Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

महागाईच्या विरोधात विदर्भात शिवसेनेचा रास्तारोको
* सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
*वाहतूक खोळंबली
नागपूर, २ ऑगस्ट/ प्रतिनिधी / वार्ताहर
वाढत्या महागाईच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने विदर्भात ठिकठिकाणी निदर्शने व रास्ता रोको

 

आंदोलन करण्यात आले. म्हाळगीनगर चौकात सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे काही काळ िरंगरोडवरील वाहतूक खोळंबली होती. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या व प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही करण्यात आले. जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी झाले नाही तर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेने दिला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याच्या निषेधार्थ रविवारी नागपूरसह विदर्भात विविध ठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण नागपूरमधील म्हाळगीनगर चौकात रस्ता अडवण्यात आला होता. आंदोलनामुळे रिंगरोडवरची वाहतूक विस्कळीत झाली होती व वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
काँग्रेसने साठेबाजांच्या फायद्यासाठी भाववाढ केली आहे. त्यामुळे जनता पिळून निघत आहे. शासनाने भाववाढ कमी करण्यासाठी पावले उचलली नाहीत तर, आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी शेखर सावरबांधे यांनी दिला. दरम्यान, अकोल्यात रास्ता रोको व पुतळा दहन करणाऱ्या शिवसेनेच्या ६२ कार्यकर्त्यांना पोलिसांनी रविवारी अटक केली.
अकोल्यातील मदनलाल धिंग्रा चौक येथे शिवसेनेने रविवारी काँग्रेस सरकारविरुद्ध आंदोलन केले. काँग्रेसचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून त्याची गाढवावरून धिंड काढली आणि मदनलाल धिंग्रा चौकात पुतळ्याचे दहन केले. संतप्त कार्यकर्त्यांनी सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन करून वाहतूक रोखून धरली.
बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसैनिकांनी निदर्शने केली. खासदार प्रतापराव जाधव, आमदार विजयराज शिंदे, सेनेचे जिल्हा प्रमुखव्दय ज्ञानदेव मानकर व भास्करराव मोरे, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सिंधू खेटेकर, चंदा बढे, शांताराम जगताप, धनंजय बारोटे, डॉ. मधुसूदन सावळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
चंद्रपुरात शिवसेना शहर प्रमुख संदीप आवारी यांच्या नेतृत्वाखाली जटपुरा गेटजवळ तीव्र निर्देशने करण्यात आली. महागाईच्या भस्मासुराच्या पुतळय़ाला चपलांचा हार टाकून धिंड काढण्यात आली व आघाडी शासनाचा निषेध करण्यात आला.
राजुरात तालुका प्रमुख अॅड. राम धोटे व सुनील भोगावार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. राजुरा येथील जुने बस स्थानक परिसरात रास्ता रोको करण्यात आले.