Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

हिऱ्याची अंगठी चोरल्याचा संशयावरून घरकामगार मुलीला बेदम मारहाण
* मुलगी व आईलाच केले आरोपी
* पोलिसांकडून सावरासावर
* सामाजिक संघटना सरसावल्या
नागपूर, २ ऑगस्ट / प्रतिनिधी
हिऱ्याची अंगठी चोरल्याचा आळ घेत एका अल्पवयीन घरकामगार मुलीला एका श्रीमंत घराणे व पोलिसांकरवी अमानुष मारहाण झाल्याचे प्रकरण समोर येत असून पोलिसांनी उलट, ती मुलगी व तिच्या आईलाच आरोपी केले आहे. दरम्यान या सर्व प्रकाराची चौकशी पोलीस उपायुक्तांकडे सोपवण्यात आली आहे.
या मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात महाराष्ट्र बालहक्क आयोगाच्या सदस्य अॅड. रेखा बारहाते, घरेलू कामगार संघटना तसेच, बालहक्क अभियान, शासकीय कर्मचारी संघटना सरसावल्या असून त्या मुलीला मारहाण करणारे पोलीस तसेच, मोहता कुटुंबावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. घरेलू कामगार संघटनेचे अध्यक्ष जम्मू आनंद व अॅड. रेखा बारहाते यांनी या सर्व घटनेची दिलेली माहिती अंगावर शहारे आणणारी आहे. उत्तर नागपुरातील नारा वस्तीत ही अल्पवयीन मुलगी तिच्या आईसह राहते. तिची आई मजुरी करते. सदर परिसरात राहणारे सतीश मोहता व कुसुम मोहता यांच्या घरी काम मिळेल, असे तिच्या काही परिचितांनी तिला सांगितले. त्यानुसार या अल्पवयीन मुलीला सतीश मोहता यांच्याकडे जुलै महिन्यात काम मिळाले. दोन्ही वेळचे जेवण तसेच, दीड हजार रुपये महिना तिला मिळेल, असे सांगण्यात आले. तिने कामाला सुरुवात करून पंधराही दिवस झाले नसतील. कुसुम मोहता यांची हिऱ्याची अंगठी हरवली. कुसुम मोहता यांनी त्या मुलीला अंगठी शोधण्यासाठी राबराब राबवले. घरातील प्रत्येक खोलीतील कोपरा न् कोपरा, कपाटाचा कोपरा न् कोपरा स्वच्छ करावास लावला. घरकामासोबतच अंगठी शोधण्यासाठी तिला मारहाण केली गेली. अंगठी न सापडल्याने तिच्यावर चोरीचा आळ घेऊन रोज मारहाण होऊ लागली. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ची जबाबदारी असलेल्या पोलिसांनी कहरच
केला. ही मुलगी युगांतर विद्यालयात नववीत शिकते. २८ जुलैला सदर पोलीस ठाण्यातील काही मोजके पोलीस त्या मुलीच्या आईला घेऊन त्या शाळेत गेले. त्या मुलीला शाळेतून एका ऑटो रिक्षात बसवून सदर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे त्या मुलीला निर्वस्त्र करून चामडय़ाच्या पट्टय़ाने बेदम मारहाण करण्यात आली. ‘अंगठी कुठे ठेवली’ असे पोलीस वारंवार तिला विचारत होते. तिच्या आईसमोर आणि एकटय़ातही तिला मारहाण झाली. अश्लील शिवीगाळ करीत दुपारपासून रात्रीपर्यंत ती मुलगी व तिच्या आईचा पोलीस ठाण्यात शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. रात्री दहा वाजताच्या सुमारास ती मुलगी अर्धमेली झाल्याचे पाहून पोलिसांनी चूप बसण्याचा दम देऊन तिला घरी घेऊन जाण्यास तिच्या आईला सांगितले. तोपर्यंत या प्रकरणी कुठलीही तक्रार आली नव्हती किंवा गुन्हाही (एफआयआर) दाखल झालेला नव्हता.
पोलीस ठाण्यात ती मुलगी व तिच्या आईला मारहाण झाल्याची वाच्यता झाल्यानंतर ३० तारखेला कुसुम सतीश मोहता (रा़ ७४२, आदित्य हॅरीटेज अपार्टमेंट, प्लॉट नं ४२०, छिंदवाडा रोड) यांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यांच्या घरी साफसफाईची कामे करणारी संशयित चंद्रप्रभाबाई व तिची मुलगी या दोघींनी संगनमत करून १२ जुलैच्या सकाळी दहा ते १४ जुलैच्या सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान घरातील ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली हिरेजडीत अंगठी (किंमत ५० हजार रुपये) चोरून नेली, असे या तक्रारीत नमूद आहे. या तक्रारीवरून सदर पोलिसांनी तत्परतेने संशयित आरोपींविरुद्घ भारतीय दंड विधानाच्या कलम ३८१,३४ अन्वये गुन्हा दाखल करीत चंद्रप्रभाला सदर पोलिसांनी अटक तर, अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले.
या प्रकाराची वाच्यता झाल्यानंतर कातडी वाचवण्यासाठी तक्रार घेण्यात आली आणि तक्रारीवरून उलट मोलकरीण व तिच्या आईवर गुन्हा दाखल केला, असा आरोप जम्मू आनंद यांनी केला आहे. मोहता कुटुंबाने एका अल्पवयीन मुलीला कामावर ठेवून त्यांना वेठबिगार म्हणून राबवून घेतले. बालमजुरांनाच हे कुटुंब कामावर ठेवते. याआधीही एका अल्पवयीन मुलीला कामावर ठेवून तिच्यावर मोबाईल चोरीचा आळ घेऊन छळ केला. या कुटुंबाने बाल कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप अॅड. रेखा बारहाते यांनी केला.
घरेलू कामगार संघटनेचे जम्मू आनंद, अनिल हजारे, महाराष्ट्र राज्य बालहक्क अधिकार आयोगाच्या सदस्य अॅड. रेखा बारहाते यांनी सहायक श्रम आयुक्त नरेंद्रसिंग नागभिरे यांची भेट घेऊन या प्रकाराची माहिती दिली. या प्रकरणाची चौकशी करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. यासंदर्भात पोलीस आयुक्तांची भेट घेऊन अल्पवयीन मुलीला मारहाण करणाऱ्या पोलिसांवर तसेच, मोहता कुटुंबावर कारवाई करण्याची विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बाल हक्क अभियानचे विनायक नंदेश्वर, अनिल जांभुळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सह पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. अल्पवयीन मुलगी व तिच्या आईवरील गुन्हा रद्द करावा, त्या मुलीला मारहाण करणाऱ्या पोलिसांवर तसेच, मोहता कुटुंबावर कारवाई करावी, बाल कामगारांच्या संरक्षणासाठी स्पेशल ज्युवेनाईल प्रश्नेटेक्शन युनिट स्थापन करावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त प्रवीण दीक्षित यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पांडे यांच्याशी बोलायला सांगितले. संजय पांडे यांच्याशी संपर्क साधला असता, ती मुलगी व तिच्या आईला धाकदपटशा दाखवल्याची कबुली त्यांनी दिली. मात्र, मारहाण केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘त्या मुलीसंबंधी तक्रार आली होती. ती अल्पवयीन असल्यामुळे उगाच तिचे भविष्य खराब होऊ नये, असा हेतू होता. त्यामुळे तक्रार आली असली तरी ती प्रश्नरंभी दाखल करून घेतली नाही. या प्रकाराची चौकशी करण्यास सांगितले होते. बोलावणे पाठवूनही ती मुलगी व तिची आई न आल्याने त्या दोघींना ठाण्यात आणण्यात आले. मुलीने अंगठी चोरून तिच्या आईजवळ दिल्याची माहिती होती. आधी तिला समजावूनही तिने काहीच प्रतिसाद न दिल्याने ‘अंगठी देऊन टाक, नाहीतर लॉकअपमध्ये टाकू’ वगैरे धाकदपटशा दाखवला गेला, हे खरे आहे. मात्र, त्या मुलीला पोलिसांनी मारहाण केलेली नाही. रात्र झाल्याने त्या दोघींना घरी जाण्यास आणि उद्या येण्यास सांगितले. पोलीस अटक करतील, असे वाटल्याने ती मुलगी व तिच्या आईने पराचा कावळा केला असावा, असे पोलीस निरीक्षक संजय पांडे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या सर्व प्रकाराची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त चंद्रशेखर कानडे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले.