Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

आज भरणार काँग्रेस उमेदवारांच्या मुलाखतींचा बाजार
नागपूर, २ ऑगस्ट/ प्रतिनिधी

जनसंपर्क मेळाव्याच्या निमित्ताने राज्यात विविध ठिकाणी आयोजित मेळाव्यांपैकी बहुतांश ठिकाणी झालेल्या वादावादी आणि तिकीट इच्छुकांची भाऊगर्दी या पाश्र्वभूमीवर उद्या सोमवारी विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या काँग्रेस उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्य़ात राष्ट्रवादीसाठी सोडण्यात आलेल्या जागेसाठीही उद्या मुलाखती होणार आहेत.
विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली नसली तरी काँग्रेसने तयारी यापूर्वीच सुरू केली आहे. जनसंपर्क अभियान हा यातलाच एक प्रकार होता. राज्यभर झालेल्या जनसंपर्क अभियानादरम्यान नांदेड, लातूर, वाशीमसह इतरही विभाग पातळीवरील मेळाव्यात खुद्द प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत गटबाजीचे उघड दर्शन घडले होते. नागपूर त्याला अपवाद ठरले असले तरी नागपूरची गटबाजी सर्वश्रुत आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर ती कमी होण्याऐवजी वाढतच गेलेली आहे. या पाश्र्वभूमीवर उद्या शहर आणि जिल्ह्य़ातील एकूण १२ विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. मुलाखतीसाठी प्रदेश काँग्रेसने नियुक्त केलेले निरीक्षक व जिल्ह्य़ाचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश उपाध्यक्ष शरद रणपिसे उपस्थित राहणार आहेत.
नागपूर शहरात पूर्व, मध्य, दक्षिण, उत्तर, पश्चिम आणि दक्षिण-पश्चिम, असे एकूण सहा तर, ग्रामीणमध्ये रामटेक, सावनेर, काटोल, उमरेड, कामठी आणि हिंगणा, असे एकूण १२ विधानसभेचे मतदारसंघ आहेत. शहरातील मतदारसंघाच्या मुलाखती देवडिया भवनात सकाळी १०.३० वाजतापासून तर, ग्रामीणच्या मुलाखती दुपारी २ वाजतापासून सुरू होणार आहेत. विशेष म्हणजे, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत हिंगणा आणि काटोल हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात असतानाही या दोन्ही मतदारसंघासाठी उद्या इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. शहर आणि ग्रामीणमधील आजची गटबाजी लक्षात घेता उद्या मुलाखतीच्या निमित्ताने गोंधळ उडण्याची शक्यता आहे. मात्र, ग्रामीण काँग्रेसच्या अध्यक्ष सुनीता गावंडे आणि शहर अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता यांनी गोंधळाची शक्यता फेटाळून लावली असून सर्व मुलाखती शिस्तबद्धरित्या पार पडतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
नागपूर शहरात काँग्रेसमध्ये विद्यमान खासदार विलास मुत्तेमवार यांचा एक तर, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, राज्याचे गृह राज्यमंत्री नितीन राऊत, अनिस अहमद यांचा दुसरा गट आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात चतुर्वेदी, राऊत आणि अहमद यांनी काम केल्याचा आरोप खुद्द खासदार विलास मुत्तेमवार यांनी निवडणुकीपूर्वी आणि नंतरही केला होता व या नेत्यांना विधासभेची उमेदवारी देऊ नये, अशी मागणी काही नेत्यांनी दिल्लीत जाऊन अहमद पटेल यांच्याकडे केली होती.
या पाश्र्वभूमीवर उद्या निरीक्षकांपुढे दोन्ही बाजूंनी उमेदवारीसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे उत्तर, पूर्व, मध्यसाठी मुत्तेमवार त्यांच्या समर्थकांची नावे पुढे करण्याची शक्यता आहे तर, दक्षिण-पश्चिममध्ये मुत्तेमवार समर्थक विकास ठाकरे यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी मुत्तेमवार विरोधक वेळेवर अनेक इच्छूक उभे करण्याची शक्यता आहे.
हीच बाब ग्रामीणमध्ये आहे. रामटेकच्या जागेसाठी माजी मंत्री सुबोध मोहिते यांनी तयारी सुरू केली असली तरी स्थानिक नेत्यांनी त्यांना विरोध केला आहे.
रामटेकमध्ये स्थानिक नेत्यांनाच उमेदवारी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. उमरेड राखीव झाल्याने तेथील आमदार राजेंद्र मुळक हे कोणता मतदारसंघ मागतात, याकडेही लक्ष लागले आहे. इच्छुकांच्या भाऊगर्दीत होणाऱ्या मुलाखतीसाठी प्रत्येक मतदारसंघाला फक्त अर्धा तास वेळ देण्यात आला आहे.