Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

समविचारी पक्षाची आघाडी करणार भविष्यात समाजवादी चळवळीला सुगीचे दिवस -कुमार सप्तर्षी
नागपूर, २ ऑगस्ट/ प्रतिनिधी

जात आणि धर्म या आधारावर राजकारण संपत चालल्याने येत्या काळात समाजवादी चळवळीला

 

चांगले दिवस येतील, असा विश्वास ज्येष्ठ समाजवादी व माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केला. समाजवादी विचारसणीच्या पक्षांची आघाडी तयार करून आगामी विधानसभा निवडणुका लढवण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.
आय.एम.ए.च्या नागपूर शाखेच्या पदग्रहण समारंभासाठी डॉ. सप्तर्षी नागपूर येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. समाजवाद्यांमध्ये वाद आहेत. संघटनात्मक काही चुकाही झाल्या असल्याने चळवळ काहीशी क्षीण झाली असली तरी संपली नाही. जात आणि धर्माच्या आधारावर राजकारण आता अस्ताला जात असल्याने या चळवळीला पुन्हा सुगीचे दिवस येतील, असे डॉ. सप्तर्षी म्हणाले. १९५७ ते १९६० हा समाजवादी चळवळ फोफावण्याचा काळ होता. तेव्हा या चळवळीत मोठी माणस होती. सध्या स्वतला समाजवादी म्हणवून घेणारे सत्ताधारी आणि विरोधी पक्षात वाटले गेले आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आगामी विधानसभा निवडणूक समविचारी पक्षांची आघाडी करून लढविण्याचा विचार आहे. विदर्भातील आमदार बच्चू कडू, पश्चिम महाराष्ट्रातील खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा झाली आहे. रिपाइंची इच्छा असेल तर ते या आघाडीत सहभागी होऊ शकतात, असे डॉ. सप्तर्षी म्हणाले.
राष्ट्रीयत्वाची भावना ठेवण्याऐवजी अलीकडच्या काळात नेते समाज आणि जातीपुरते मर्यादित झाले आहेत. महापुरुष हे सर्वाचेच असतात म्हणूनच त्यांना महापुरुष म्हणून संबोधित केले जाते. असे असतानाही नेत्यांनी त्यांची जात आणि समाजाच्या आधारावर विभागणी केली. महात्मा फुले यांच्याशी कुठलाही संबंध नसताना छगन भूजबळ यांनी त्यांना आणि दलित नेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही एका समाजापुरते मर्यादित केले. तुम्ही कुठल्या समाजाचे आहात, यापेक्षा तुम्ही भारतीय आहात, हा दृष्टीकोण असावा, असे डॉ. सप्तर्षी म्हणाले.
वैद्यकीय आणि राजकीय या दोन्ही क्षेत्रात काम करणाऱ्या डॉ. सप्तर्षी यांनी हे दोन्ही क्षेत्र एकमेकांशी निगडीत असल्याचे सांगितले. समाजाचे खरे चित्र जसे राजकीय नेत्यांना कळते तसेच, ते डॉक्टरांनाही कळते, असे ते म्हणाले. वैद्यकीय क्षेत्रात वाढत चाललेली व्यावसायिक वृत्ती हा जागतिकीकरणाचा परिणाम आहे. मात्र, डॉक्टरांनी त्यापासून थोडे दूर असायला हवे. लवकर श्रीमंत होण्याची मनीषा हेही त्या मागचे एक कारण आहे, असे सप्तर्षी म्हणाले. वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे डॉक्टर धास्तावले आहेत. ते आता संशोधनावर भर द्यायला लागले आहेत. त्यामुळे वैद्यकीय सेवा खर्चिक झाली, असा दावा त्यांनी केला.
पत्रकार परिषदेला आय.एम.ए.चे मावळते अध्यक्ष डॉ. राजेश बल्लाळ, डॉ. अनिल लद्धड, डॉ. संजय दमके, डॉ. अविनाश रोडे, डॉ. सरोदे, डॉ. ताम्हने, डॉ. देशपांडे आणि इतरही आयएमएचे पदाधिकारी उपस्थित होते.