Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

माहुरझरी परिसरातील अवैध उत्खननाची सीबीआयमार्फत चौकशी करा -उमेश चौबे
नागपूर, २ ऑगस्ट / प्रतिनिधी

नागपूरपासून तेरा कि.मी. वर असलेल्या माहुरझरी परिसरात मोठय़ा प्रमाणात असलेले झुडपी जंगल

 

नष्ट करून त्या ठिकाणी अवैध उत्खनन सुरू असून त्याची सीबीआयमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे यांनी पत्रकार परिषदेत केली.
माहुरझरी परिसरात असलेल्या मौजा भरतवाडा या भागात झुडपी जंगलाची जवळपास १५ एकर जागा कुठल्याही कंत्रटदाराला उत्खनन करण्यासाठी लीजवर देण्यात आली नाही. या संदर्भात भरतवाडाचे सरपंच ज्ञानेश्वर मोरे यांनी ग्रामीण तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली होती. सामाजिक वनीकरणाच्या कार्यक्रमरतगत या जागेवर तीन ते चार हजार सागवान व अन्य झाडे लावण्यात आली होती पण, आता या जागेवर झाडे नष्ट करून खाण बनविण्यात आली आहे. नागपूर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंत्यांनी त्यावेळी जिल्हधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. माहुरझरी ते पुटसुरे या मार्गावर मार्ग क्रमांक १५१ व खसरा क्रमांक १०० या मार्गावर अवैध उत्खनन होत असल्याच्या तक्रार केली होती. त्या विरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयाने कुठलीच कारवाई केली नाही.
या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून उत्खननला स्थगिती दिली पण, स्थगिती दिल्यानंतर उत्खननाचे काम सुरू असल्याचे उमेश चौबे म्हणाले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्यामदेव राऊत यांनी अवैध उत्खननाची तक्रार केली होती परंतु, त्यांची तक्रारीवर कुठलीच चौकशी करण्यात आली नाही. ज्या जमिनीवर उत्खनन केले जाते त्या जमिनी शेतकऱ्यांच्या आहेत. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे याबाबत निवेदन देण्यात आले आहे. अनेक खदान मालकांनी अवैधरिया हे काम केले असून त्यात सरकारचे अनेक अधिकारी व राजकीय नेते सहभागी होऊ शकतात. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी उमेश चौबे यांनी केली. पत्रकार परिषदेला नाना मोरे, विनोद काळे उपस्थित होते.