Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

समता सहकारी बँक प्रशासनाच्या विरोधात ४ ऑगस्टला निर्दशने
नागपूर, २ ऑगस्ट/ प्रतिनिधी

समता सहकारी बँक बंद होऊन तीन वर्षाचा कालावधी झाला तरी संबंधित बंॅकेच्या

 

अधिकाऱ्यांवर व संचालकावर कारवाई करण्यात आली नाही. शिवाय, अनेक ठेवीदारांच्या ठेवी अजूनही परत करण्यात आल्या नाही त्यामुळे ४ ऑगस्टला प्रशासनाच्या विरोधात काळा दिवस म्हणून लक्ष्मीभवन चौकात निर्दशने करण्यात येणार असल्याची माहिती समता सहकारी बँक कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष रणजित चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संचालकांनी केलेल्या गैरव्यवहारामुळे आणि चुकीच्या लेखा अहवालामुळे ४ ऑगस्ट २००६ ला बँक बंद पडल्यामुळे अनेक ठेवीदारांच्या ठेवी आजपर्यंत परत मिळालेल्या नाहीत. ज्या अधिकाऱ्यांनी त्यावेळी लेखा परीक्षण केले होते त्यांनी निपक्ष आणि निस्वार्थपणे ते केले असते तर बँकेवर ही वेळ आलीच नसती. बँकेत गैरव्यवहार करणारे मोजकेच चार पाच लोक आहेत पण, त्याची शिक्षा मात्र बँकेच्या शेकडो कर्मचाऱ्यांप्रमाणे हजारो ठेवीदारांनाही दिली जात आहे. त्यामुळे सहकार चळवळीला काळिमा फासणार हा दिवस म्हणून पाळणार असून आमदार देवेंद्र फडणवीस व एस. क्यू झमा यांच्या नेतृत्वाखाली दुपारी ४ वाजता लक्ष्मीभवन चौकात निदर्शने करण्यात येणार आहेत. या संदर्भात सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. त्यांनी महिला आणि समता सहकारी बँक सुरू करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले होते पण, अजूनपर्यंत त्यांनी त्या संदर्भात कारवाई केलेली नाही.
ज्या दोषींच्या नार्को टेस्ट करायच्या आहेत त्यांच्यांवर कलम ८८ अंतर्गत त्वरित कारवाई करण्यात यावी, बँकेच्या प्रशासनाने ज्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केलेली आहे त्यांच्यावर चौकशीची कारवाई करून त्यांना त्वरित बडतर्फ करण्यात यावे, बँकेतील कर्मचाऱ्यांना नोकरीत संरक्षण मिळावे इत्यादी मागण्या यावेळी करण्यात येणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले. यावेळी बँकेतील कर्मचारी आणि ठेवीदार उपस्थित होते.