Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

डॉ. प्रसाद चिखले यांचाही मृतदेह सापडला
नागपूर, २ ऑगस्ट/ प्रतिनिधी

वाकी येथे कन्हान नदीच्या पाण्यात वाहून गेलेल्या डॉ. प्रसाद चिखले यांचा मृतदेह रविवारी

 

सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास पारशिवनीपासून दहा किलोमीटर अंतरावरील दहेगाव जोशी येथे सापडला. वर्धमान नगरातील ईस्ट एंड रुग्णालयातील डॉ. प्रसाद चिखले (रा. शताब्दी नगर) व डॉ. जयंत किणे (रा. सक्करदरा) यांच्यासह काही कर्मचारी वाकीला शुक्रवारी सहलीला गेले होते. तेथे दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास नदीच्या पाण्यात पाय घसरून प्रसाद पडले. त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात जयंतही पडले आणि दोघेही वाहून गेले. अग्निशमन दलाच्या जवानांसह खापा पोलीस, पारशिवनी पोलीस तसेच, पोहण्यात तरबेज गावकऱ्यांनी नदीत त्या दोघांचा शोध सुरू केला. घटनास्थळापासून दोन किलोमीटर अंतरावरील महादुला येथे काल सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास जयंत यांचा मृतदेह सापडला. प्रसाद यांचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळे पारशिवनी, कन्हान, मौदा तसेच भंडारा जिल्ह्य़ात शोध घेण्याची सूचना पोलिसांना करण्यात आली होती. आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास पारशिवनीपासून दहा किलोमीटर अंतरावरील दहेगाव जोशी येथे नदीच्या पात्रात एक मृतदेह तरंगत असलेला गावकऱ्यांना दिसला. हे समजताच पारशिवनी पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी मृतदेह काठावर आणला. हे समजताच प्रसाद यांचे कुटुंबीय तेथे पोहोचले. त्यांनी मृतदेह ओळखला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.