Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

पावसाने चिंता वाढवली
नागपूर, २ ऑगस्ट / प्रतिनिधी

जुलैच्या पहिल्या पंधरवडय़ात दमदार बरसलेला पाऊस आता पेरण्या आटोपल्यावर बेपत्ता झाल्याने

 

शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यातच सोयाबीन व इतर पिकांवर अळ्यांनी आक्रमण केल्याने ही पिके धोक्यात आली आहेत.
यंदा पावसाने दगा दिल्याने केवळ विदर्भच नव्हे तर, देशपातळीवरच धान्योत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सध्याही बाजारपेठांमध्ये धान्याचे दर चढलेलेच असून नागरिक महागाईच्या नावाने शिमगा करीत आहेत. यंदा सर्वत्रच सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. विदर्भातही पावसाचे उशिरा आगमन झाले. त्यामुळे पेरण्याही लांबल्या. पंधरवडय़ापूर्वी विदर्भात सर्वत्र दमदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्साहात पेरणीची कामे आटोपली. आता पावसाची गरज असताना मात्र त्याने दडी मारली आहे. श्रावणाचे दहा दिवस उलटले तरी श्रावणसरी कुठेच दिसत नाहीत. विदर्भात दाटलेले ढगही एवढय़ात पसार झाले असून श्रावणातल्या शिरव्यालाही शेतकरी महाग झाला आहे. शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा असताना वातावरण कोरडे आहे. उलट कडक उन्हं पडत असून उकाडय़ाने जोर काढला आहे. उन्हामुळे उगवू लागले बियाणे, रोपटी करपून जात असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.
पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवणार असून पिकांना जीवदान कसे मिळेल, पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न कसा सोडवावा, असे प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. पावसाचा पत्ता नाही. मात्र, काही भागात आकाश ढगाळलेले राहत असल्याने पिकांवर रोग आले असून उंट अळी सोयाबीनची पाने खाऊन फस्त करीत आहे. पाऊस नसल्याने शेंडे पोखरणाऱ्या व पाने गुंडाळणाऱ्या अळ्यांचा प्रश्नदूर्भाव वाढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. विदर्भात नागपूर वगळता अन्यत्र पावसाने सरासरी गाठलेली नाही. विविध सिंचन प्रकल्पांमध्ये अजूनही क्षमतेइतका पाणीसाठा झालेला नाही. यंदा पावसाचे उशिरा का हाईना आगमन झाले. त्यामुळे शेतकरी दुष्काळाच्या संकटातून बचावला. आता ऐन पेरण्यानंतर पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यावर पुन्हा संकट घोंगावू लागले आहे. अनेक जिल्हे तहानलेलेच आहेत. वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काळात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाही. मात्र, पावसाचे दिवस अजून संपलेले नाहीत. सध्या पिकांसाठी पाण्याची अत्यंत निकड असून या पावसावरच शेतीचे भवितव्य ठरणार आहे.
संपूर्ण राज्यात मोजक्याच जिल्ह्य़ांमध्ये शंभर टक्के पाऊस झाला असून विदर्भाच्या अनेक जिल्ह्य़ांत ७० ते ८० टक्केच पाऊस झाला आहे.