Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

शिवसैनिकांचा हिंगण्यात रास्ता रोको
हिंगणा, २ ऑगस्ट/ वार्ताहर

महागाईच्या विरोधात हिंगण्यातील हजारो शिवसैनिकांनी जिल्हा परिषदेचे माजी सत्तापक्षनेते बाबा

 

आष्टणकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करून महागाईच्या भस्मासुराच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक दहन करून रस्त्यावर जाळपोळ केली.
शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे स्वस्त धान्य दुकानातून गहू, ज्वारी, तांदूळ, डाळ, साखर व इतर जीवनावश्यक वस्तू नामशेष झाल्या आहेत. पेट्रोलियम पदार्थाची सतत भाववाढ होत असल्याने खुल्या बाजारपेठेत खाद्य सामुग्रीचे भाव गगनाला भिडले आहेत. कृषिमंत्री, अन्न पुरवठा मंत्री, पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या विरोधात शिवसैनिकांनी घोषणा देऊन जाळपोळ केली. रस्ता रोखून धरल्याने वाहतूक विस्कळीत झाली.
पोलिसांनी अंदाजे ५० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक अशोक बागुल यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तहसीलदार मनोहर पोटे यांना मागण्यांचे निवेदन सादर करून महागाईवर नियंत्रण न ठेवल्यास गावागावात आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा बाबा आष्टणकर यांनी तहसीलदारांना दिला.
आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य मारोतराव हजारे, पंचायत समितीचे माजी सभापती नरेंद्र पाटील, खेमसिंग जाधव, सतीश मिनियार, प्रकाश उमरेडकर, मोतीराम टिपले, प्रवीण खाडे, श्याम भेंडे, एकनाथ राऊत, केशव बांदरे, शरद येवले, हरिभाऊ नाईक, ज्ञानेश्वर उमाटे, पुरुषोत्तम झिले, नाना इखार, गुणवंत चामाटे, नंदू ढवळे, अन्ना कोढलकर, रमेश लहाने, सतेंद्र सिंग, सुनील तोडकर, राजू श्रीवास्तव, रूपराव नागोसे, संतोष परतेकी, अजय घवघवे, जगदीश कन्हेर, सुनील तानोरकर, भुपेंद्र काचोरे, राजू राणे, रामाजी नेवारे, अजय बुधे, गुणवंता चामाटे, अशोक कंगाही, रामदास गावंडे, किशोर पोरतावरे, रवी निफाज आदी सहभागी झाले होते.