीक पार्क, हायकोर्ट रोड, लॉ कॉलेज चौक, पूनम चेंबर्स, वर्धमानगरातील पूनम मॉल्स, व्हरायटी चौकातील अलीकडेच सुरू झालेला सिनेमॅक्स मॉल्स याठिकाणी तर तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले होते. एकत्र येऊन एकमेकांना ‘फ्रेंडशिप डे’च्या शुभेच्छा दिल्या. एरवी वेस्ट हायकोर्ट रोडवर भरधाव बाईक पळवण्यापेक्षा एका ठिकाणी जमून अनेकांनी ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला तर, काहींनी धरमपेठ, लॉ कॉलेज चौकातील कॉफी शॉप्स आणि कॉफी डे याठिकाणी बसून ‘फ्रेंडशिप डे’चा आनंद लुटला.
‘व्हॅलेंटाईन डे’ ला वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना करावी लागलेली कसरत ‘फ्रेंडशिप डे’ला करावी लागली नाही. मात्र, शंकरनगर ते लॉ कॉलेज चौकापर्यंत सिग्नल्स सुरू असतानाही वाहतूक पोलीस वाहतुकीचे नियंत्रण करीत होते. तेलंखेडी तलाव परिसर तर नागरिकांनी फुलून गेला होता. त्यातच रविवार असल्याने सर्वच वयोगटातील नागरिक येथे उपस्थित होते. याठिकाणी सायंकाळी रस्त्याच्या कडेला गाडय़ा लावून तलावाच्या काठावर नागरिक बसले होते, तर अनेक वाहनचालक तरुण-तरुणी गाडय़ा दामटताना दिसत होते. त्यातच या ठिकाणी उंटावरून सवारी करणाऱ्यांची संख्या काही कमी नव्हती. त्यामुळे सायंकाळी पाच ते साडेसात यावेळेत तर या रस्त्याला जत्रेचे रूप आले होते. सध्या व्हीआयपी मार्गावरील नव्यानेच झालेला चिल्ड्रेन्स ट्राफीक पार्कही सर्वच वयोगटातील नागरिकांच्या गर्दीने फुलून गेला होता.
रविवार असल्याने सहाजिकच हा दिवस साजरा करताना तरुण-तरुणींमध्ये विशेष उत्साह होता. रविवारमुळे शाळा, महाविद्यालय बंद असल्याने आज शहरातील हॉटेल्स, रेस्टारेंट, कॉफी शॉप्स, मॉल्स, मल्टिप्लेक्स इत्यादींमध्ये ‘फ्रेंडशिप डे’ साजरा करण्यात आला. शाळा, महाविद्यालये सुरू झाल्यानंतर ‘डे’ संस्कृतीमधील हा पहिलाच दिवस असल्यामुळे तरुण-तरुणींमध्ये हा दिवस सेलिब्रेट करताना विशेष उत्साह दिसून येत होता. हा दिवस साजरा करण्यासाठी अनेकांनी आधीच तयारी करून ठेवली होती. त्यांच्या आवडत्या मित्र-मैत्रिणींसाठी फ्रेंडशिप बँड, रिबीन, भेटवस्तू, शुभेच्छापत्र, फोटो फ्रेम्स्, ब्रेसलेटस् खरेदी करून ठेवले होते. ‘फ्रेंडशिप डे’ला पिवळ्या गुलाबाच्या फुलांना विशेष मागणी असल्याने आज अनेक दुकानेही पिवळ्या गुलाबाच्या फुलांनी सजली होती.
केवळ तरुणाईच नव्हे, तर शाळकरी मुला-मुलींसह सर्वच वयोगटातील नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन ‘फ्रेंडशिप डे’ उत्साहात साजरा केला. मोबाईल नेटवर्क जाम होण्याच्या भीतीने अनेकांनी शनिवारी रात्रीपासून मित्र-मैत्रिणींना एसएमएस पाठवणे सुरू केले होते. गुलाब विक्रेत्यांनीही या संधीचा फायदा घेऊन दोन-तीन रुपयांचे फूल १०-१५ रुपयांना विकले.