Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

सणासुदीच्या तोंडावर गहुही कडाडला
नागपूर, २ ऑगस्ट/प्रतिनिधी

साखर, डाळी, भाज्या यानंतर गव्हाच्या किमतीत वाढ झाल्याने ऐन सणासुदीच्या दिवसात

 

सर्वसामान्यांवर पुन्हा महागाईचे संकट ओढवले आहे. एकीकडे सरकारकडून सतत वाढत असलेली महागाई आटोक्यात आणण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचे दावे करण्यात येत असले तरी दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढतच आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट चांगलेच कोलमडले आहे.
गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे अन्नधान्याच्या उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट झाली होती. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच धान्याच्या किमतीत वाढ झाली होती. उन्हाळ्यात साधारणत: धान्य खरेदीला सुरुवात होते. या काळात गहू, डाळी आणि तांदूळ खरेदी करून साठवणूक करण्यात येते. मात्र, यंदा सुरुवातीला किमती अधिक असल्याने नागरिकांनी खरेदीकडे पाठ फिरविली होती. दरम्यान, काही काळानंतर भाव कमी झाले होते. मात्र, आता पुन्हा इतर धान्यांप्रमाणेच या भावात वाढ झाली आहे. गव्हाची चांगली प्रत येत नसल्याने गव्हाच्या किमती वाढल्या आहेत.
मार्चच्या पहिल्या आठवडय़ात गव्हाचे नवे पीक बाजारात येते. मात्र, यंदा हिवाळ्यात फारशी थंडी न पडल्याने गव्हाच्या पिकावर मोठय़ा प्रमाणात परिणाम झाला. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी ११०० ते १२०० रुपये क्विंटल असलेला गहू सध्या १७०० ते १८०० रुपये क्विंटलने विकला जात आहे. त्यातच बाजारात येत असलेले नवे पीक चांगल्या दर्जाचे नसल्याने पुढील काही दिवसात चांगल्या गव्हाच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने गव्हाच्या आधारभूत किमतीत प्रती क्विंटल ८० रुपये वाढ केली असून, हा दर आता ११०० रुपये झाला आहे.
सध्या पावसाळ्यामुळे गव्हाला विशेष मागणी नसल्याने एकूणच बाजारात मंदीचे वातावरण आहे. मात्र, ज्या काही थोडय़ा प्रमाणात खरेदी होत आहे ती वाढीव दरानेच होत असल्याचे बाजारातून सांगण्यात येत आहे. गव्हाप्रमाणेच डाळ, साखर यांचीही भाववाढ झाल्याने सर्वसामान्यांचे बजेट सध्या चांगलेच कोसळले आहे. त्यातच श्रावण महिना असल्याने सध्या सणासुदीचे दिवस असल्याने ग्राहकांवर महागाईचा चांगला बोजा पडणार आहे.