Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

‘फाल्गुन विश्व’चे प्रकाशन
विश्लेषण आणि विचार ही समाजाची गरज -कुमार सप्तर्षी
नागपूर, २ ऑगस्ट / प्रतिनिधी

विचार पत्रकारितेतून बेदखल होत आहे. समाज विचार शून्यतेकडे जात असून विचार व

 

विश्लेषणाची आज गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले. हिंदी वैचारिक साप्ताहिक ‘फाल्गुन विश्व’च्या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
थिंकिंग जिनियस प्रकाशनतर्फे हा कार्यक्रम सुभाष मार्गावरील लोहिया भवनात आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी हरिष अडय़ाळकर होते. मंचावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी, ज्येष्ठ पत्रकार मेघनाद बोधनकर, आमदार एस.क्यू. जमा, डॉ. गोविंद उपाध्याय, ज्येष्ठ पत्रकार जगदीश साहू, रामेश्वर शर्मा आणि साप्ताहिकाचे संपादक पत्रकार पुष्पेन्द्र फाल्गून हे उपस्थित होते. फाल्गून यांनी साप्ताहिक काढून धाडसाचे काम केले असून त्यांना समाजाचे समर्थन मिळाले पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. सप्तर्षी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. गिरीश गांधी म्हणाले, आजची पत्रकारिता लैंगिक विषय, गुन्हेवार्ता आणि राजकीय भाषणांवरच केंद्रित झाली असून अशा काळात विचारांची पत्रकारिता करण्याचे धाडसी पाऊल फाल्गून यांनी उचलले आहे. यावेळी गांधी यांनी साप्ताहिकासाठी आर्थिक मदत करणारे राजेश व राकेश शर्मा तसेच, शेख अजीज यांचा सत्कार करून त्यांना धन्यवाद दिले. अन्य पाहुण्यांचीही यावेळी भाषणे झाली.
संचालन चित्रकार सुभाष तुलसिता यांनी केले तर, आभार प्रकाशक नरेश ढोके यांनी मानले. कार्यक्रमाला रघुवीर सिंह खन्ना, प्रकाश चांद्रायण, राजेन्द्र पटोरिया, उमाशंकर सिंह, गजराज देविया, मोहम्मद जाहिद, मोहम्मद शाहिद, मुकुंद उंब्रजकर, मोहम्मद असलम, नीतू सक्सेना, गुरुप्रित सिंह, अब्दुल रज्जाक शाह, हेमधर शर्मा, व्यास प्रजापती यांच्यासह अनेक बुद्धिजीवी उपस्थित होते.