Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

प्रशासनात महसूल अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची -आनंद लिमये
नागपूर, २ ऑगस्ट/ प्रतिनिधी

प्रशासनात महसूल अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे कुठलाही बिकट प्रसंग

 

आल्यास समन्वयातून त्यावर मात करावी, असा सल्ला माजी विभागीय आयुक्त आनंद लिमये यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभात ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी प्रवीण दराडे होते. यावेळी व्यासपीठावर अप्पर जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत डांगे, सहाय्यक जिल्हाधिकारी अभिजित बांगर उपस्थित होते.
नागपूर विभागात २००५ मध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीत महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जे काम केले त्याला तोड नाही. नागपूर जिल्हा विभागात नेहमीच अव्वल राहिलेला आहे. महसुली उत्पन्न असो वा राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन महसूल अधिकाऱ्यांनी ते योग्यरितीने पार पाडले, असे आनंद लिमये यांनी यावेळी सांगितले. नागपूर विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये काम करण्याची प्रचंड क्षमता आहे. त्यामुळेच विभाग शासनाच्या विविध योजनांमध्ये राज्यात अव्वल राहिलेला आहे. तो यापुढेही राहील यासाठी प्रयत्नात सातत्य ठेवावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
आनंद लिमये यांनी प्रत्येक काम आव्हान म्हणून स्वीकारले. त्यांच्या कार्यकाळात विधिमंडळाचे अधिवेशन सुव्यवस्थितपणे पार पडले. नागपूर हे देशाचे मध्यवर्ती शहर असल्यामुळे या शहरात अनेक महत्त्वाच्या व्यक्तींची ये-जा असते. गेल्या वर्षभरात राष्ट्रपती व इतर व्ही.आय.पी. बऱ्याचदा येऊन गेले. त्यांचे दौरे सुव्यवस्थित होण्यासाठी प्रशासन नेहमीच तत्पर राहत होते, असे जिल्हाधिकारी प्रवीण दराडे म्हणाले.
यावेळी प्रवीण दराडे यांनी आनंद लिमये यांचा भेटवस्तू शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. प्रश्नस्ताविक चंद्रकांत डांगे यांनी केले. यावेळी निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी मनोहर हिकरे, उपजिल्हाधिकारी संजय धिवरे, हिंगणा तहसीलदार एम.व्ही. पोटे, नायब तहसीलदार धर्मेश फुसाटे, तृतीयश्रेणी कर्मचाऱ्यांतर्फे सतीश जोशी, चतुर्थश्रेणी कर्मचारी राजू उबाळे, वाहन चालक नाना कडवे यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे संचालन उपजिल्हाधिकारी आशा पठाण-निचत यांनी केले. आभार उपजिल्हाधिकारी शिरीष पांडे यांनी मानले. या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी डी.व्ही. सावरकर, प्रकाश शर्मा, एस.डी. कुळमेथे, प्रवीण महाजन, अरुण गावंडे, पाटील, आर.एस. मावसकर, आर.एस. आडे, तहसीलदार प्रसाद मते, ए.डी. फेंडारकर, तसेच कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.