Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

दुर्मिळ माळढोकच्या संरक्षणसाठी पक्षीमित्र सरसावले
*राज्यभरात आजपासून पक्षीगणना
* देशात अवघे ५०० माळढोक
नागपूर, २ ऑगस्ट / प्रतिनिधी

वन्यजीव संरक्षण कायदा-१९७२ नुसार पट्टेदार वाघ आणि बिबट यांच्याप्रमाणेच शेडय़ूल-१ चा

 

दर्जा असलेल्या दुर्मिळ माळढोक पक्ष्याची (ग्रेट इंडियन बस्टार्ड) गणना उद्या, सोमवारपासून सुरू होत आहे. मुख्य वन्यजीव वार्डन ए.के. जोशी यांनी माळढोक प्रगणनेचे आदेश जुलैच्या प्रश्नरंभी जारी केले. विदर्भातील वरोरा वन्यक्षेत्र, नागपूर वन विभाग तसेच, सोलापूरच्या नान्नज येथील माळढोक अभयारण्य आणि नाशिक वन्यजीव विभागात माळढोक पक्ष्यांची नेमकी संख्या जाणून घेण्यासाठी ही प्रगणना केली जात आहे.
भारतीय उपखंडात कधीकाळी मोठय़ा संख्येने आढळणारा माळढोक हा उंच आणि देखणा पक्षी कालौघात दुर्मिळ होत चालला आहे. महाराष्ट्रात आता माळढोक फारसे शिल्लक राहिले नाहीत. गेल्या वर्षीपर्यंत नान्नजच्या जंगलात २६ तर, वरोरा तालुक्यातील वनोजा-मारडा खेडय़ात ७ आणि उमरेड वन परिक्षेत्रात २ माळढोक पक्षी आढळून आले होते. यंदा ही संख्या वाढली असावी, अशीही अपेक्षा नाही. कारण, शेताचे नुकसान करत असल्याने या पक्ष्याला मारून टाकण्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणात घडल्याचे सांगितले जाते. वन्यजीव अभ्यासक कुंदन हाते यांनी दिलेल्या माहितीनुसार माळढोक पक्षी वर्षातून एक किंवा दोन अंडी देतो. त्यामुळे माळढोक पक्ष्यांची संख्या अत्यंत मर्यादित आहे. गवताळ भागात या पक्ष्याचा अधिवास असतो परंतु, गवताची कुरणे कमी झाल्याने त्यांचा मोर्चा शेताकडे वळला. उंचपुऱ्या पक्ष्याला धान्य आणि भक्ष्यही मोठय़ा प्रमाणात लागते.
वरोरा वन परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण तिखे यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षीच्या माळढोक गणनेत ७ माळढोक पक्षी दिसून आले. गेल्या १७ जुलैला टेंभूर्डाचे वन अधिकारी बी.टी. लालसरे यांना वरोरा परिसरात ४ माळढोक पक्षी उडताना दिसले. गेल्या वर्षीच्या पक्षीगणनेत ३ माद्या आणि एका नर माळढोक पक्ष्याची नोंद करण्यात आली होती. वरोरातील मारडा, एकोना आणि तुलानात माळढोक अनेक लोकांना रोज दिसतात. सोलापूर जिल्ह्य़ात माळढोक मोठय़ा संख्येने वास्तव्यास आहेत. नान्नजच्या माळढोक अभयारण्याची निर्मिती झाल्यापासून माळढोकला शिकाऱ्यांपासून संरक्षण मिळाले.
नर माळढोक साधारण १२२ सेमी उंचीचा तर, मादी माळढोक ९२ सेमी उंचीची असते. ग्रेट इंडियन बस्टार्ड राजस्थानचा राज्य पक्षी आहे. भारतात माळढोकच्या चार प्रमुख प्रजाती असून यात ग्रेट इंडियन बस्टार्ड, लेझर फ्लोरिकन, बेंगाल फ्लोरिकन आणि हौबारा श्ॉमिडॉईट्स प्रजातीचे माळढोक पक्षी राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकात आढळून येतात. १९८० साली देशभरातील माळढोक पक्ष्यांची संख्या १५०० ते २०००च्या आसपास होती. गेल्या २९ वर्षात यात सातत्याने घट होत गेल्याने अवघे ५०० माळढोक शिल्लक राहिल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये चिंतेची लाट निर्माण झाली आहे.
या पक्ष्याचे मांस खाण्याचा मोह होत असल्याने त्याला मारण्याचे प्रकारही काही वर्षापूर्वी घडलेले आहेत परंतु, पर्यावरणातील माळढोकचे महत्त्व लक्षात घेता पक्षीमित्रांनी संघटितपणे त्याच्या संरक्षणासाठी पावले उचलली असून उद्यापासून सुरू होत असलेल्या माळढोक पक्षीगणनेत विदर्भातून भरभरून प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ गोपाळ ठोसर, डॉ. अनिल पिंपळापुरे, राजू कसंबे, कुंदन हाते यांनी व्यक्त केली आहे.