Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

शाळेच्या कटकटीला कंटाळून चिमुरडय़ाचे रेल्वेने पलायन..
नागपूर, २ ऑगस्ट/ प्रतिनिधी

शाळेत जाऊ लागू नये म्हणून म्हैसूर येथील एका ५ वर्षाच्या लहानग्याने चक्क रेल्वेत बसून पळून

 

जाण्याचा बेत आखला आणि मिळेल त्या गाडीने तो सेवाग्राम रेल्वे स्थानकावर पोहोचला. सुदैवाने एका सेवाभावी संघटनेच्या कार्यकर्त्यांला हा मुलगा वर्धेत आढळला. रेल्वे सुरक्षा दलामार्फत त्याला त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.
म्हैसूर येथील पवन सुगीत (५) ला शाळेत जाण्याचा कंटाळा येत असे. शाळेला बुट्टी मारता यावी म्हणून तो कुणालाही न सांगता गुपचूप घराबाहेर पडला. थेट रेल्वे स्थानकावर आला. कोणती गाडी कुठे जात आहे, याबाबत माहिती घेण्याचा प्रश्नच नव्हता. रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या गाडी बसला. कोणत्या तरी गाडीने तो वर्धेला पोहोचला. सकाळी गाडीतून उतरला. छोटासा बालक फलाटावर एकटाच भटकत असल्याचे ‘आयएकेए’ सेवाभावी संघटनेचे अमजत पठाण यांना दिसले. त्याने त्याला नाव आणि आईवडिलांबाबत विचारले पण, तो केवळ तोंडाकडे बघत होता. त्याला मराठी, हिंदी किंवा इंग्रजी कळत नव्हते. त्याला केवळ कन्नड भाषा बोलता येत होती. अमजत पठाण यांनी लागलीच नागपुरातील त्यांच्या सहकार्याना दूरध्वनीवरून कळवले आणि पवनला वर्धेहून शालिमार एक्स्प्रेसने नागपूला घेऊन आले. संघटनेच्या रजनी माटे आणि निशा सरदार हे त्यांची नागपूर रेल्वे स्थानकावर वाट पाहत होते. येथे पोहोचताच रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस उपनिरीक्षक ए.के. सहदेवन यांनी त्याला कन्नड भाषेत नाव विचारले. त्याने पवन असे सांगितले आणि हळुहळू सर्व माहिती पवनने दिली. हा मुलगा इतका धीट होता की, त्याला ना नवीन माणसांची भीती ना खाकी वर्दीला जवानांची धास्ती. बिनधास्त रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यात तो बागडत होता. आर.पी.एफ.ने दूरध्वनीवरून त्याच्या वडिलांशी संपर्क साधून मुलाला घेण्यासाठी येण्यास सांगितले. शुक्रवारला दुपारच्या सुमारास पवनचे वडील आले आणि बापलेकाची भेट झाली.