Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

ग्राहकाला २ लाखांची भरपाई देण्याचे विमा कंपनीला आदेश
नागपूर, २ ऑगस्ट/प्रतिनिधी

ग्राहकाला विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याबद्दल जिल्हा ग्राहक मंचाने दोन वेगवेगळ्या

 

प्रकरणांमध्ये दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला दिले आहेत.
कासाबाई दुधकवर (वय ६०) व विमलाबाई दुधकवर (वय ३३) यांनी त्यांच्या कुटुंबातील प्रमुख सदस्यांच्या नावे असलेल्या विम्याच्या रकमेसाठी ओरिएंटल कंपनीकडे अर्ज केला होता. कासाबाई यांचे पुत्र प्रकाश व विमलाबाई यांचे पती पुरुषोत्तम यांचे अपघाती निधन झाल्यानंतर दोघींनीही विमा पॉलिसीच्या रकमेसाठी तगादा लावूनही कंपनीने त्यासाठी टाळाटाळीचे धोरण अवलंबिले. जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष विजयसिंह राणे यांनी दोन्ही ग्राहकांना नुकसान भरपाईपोटी तक्रार दाखल केल्यापासून ९ टक्के व्याजाने १ लाख ६० हजार, मानसिक त्रासाबद्दल २० हजार रुपये तसेच, तक्रार खर्च म्हणून एक हजार रुपये द्यावेत, असे आदेश दिले. या प्रकरणाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्याच्या वेतनातून २० हजार रुपयांची रक्कम कापावी, असेही या आदेशात म्हटले आहे. ही रक्कम कंपनीला एक महिन्याच्या आत द्यायची असून तसे न झाल्यास सर्व रकमेवर ९ ऐवजी १२ टक्के दंडनीय व्याज आकारावे, असे आदेश मंचाने दिले. तक्रारकर्त्यांकडून अॅड. एम.बी. महाले यांनी तर, कंपनीकडून अॅड. मृणाल नाईक यांनी काम पाहिले.