Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

‘वन्यजीव संरक्षण कायद्याची अंमलबजावणी’ वरील कार्यशाळेचे उद्घाटन
घटनाक्रम बघूनच आरोपपत्र दाखल करा -ए.के. जोशी
नागपूर, २ ऑगस्ट/प्रतिनिधी

ट्रॅफिक इंडिया आणि वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘वन्यजीव

 

संरक्षण कायद्याची अंमलबजावणी’ या विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए.के. जोशी यांच्या हस्ते १ ऑगस्टला हॉटेल चिदंबरा येथे करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राज्याचे मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव व प्रशासन) ए.के. सक्सेना, मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नंदकिशोर उपस्थित होते.
वन्यजीव कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवताना सर्वप्रथम घटनाक्रम काय, हे लक्षात घेऊन नंतरच आरोपपत्र दाखल करावे, असे प्रतिपादन ए.के. जोशी यांनी केले. राज्यातील वन्यजीव गुन्हय़ांशी संबंधित ९५ टक्के प्रकरणांचा निकाल अजूनही लागलेला नाही पण, गेल्या काही वर्षात वन्यजीव संरक्षण कायद्याबाबत जागरुकता निर्माण झाली आहे. ही कार्यशाळा अजून जागरुकता निर्माण करेल, असे ए.के. जोशी म्हणाले.
ही कार्यशाळा केवळ कार्यशाळाच न राहता ‘प्रॅक्टिकल’ व्हावी, अशी अपेक्षा ए.के. सक्सेना यांनी यावेळी व्यक्त केली. वनविभाग आणि वन्यजीव विभाग या दोघांकरताही ही कार्यशाळा महत्वाची आहे. या कार्यशाळेत वन्यजीव संरक्षण कायद्यासह अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात येणार आहे, असे ए.के. सक्सेना म्हणाले. ट्रॅफिक इंडिया आणि वल्र्ड वाईल्डलाईफ फंड यांनी राज्यात दौरा केल्यानंतर वनविभागाला एक अहवाल सादर केला आणि या अहवालानंतर ही कार्यशाळा नागपुरात घेण्याचे निश्चित झाले, अशी माहिती नंदकिशोर यांनी दिली. कार्यशाळेत घडून येणाऱ्या चर्चेतून बराच फायदा होईल, असे ते म्हणाले.
याप्रसंगी ज्येष्ठ वन्यजीवतज्ज्ञ कुंदन हाते यांनी माळढोक प्रगणनेनिमित्त तयार केलेल्या ‘पोस्टर’चे प्रकाशन प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए.के. जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. वर्ल्ड वाईल्डलाईफ फंडच्या वतीने बोर आणि नागझिराकरता दोन महिंद्रा कंपनीच्या गाडय़ा भेट म्हणून देण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रश्नस्ताविक व संचालन ट्रॅफिक इंडियाचे प्रमुख समीर सिन्हा यांनी केले. सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजीव) किशोर मिश्रीकोटकर यांनी आभार मानले. याप्रसंगी राज्यातील वन्यजीव विभागातील अधिकारी व वन्यजीवतज्ज्ञ यावेळी उपस्थित होते.