Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

सात जुगाऱ्यांना अटक
नागपूर, २ ऑगस्ट / प्रतिनिधी

तहसील पोलिसांनी इतवारी खापरी मोहल्ल्यातील एका घरावर छापा मारून जुगार खेळणाऱ्या सात

 

जुगाऱ्यांना अटक केली. या मोहल्ल्यातील ताहा हुसेन याच्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर छापा मारला. तेथे पत्त्यांवर जुगार खेळला जात होता. ताहा हुसेन मजहर हुसेन (रा़ खापरी मोहल्ला), कायम सैफुद्दीन हुसेन (रा. तांडापेठ), जुजर हुसेन शब्बीर हुसेन (रा़ इतवारी), हुसेन अली कुर्बान हुसेन (रा़ रेशमओळी), आरीफ हुसेन हकीमुद्दीन (रा़ तांडापेठ), मुजफ्फर हुसेन हातीमभाई (रा़ बंगाली पंजा) व हुसेन सैफी सैफुद्दीन (रा़ जागनाथ बुधवारी) या आरोपींना अटक करण्यात आली.
संशयित निघाले लॅपटॉप चोर
अंबाझरी पोलिसांनी शुक्रवारी संशयावरून पकडलेले तिघे लॅपटॉप चोर निघाले. प्रफुल्ल मिलिंद मेंढे (रा़ गोपालनगर), सुनील गुलाब आचरे व निलेश रमेश तभाने (दोन्ही रा़ तुकडोजीनगर झोपडपट्टी) ही अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास अंबाझरी पोलीस माटे चौकातून माधवनगरकडे जात असता तेथे उभ्या या तिघांबद्दल पोलिसांना संशय आला. या तिघांजवळ लॅपटॉप होता. त्याबद्दल विचारल्यावर हा कॉम्पॅक कंपनीचा लॅपटॉप (किंमत ५० हजार रुपये) या परिसरातील आयटी पार्कच्या कार्यालयातून चोरून आणल्याचे आरोपींनी सांगितले. आरोपींना न्यायालयाने ४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
चोरी
वाडीमधील एका दुकानाच्या गोदामाच्या शटरचे कुलूप तोडून चोरटय़ांनी एका लाखाहून अधिक किमतीचा ऐवज लांबवला. २० जुलैला ही चोरी उघडकीस आली. वाडीमधील तवक्कल लेआऊटमध्ये शिला कॉम्प्लेक्समागे धनश्री पेट्रोलियमचे गोदाम आहे. १८ जुलैला दुपारी गोदाम बंद झाले. २० तारखेला सोमवारी सकाळी गोदाम उघडण्यास मालक आला तेव्हा गोदामाच्या शटरची कुलपे तुटलेली दिसली. गोदामातील ऑईलचे ड्रम आणि बाटल्या, असा एकूण १ लाख १३ हजार ६२५ रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची तक्रार दुकान मालक प्रवीण निलमचंद बांठीया (रा़ अचरज टॉवरसमोर, छावणी) याने २ ऑगस्टला वाडी पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला़
मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेच्या कैद्याचा मृत्यू
मध्यवर्ती कारागृहात खुनाच्या आरोपाखाली जन्मठेप भोगत असलेल्या कैद्याचा रविवारी पहाटे मृत्यू झाला. शिवशंकर केसोराव तिजारे हे त्याचे नाव असून तो भंडारा जिल्ह्य़ातील सालबर्डीचा आहे. कारागृहातील पाचव्या क्रमांकाच्या बरॅकीत तो राहत होता. आज पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास त्याची अचानत तब्येत बिघडल्याने कारागृहातील रुग्णालयात त्याला नेण्यात आले. सव्वा पाच वाजता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली़
राम नगरातील सलूनवर छापा,
राम नगरातील ‘लुक्स युनिसेक्स’ सलूनवर अंबाझरी पोलिसांनी शनिवारी दुपारी छापा मारून देहविक्री करणाऱ्या तीन तरुणींना पकडले.
मिळालेल्या गुप्त माहितीवरून अंबाझरी पोलिसांनी एका पंटरला तेथे पाठवले. त्याने एका महिलेशी सौदा केला. त्याचा इशारा मिळताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी तेथे छापा मारला. दोन हजार रुपये घेऊन सलूनआड तेथे देहविक्रय केला जात होता. २५ ते ३० वयोगाटातील या तरुणी आहेत. या सलूनची मालक एक महिलाच असून ती अनंतनगर परिसरात राहते. प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी ती सलूनमध्ये नव्हती.