Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

सिंचन प्रकल्पांसाठी गुणनियंत्रण मंडळ नागपुरात सुरू
नागपूर, २ ऑगस्ट / प्रतिनिधी

विदर्भातील सिंचन प्रकल्पांची दर्जेदार बांधणी आणि काटेकोर तपासणीसाठी जलसंपदा विभागाचे

 

गुणनियंत्रण मंडळ आजपासून नागपुरात सुरू झाले. सिव्हिल लाईन्स भागात वन भवनाजवळ मंडळाचे उद्घाटन विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डी.पी. शिर्के यांच्या हस्ते झाले.
गोसीखुर्द प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देताना विदर्भात स्वतंत्र गुणनियंत्रण कार्यालय स्थापन करावे, अशी अट केंद्राने टाकली होती. त्यानुसार हे कार्यालय सुरू करण्यात आले. आतापर्यंत औरंगाबाद येथील कार्यालयातून विदर्भातील प्रकल्पांच्या कामावर देखरेख ठेवण्यात येत होती. त्यामुळे आता या कार्यालयावरील ताण कमी झाला आहे. मंडळाशिवाय अकोला आणि पवनी वाही येथे विभाग सुरू करण्यात आले आहे. नागपूर आणि अमरावतीत आधीपासूनच विभाग असल्याने आता एक मंडळ व चार विभागाच्या माध्यमातून दर्जेदार बांधणीवर लक्ष ठेवण्यात येईल.
यावेळी गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता घुगे, अधीक्षक अभियंता संजय खोलापूरकर, डी.डी. पोहेकर, मंडळाचे अधीक्षक अभियंता आर.ई. उपासनी आणि कार्यकारी अभियंता केशव तायडे प्रमुख्याने उपस्थित होते.