Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

समापनाच्या संगीत संध्येमधील गायन, वादन आणि नर्तन
डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोह
डॉ. सुलभा पंडित

डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीतसभेची समापनाची तिसरी संगीत संध्या गायन, वादन, नर्तनाने

 

संपन्न झाली. या संगीतसभेची सुरुवात सरोदवादनाने झाली. नव्या दमाचे सरोदवादक जयदीप घोष यांनी यापूर्वी १८ वर्षापूर्वी कृष्णराव शंकर पंडित संगीत सभेत हजेरी लावली होती. या आठवणीला उजाळा देऊन आजचे तयारीचे वादक म्हणून ते रसिकांसमोर हजर होते. ‘मियाँ की मल्हार’ या औचित्यपूर्ण रागाने त्यांनी ‘मल्हार’ रागाशी संलग्न अशा वर्षाऋतूचे वातावरण उभे केले. मल्हार म्हणजे पाऊस, प्रसन्नता आणि उल्हास होय. त्याच्या सरोदवादनातून या चैतन्यपूर्ण सुंदर, अनुभूतीचे प्रत्यंतर आले. सुरुवातीला माफक असे रागवाचक आलाप करून, फारसे ‘जोडकाम’ वा ‘झाला’ न वाजविता त्यांनी सरळ गतवादन सुरू केले. तबीयतदारपणे केलेल्या थोडय़ा आलापीतूनच ‘मल्हार’चे स्वरूप उभे झाले. ‘मियाँ मल्हार’ मधील दोन निषादांचे सौंदर्य त्यांनी छान खुलवले. मध्य लय आणि त्यानंतर द्रुत लय तीनतालातील (बोल रे पपैहरा) बंदिशीवरील सौंदर्यस्थानाची नक्षी रेखाटत असता त्यांनी अनेक छान तिहाया घेतल्या. मध्यलयीतील दमदारपणा आणि द्रुतलयीतील आक्रमक जोरकस वादन श्रोत्यांना खिळवून ठेवणारे होते. प्रदीप पिल्ले यांची वजनदार तबला संगत सरोदवादनाला उठाव देणारी होती. एकूण या सुमारे तासभर बरसलेल्या मियाँ मल्हारच्या सरींवर सरींनी संगीतप्रेमी चिंब भिजून गेले. चांगल्या वादनाचा आनंद त्यांनी दिला.
त्यानंतर कविता खरवंडीकर मंचावर आल्या. त्यांचे गायन प्रथमच ऐकण्याचा योग आला. त्यांना धनंजय खरवंडीकर आणि विनायक वालदूरकर यांनी अनुक्रमे तबला व पेटी संगत केली, तर तानपुऱ्यावर होत्या सरोज देवधर आणि निरजा सप्तर्षी. राग ‘देस’ ची निवड करून कविता यांनी कार्यक्रमाचा प्रश्नरंभ केला. विलंबित आणि द्रुतलय तीन तालातील ‘बादल छाये’ आणि ‘कारी घटा छाई’ या दोन बंदिशी आणि द्रुतलय तीनतालातील ‘न त दीम तदीम’ हा तराणा त्यांनी प्रथम सादर केला. त्यांच्या आवाजाची रेंज चांगली आहे. आकाराच्या तानांचे सरही त्यांनी उत्तम प्रस्तुत केले. तराणा प्रस्तुतीमध्ये त्यांची शब्द स्वरांची फेक उत्तम होती. त्यानंतर त्यांनी आग्रा घराण्याची खादीम हुसेन यांची ‘चंद्रकंस’ रागातील बंदिश निवडली. ही चोखंदळ निवड लक्षवेधी होती. जयपूर घराण्याचा राग ‘संपूर्ण मालकंस’ चा भास होणारा हा राग व त्यातील रिपभाचा वेगळा दर्जा हे त्याचे वेगळेपण होते. ‘तिखे नैना तोरे’ ही मध्य लय तीनतालातील बंदिश त्यांनी आत्मविश्वासाने सादर केली. अखेर राग ‘सोहनी’ मधील होरी, ‘करे बरजोरी शाम’ आटोपरशीरपणे मांडली. यातील तोडी, बहार, मल्हारच्या छटा चांगल्या होत्या. एकूण त्यांच्या गायनात एक वेगळा ढंग आहे, हे लक्षात आले. अर्थपूर्ण आणि लक्षवेधी बंदिशीची निवड हे त्यांचे वैशिष्टय़े दिसले. घराणेदार तालीम मिळाल्यामुळे त्यांच्या गायनात आत्मविश्वास दिसतो. त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा करता येतील.
संपूर्ण संगीत समारोहाचे विशेष आकर्षण म्हणजे सारंगी-सहवादनाचा कार्यक्रम होता. सारंगी वादकांच्या घरातील पाचव्या पिढीतले वारसदार त्यांचा हा अमूल्य ठेवा जपून आहेत. १० वर्षापूर्वी यांचे वादन ऐकलेल्या जाणकारांना, आजचे त्यांचे वादन परत एकदा ऐकण्याची फार उत्सुकता होती. फारूख लतीफ खान आणि सरवर हुसैन यांचे सारंगी वादन व उस्ताद नफीस अहमद यांची तबला संगत ऐकणे हा एक अनोखा सांगीतिक अनुभव होता. पहिल्या आवर्तनापासून अखेरच्या समेपर्यंत जे श्रवणीय वाटावे असे श्रेष्ठ दर्जाचे वादन त्यांनी सादर केले. त्यांच्या वादनातील प्रत्येक क्षण ‘अवयव सगळे श्रवणी जमले’ असे करून ऐकण्याचा होता. मुळातच सारंगी वाद्याला एकग आर्त अशी आस असते. तारा सुरात असल्यावर त्यांचे जे गुंजन होते ते अतिशय गोड असते. वाजवणारा तयारीचा असेल तर जे स्वरांचे मोहजाल तयार होते ते केवळ लाजवाब असते. हा अनुभव या पूर्ण कार्यक्रमातून आला. फारूख लतीफ खान यांच्या सिद्धहस्त वादनाचे वजन आणि सरवर हुसैन यांचे नव्या दमाचे तोडीस तोड प्रत्युत्तर, यातून हे वादन रंगले. राग ‘गोरख कल्याण’चे झुमरासारखे अनवट तालातील तबीयतदार स्वरूप खरोखर अप्रतिम होते. एवढय़ा विलंबित लयीतील स्वरांचा मजा आजकाल क्वचितच मिळतो. त्यानंतर द्रुत तीन तालातील चुस्त बांधणीची गतही त्यांनी छान रंगवली. उस्ताद बुंदुखां यांच्या जागा जुन्या जाणकारांना दिसल्या. अकेर मिश्र खमाजमधील धून वाजवून त्यांनी घराणेदार वादनाचे समापन केले. त्यांच्या दृष्टीने हा वेळ कमीच पडला. त्यांचा स्वतंत्र कार्यक्रमच हवा.
नंदिनी घोषाल यांच्या देखण्या ओडिसी नृत्याने या संपूर्ण कार्यक्रमाचे समापन झाले. त्यांना उत्तम साथसंगत करणारे कलावंत होणे, सतारीसाठी जयंत बॅनर्जी, बासरी- जयंत चॅटर्जी, गायन- देवाशीष सरकार, पखवाज-किशोर घोष. ‘मंगला चरण’ ने गीत गोविंदमधील विष्णू वंदना सादर करून त्यांनी नृत्याचा प्रश्नरंभ केला. त्यानंतर ‘पल्लवी’ प्रकारासाठी त्यांनी संयुक्ता व रघुनाथ पाणीग्रही रचित बागेश्रीमधील एकतालात निबद्ध नृत्य प्रस्तुत केले. यातील विविध मुद्रा, साजशृंगार, वस्त्रभूषण वेढणे, हस्तमुद्रा, पदलालित्य अतिशय सुंदर व देखणे होते. अभिनयपक्षासाठी काझी नजऊल इस्लाम यांची बंगाली रचना त्यांनी निवडली. रामायण, महाभारतातील प्रसंग त्यातून समोर आले. विविध व्यक्तिरेखा आणि प्रसंग त्यातून साकार झाले व यानंतर त्यांनी घाईघाईने नृत्य संपवले. वस्तुत: बटु, मोक्ष असे प्रकार ओडिसीतून समोर येतात ते राहून गेले व एकूण प्रस्तुतीमधून एखादे चित्र अपुरे रहावे, तशी रुखरुख वाटली. अतिशय सुंदर, भावपूर्ण चेहरा, अटकर बांधा, गौरवर्ण अशा नंदिनी घोषाल यांना रंगमंचावर देखण्या नृत्य मुद्रांमध्ये त्रिभंगी दर्शनात पहाणे सौंदर्यपूर्ण होते. त्यांना वेळ कमी मिळाला ते का? एका दिवशी इतके कलावंत ठेवल्यास त्यांच्यावर व श्रोत्यांवर अन्यायच असतो. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र दुरूगकर व दीपक कुलकर्णी यांनी केले. रसिक पुढील उत्सवाच्या प्रतीक्षेत आहेत.
०७१२- २२८४८७२