Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

झलक नागपूरची
बंधुत्व प्रेम

नाते जपण्यासाठी कौटुंबिक आणि सामाजिक बांधीलकी जपण्यासाठी सामाजिक सण नेहमी एकत्र

 

येऊन आपण साजरे करतो पण, आपले आणि आपल्या मातृभूमीचे रक्षण करणारे सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी काही करायचे म्हटले तर तिही सामाजिक बांधीलकीच. असेच काही घडले ते सी.पी.एन्ड बेरार शिक्षण संस्थेच्या विविध शाखेतील मुलींनी सीमेवर लढणाऱ्या बहाद्दर जवानांना पाठविण्यासाठी राख्या बनवून कामठी येथील कर्नल वेलूस्वामी यांच्याकडे सुपुर्द केल्या. कार्यक्रमाआधी कर्नलला राखी बांधली त्यावेळी त्यांचे डोळे भरून आले. राखी बांधल्यावर भावाकडून ओवाळणी दिली जाते परंतु, ते डय़ुटीवर असल्यामुळे कर्नल दबक्या आवाजात म्हणाले, ‘बहेना आपको तो अभी मै कुछ दे नही सकता. आपका गिफ्ट उधार रहा. मगर मै वादा करता हूँ, आपकी मातृभूमी और बहेना, आप पर कभी आँच नही आने दुँगा. यही मेरा तोहफा है’ असे सांगून त्यांनी सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी पाठविलेल्या राख्या स्वाकारल्या. हा सुध्दा या महाविद्यालयाच्या मुलींसाठी मोठा तोहफाच ठरला.
बळी तो कान पिळी
सध्या राज्यात संपाचे वारे आहेत. शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी संपाचे अस्त्र उपसून सर्वसामान्यांनाच वेठीस धरले आहे. निवासी डॉक्टरांनी तब्बल सात दिवस रुग्णांना वेठीस धरून विद्यावेतनात घसघशीत वाढ करून घेतली. वीज कर्मचाऱ्यांनीही ऐन भारनियमनाच्या काळात याच अस्त्राचा वापर करीत ३० टक्के वेतनवाढ मिळवून घेतली. सरकारी डॉक्टर आणि प्रश्नध्यापकांनीही संपाचेच हत्यार उपसून वेतनवाढ पदरी पाडली. या वाहत्या गंगेत हात धुऊन घेण्यासाठी सरकारी कर्मचारी आणि एस.टी.च्या कर्मचाऱ्यांनीही संपाचा इशारा दिला आहे. रुग्णसेवा हा डॉक्टरांचा धर्म समजला जातो परंतु मार्डच्या संपाने शासकीय रुग्णालयात येणाऱ्या गरीब रुग्णांचे मोठय़ा प्रमाणात हाल झाले. हा संप संपत नाही, तोच शालेय शिक्षक आणि प्रश्नध्यापकांनी त्यांच्या मागण्यांसाठी संप पुकारला. प्रश्नध्यापकांनाही सहावा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा सरकारला करावी लागली. येत्या दोन महिन्यात राज्य विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यांची अधिसूचना जाहीर होण्यापूर्वी व आचारसंहिता लागण्यापूर्वी कर्मचारी संघटनाही सरकारचे नाक दाबण्याची हीच योग्य वेळ असल्याचे लक्षात घेऊन संपाचे हत्यार उपसत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर कुणालाच, विशेषत: मोठय़ा संख्येतील मतदार असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना नाराज करण्याची जोखीम सरकार घेणार नाही. या संपाबरोबरच आता विविध मागण्यांसाठी ४ ऑगस्टपासून सरकारी व निमसरकारी कर्मचारी, राजपत्रित अधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना आणि राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. कर्मचारी संघटना आणि सरकार यांच्या भांडणात त्रास होतो तो सामान्य नागरिकांनाच. संघटनेच्या बळावर संप करा आणि सरकारला नमवून पाहिजे ते पदरात पाडून घ्या, असे धोरण जणू शासकीय कर्मचाऱ्यांनी अंमलात आणले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू केल्याचा बोजा शासकीय तिजोरीवर पडत असल्याचे नुकतेच नागपुरात आलेले अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनीही मान्य केले. मात्र, या कर्मचाऱ्यांना नाराज करण्याची ताकद कुणाही सरकारमध्ये नाही, असेच त्यांनी आडून सुचवले. हे केवळ संघटित शक्तीच्या बळावर शक्य होत आहे परंतु याचवेळी कोटय़वधी लोकांसाठी शेतीत राबून उत्पादन घेणारा शेतकरी, शेतमजूर, ठिकठिकाणी अंगमेहनतीची कामे करणारे मजूर, खाजगी क्षेत्रात कनिष्ठ श्रेणीची कामे करणारे कर्मचारी यांना महागाईची सर्वात जास्त झळ पोहोचत असताना केवळ ते संघटित नसल्यामुळे ना ते कुणाला काही मागू शकत, ना त्यांना काही देण्याची कुणाची तयारी आहे. ‘बळी तो कान पिळी’ हे सरकारी कर्मचाऱ्यांनी सिद्ध केले असताना ‘गरिबाचा कुणी वाली नाही’ हेही शाबित झाले आहे.
नगरसेवकांचा बालीशपणा
महापालिकेत अभ्यासू नगरसेवकांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. बहुतांश नगरसेवक नवीन असल्याने त्यांचा कामकाज शिकण्यातच वेळ जात आहे. मात्र, काही नगरसेवक नवीन असूनही त्यांच्या वागणुकीतला ‘बालीश’ पणा मात्र गेलेला नाही. सभागृहात मागच्या रांगेत बसायचे आणि बोलणाऱ्या सदस्यांची टिंगलटवाळी करायची, एवढाच त्यांचा उद्देश. सत्ताधारी पक्षातील काही तरुण आणि प्रथमच निवडून आलेल्या नगरसेवकांचा यात समावेश करावा लागेल. सभेचे महत्व, त्यात चर्चेला येणारे विषय आणि त्यावर चर्चा करायला सदस्य उठले की, या चौकडीचे एकच काम.. त्यांच्या भाषणात व्यत्यय तरी आणणे किंवा त्यांच्यावर ‘कॉमेन्ट’ पास करणे. विषयाच्या गांभीर्याची समज नसलेले या नगरसेवकांनी अडीच वर्षात सभागृहात तोंडदेखील उघडलेले नाही. स्वपक्षातील वरिष्ठांचा अनादर करणाऱ्या एका नगरसेवकाला तर अर्थसंकल्प पुस्तिकेचे वाटप होण्यापूर्वीच तो किती कोटीचा आहे, हे सांगण्याची घाई झाली होती. यावरून त्यांचा ‘बालीश’पणा उघड होतो. स्वतही बोलायचे नाही अणि इतर बोलत असतील तर त्यांच्या भाषणातही व्यत्यय आणायचा. शिस्तबद्ध पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या एका पक्षाच्या नगरसेवकाला ही न शोभणारी बाब आहे.
( ही झलक लिहिली आहे आमचे प्रतिनिधी मनोज जोशी, चंद्रशेखर बोबडे, राम भाकरे यांनी. नावाचा क्रम वृत्तांतानुसार आहेच, असे नाही.)