Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

रेल्वेच्या ‘इज्जत’ साठी दोन दिवसात एकही अर्ज नाही
नागपूर, २ ऑगस्ट/ प्रतिनिधी
रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी असंघटित कामगारांसाठी मोठा गाजाबाजा करून सुरू केलेल्या

 

‘इज्जत’ मासिक पास योजनेकरिता दोन दिवस होऊनही एकही अर्ज आलेला नाही.
रोजगारासाठी खेडय़ापाडय़ातून शहराकडे मोठय़ा प्रमाणात कामगार स्थलांतर करतात. असंघटित कामगार अत्यल्प उत्पन्नामुळे शहरात घर घेऊन राहू शकत नाही. अशा कामगारांना दररोज शहरात कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अगदी स्वस्तात रेल्वे मासिक पास उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेल्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा झाली आणि १ ऑगस्टपासून अंमलबजाणी सुरू झाली आहे. ‘इज्जत’ मासिक सिजन तिकीट योजनेत केवळ २५ रुपयांत महिनाभर प्रवास करता येणार आहे. महिन्याचे उत्पन्न १ हजार ५०० रुपये किंवा त्याहून कमी असणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ‘इज्जत’ पासवर कमाल १०० किलोमीटर प्रवास दररोज करता येणार आहे परंतु, योजना सुरू होऊन दोन दिवस झाले तरी नागपुरातील मध्य रेल्वे तसेच, दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या विभागात एक अर्जही आलेला नाही.
या योजनेमुळे राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद आदी शहरांकडे रोजगारासाठी शेजारच्या परिसरातून धाव घेणाऱ्या असंघटित कामगारांची सोय झाली आहे. कामाच्या शोधात शहरात येऊन ते झोपडय़ापट्टय़ांमधून राहतात. त्यामुळे दिवसेंदिवस शहरातील झोपडय़ांमध्ये वाढ होत जाते. असंघटित कामगारांना १०० किलोमीटपर्यंत रोजगारासाठी ‘अप अँड डाऊन’ करता येणार आहे. साहजिकच यामुळे काही प्रमाणात का होईना शहरातील झोपडपट्टी वाढण्यास आळा बसेल, असे प्रशासनाला वाटते.
विद्यमान लोकसभा खासदार, विद्यमान राज्यसभा खासदार, जिल्हा न्यायदंडाधिकारी, बी.पी.एल. कार्ड किंवा रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकाने जारी केलेल्या उत्पन्नाच्या दाखल्याच्या आधारावर ‘इज्जत’ मासिक सिजन तिकीट वितरित केले जाणार आहेत. उत्पन्नाचा दाखल दोन वर्षापर्यंत वैध राहणार असून प्रत्येक महिन्याला ‘इज्जत’ पास घेताना ते सोबत असणे आवश्यक असणार आहे. रेल्वे स्थानक व्यवस्थापक, स्टेशन मास्टर यांच्याकडे याबाबत सर्व माहिती उपलब्ध करण्यात आली असून प्रत्येक यूटीएस, करन्ट बुकिंग काऊंटर ‘इज्जत एमएसटी’ वितरित करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे विभागीय वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक प्रदीपकुमार यांनी सांगितले.