Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

शिक्षण शुल्कासाठी बनावट बिल देणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांवर आरोपपत्र
नागपूर, २ ऑगस्ट/ प्रतिनिधी

शिक्षण शुल्क मिळवण्यासाठी बनावट बिल सादर करणाऱ्या अजनीतील तीन रेल्वे कर्मचाऱ्यांवर

 

प्रशासनाने आरोप दाखल केले आहे.
सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांकरिता गणवेश, शाळेची शिकवणी शुल्क तसेच, अन्य शैक्षणिक साहित्यावरील खर्चापोटी प्रत्येक महिन्याला एक हजार रुपयांचे शिक्षण शुल्क देण्यात येत आहे. या रकमेची उचल करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याला शैक्षणिक साहित्य खरेदी केल्याचे बिल सादर करणे आवश्यक आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना सहावे वेतन आयोग १ सप्टेंबर २००८ पासून लागू करण्यात आले आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांमध्ये मागील तारखेतील बिल सादर करून शिक्षण शुल्क उचलण्याची शर्यत लागल्याचे दिसून येते. रेल्वेच्या ‘टीआरएस अजनी’ विभागातील टेक्निशियन-३ या पदावर कार्यरत तीन कर्मचाऱ्यांनी बनावट बिल सादर केल्याचे उघडकीस आले. या तिघांनाही मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या कार्मिक शाखेने ‘चार्जशिट’ जारी केली आहे. यामध्ये बैजू श्यामलाल, दिनेश वाट, गोविंद रघू या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
बैजू श्यामलाल यांनी सादर केलेल्या शिकवणी शुल्काच्या दोन्ही पावत्यांवरील रकमेची बेरीज चुकीची आहे. तसेच, बिलावरील रकमेचा आकडा ‘ओव्हर राईट’ करण्यात आला. दिनेश वाट यांनी गणवेश खरेदीचे सादर केलेले बिल कापड दुकानचे नसून स्टिल फर्निचर, हार्डवेअर आहे तर, गोविंद रघू यांनी दोन्ही मुलींच्या शिकवणीचे शुल्क ९६० रुपये उचललेली असताना परत त्या रकमेसाठी बिल सादर केले आहे. अशा प्रकारे या तिन्ही कर्मचाऱ्यांनी प्रशासनाची जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, असा ठपका ठेवून शिक्षण शुल्काचा दावा फेटाळला. तसेच, याबाबत या कर्मचाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागण्याची सूचना विभागीय वरिष्ठ विद्युत अभियंता (अजनी) यांना कार्मिक शाखेने केली होती, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली तर, या कर्मचाऱ्यांवर विद्युत विभागाने आरोपपत्र दाखल केल्याचे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुहास लोहकरे यांनी सांगितले.