Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

पुण्याच्या नद्या अजूनही सुधारू शकतात- राजेंद्रसिंह
पुणे, २ ऑगस्ट/खास प्रतिनिधी
पुण्याच्या नद्यांना अतिक्रमणे व प्रदूषणासारख्या अनेक समस्यांनी ग्रासले असले तरी इतर शहरांच्या तुलनेत त्यांची अवस्था बरी असून, ही स्थिती चांगल्याप्रकारे हाताळली तर या नद्या अजूनही सुधारू शकतात, असे मत पाण्याच्या क्षेत्रात कार्य करणारे, मॅगसेसे पुरस्कार विजेते राजेंद्रसिंह राणा यांनी व्यक्त केले.

मोबाईल कंपन्यांच्या अनधिकृत टॉवर्सना अधिकाऱ्यांचेच संरक्षण
पिंपरी, २ ऑगस्ट/प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात मोबाईल कंपन्यांनी उभारलेल्या अनधिकृत टॉवरप्रकरणी पालिका अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्याचे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले. याबाबतचा विषय उपस्थित झाला असता माहिती नसल्याचे कारण देत अधिकाऱ्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत अधिकारीवर्गाने कानावर हात ठेवले.स्थायीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रामदास कुंभार यांनी हा विषय आज पुन्हा उपस्थित केला. अध्यक्ष ज्ञानेश्वर भालेराव यांच्यासह जगदीश शेट्टी, राजेश पिल्ले, गणेश भोंडवे, भाऊसाहेब सुपे आदींनी या विषयावरून प्रशासनास धारेवर धरले. मात्र संबंधित अधिकाऱ्यांना या विषयावर उत्तरे देता आली नाहीत. याबाबतची माहिती आपल्याकडे नाही, असे सांगत आठ दिवसांची मुदत त्यांनी मागितली. प्रत्यक्षात गेल्या तीन ते चार महिन्यांपासून हा विषय गाजतो आहे.

जाहिरात कमानींवरील बंदीने मंडळांचे अर्थकारण धोक्यात
विशेष प्रतिनिधी, पुणे, २ ऑगस्ट

सुरक्षिततेच्या कारणाने पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांच्या जाहिरात कमानींवरच बंदी घातल्याने मंडळांचे अर्थकारणच धोक्यात आले असून उत्सव साजरा कसा करायचा, असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे. हे निर्बंध दूर झाल्याशिवाय उत्सव साजरा करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया मंडळांचे पदाधिकारी देत आहेत.

महापौरांना चार महिन्यांची मुदतवाढ
पिंपरी, २ ऑगस्ट / प्रतिनिधी

राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक आणि त्यासाठी लागू करण्यात येणाऱ्या आचारसंहितेमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या महापौरांना चार महिन्यांची मुदतवाढ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतचा अध्यादेश राज्यशासनाने ३१ जुलैला काढला असून त्या तारखेपासून ही मुदतवाढ लागू करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र मेडिकल फाउंडेशनच्या विरोधात बेमुदत उपोषण
पुणे, २ ऑगस्ट/प्रतिनिधी

कामगारांना सन्मानपूर्वक परत कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी बहुजन कर्मचारी कामगार संघटनेतर्फे गेल्या सात दिवसांपासून महाराष्ट्र मेडिकल फाउंडेशनच्या विरोधात बेमुदत उपोषण सुरू आहे. संघटनेचे मनोरमा शिंदे, मंजू म्हस्के, संगीता भोसले, राहुल शिंदे, शुभलक्ष्मी मिसाळ या कर्मचाऱ्यांनी गेल्या सात दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण पुकारले आहे. मागण्या मान्य न झाल्यास कामगार उपायुक्त कार्यालयासमोरही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत कांबळे यांनी दिला आहे.

ऊस दरासाठी शेतकरी परिषद
पुणे, २ ऑगस्ट / प्रतिनिधी
शेतक ऱ्यांना उसाला प्रतिटन किमान दोन हजार रुपये भाव मिळावा. या मागणीसाठी येत्या ९ ऑगस्ट रोजी राहता (शिर्डी) येथे शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या परिषदेत दुधाला गायी, म्हशीचे असा भेदभाव न करता प्रतिफॅट चार रुपये लिटर भाव मिळाला पाहिजे, गव्हाप्रमाणे कांदा, ज्वारी, बाजरी, मका आणि भात यांना प्रतिक्विंटल किमान ११०० रुपये हमी भाव मिळाला पाहिजे अशा प्रकारच्या मागण्या या वेळी मांडण्यात येणार आहेत, असे पाटील यांनी सांगितले.

चिमणराव काटे यांचे निधन
पिंपरी, २ ऑगस्ट / प्रतिनिधी

दापोडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चिमणराव ज्ञानोबा काटे (वय - ६९) यांचे अल्पशा आजाराने रविवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, चार मुले, चार भाऊ, चार बहिणी असा मोठा परिवार आहे. पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक चंद्रकांत काटे यांचे ते बंधू होत. तसेच पिंपरी-चिंचवडच्या माजी नगरसेविका माई काटे यांचे ते दीर होत. दापोडी येथील स्मशानभूमीत काटे यांचा अंत्यविधी झाला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

चव्हाण रुग्णालयातील दूरध्वनी सेवा ठप्प
पिंपरी, २ ऑगस्ट / प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाची दूरध्वनी व लिफ्ट सेवा आज बंद पडल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे मोठय़ा प्रमाणात हाल झाले. चव्हाण रुग्णालयातील अंतर्गत दूरध्वनी सेवा व लिफ्ट सेवा शनिवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून ठप्प झाली. रुग्णालयात अंतर्गत तीस दूरध्वनी क्रमांक आहेत. हे दूरध्वनी क्रमांक तांत्रिक बिघाडामुळे बंद झाले. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची व नातेवाईकांचे तसेच पोलिसांचे मोठे हाल झाले. यामध्ये परगावच्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. अपघात, मारामाऱ्या यांची माहिती देण्यासाठी रुग्णालयातील पोलिसांना सातत्याने बाहेर जावे लागत होते. याबाबत बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले.

बाबू गेनू जलाशयात अद्याप निम्मेच पाणी
मंचर, २ ऑगस्ट/वार्ताहर

आंबेगाव तालुक्याची कृषी पंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या हुतात्मा बाबू गेनू जलाशय अर्थात डिंभे धरण १ ऑगस्ट २००९ अखेर निम्मे भरले असले तरी लाभक्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा ओसरल्याने धरणाच्या पाणीसाठय़ाचा वेग थांबला आहे. रिमझिम पाऊसही थांबल्याने बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागत आहेत. संपूर्ण दगडात बांधकाम केलेल्या डिंभे धरणाची पाणी साठवणूक क्षमता १३.५० टीएमसीइतकी असून यंदाच्या पावसाळय़ात १ जुलैअखेर धरणात ५१ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मागील आठवडय़ात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस पडल्याने पाण्याची बऱ्यापैकी वाढ झाली. परंतु गेल्या पाच-सहा दिवसांत पडत असलेला रिमझिम पाऊसदेखील उघडल्याने शेतकऱ्यांना पुन्हा चिंता वाटू लागली आहे.