Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

ही तर संदीप जोशींच्या कामांना जनतेने दिलेली पावती -गडकरी
नागपूर, २ जुलै / प्रतिनिधी

नगरसेवकांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता आपल्या भागातील विकासाकडे अधिक लक्ष दिले तर

 

नागरिकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलत असतो. संदीप जोशी यांनी गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामाची लोकांनी दिलेली पावती हेच त्यांच्या कामाचे यश असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
नगरेसवक संदीप जोशी यांच्या अडीच वर्षाच्या कार्यवृतांताचे प्रकाशन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. रविंद्रनगरातील चैतन्य सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहर अध्यक्ष सुधाकरराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला माजी प्र-कुलगुरू योगानंद काळे, स्थायी समितीचे अध्यक्ष नाना शामकुळे, आमदार देवेंद्र फडणवीस, महापौर माया इवनाते, गिरीश देशमुख, नगरसेवक उषा बोहरे, माधवी पडोळे, संजय बोंडे, राजेश बागडी उपस्थित होते.
नितीन गडकरी म्हणाले, लोकप्रतिनिधींनी प्रत्येक नागरिकाला परमेश्वर मानून काम केले पाहिजे. आपल्या भागात काय समस्यांबाबत नागरिकांशी सुसंवाद असला पाहिजे. त्यासाठी नगरसेवकांनी जागृत राहणे आवश्यक आहे, असेही गडकरी म्हणाले. भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्ता ही पक्षाची संपत्ती आहे. जे कार्यकर्ते टीका करीत असतात तेच कार्यकर्ते आज पक्षाच्या नगरसेवकांकडे सहकार्य मागण्यासाठी येत असतात. नगरसेवकांकडे येणारा नागरिक हा कुठल्याही जाती, धर्माचा, पंथाचा असला तरी त्याचे काम कायदेशीर पद्धतीने केले पाहिजे. समस्या घेऊन येणाऱ्या नागरिकांचा नगरसेवकांनी सन्मान केला पाहिजे. त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांचे काम कसे होईल ते सांगण्याचा प्रयत्न नगरसेवकांनी केला पाहिजे. संदीप जोशी यांच्याकडून पक्षाला बऱ्याच अपेक्षा असून त्या अपेक्षा ते पूर्ण करतील, अशी त्यांच्यामध्ये क्षमता आहे. महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्या जाहीरनाम्यातील सर्व कामे नगरसेवक म्हणून संदीप जोशी येणाऱ्या काळात पूर्ण करतील, अशा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
यावेळी नरहरी चांदे, मनोहर देशकर, श्यामराव गोखले, दादा महाजन, अशोक निखिते व पदमाकर घुले या वार्डातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. दंतेवाडी झोपडपट्टीत राहणारे हरिश्चंद्र वर्मा व निर्मला वर्मा या अपंग मुलांना गडकरी यांच्या हस्ते तीन चाकी सायकली भेट म्हणून देण्यात आल्या. यावेळी नाना शामकुळे, देवेंद्र फडणवीस, माया इवनाते यांची भाषणे झाली. संदीप जोशी यांनी प्रश्नस्ताविक तर, संचालन प्रश्न. सुजेश घोडमारे यांनी केले.