Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

राज्य

हाफकीन पुन्हा सुरू होणार!
सुनील माळी, पुणे, २ ऑगस्ट

पर्यावरणवादी कार्यकर्त्यां मनेका गांधी, तसेच अन्न व औषध प्रशासनाने आक्षेप घेतल्याने बंद पडलेले सरकारी हाफकीन महामंडळातील साप, िवचवाच्या विषावरील इंजेक्शनचे, तसेच रेबीज-धनुर्वाताविरोधातील इंजेक्शनचे उत्पादन येत्या दोन महिन्यांत पुन्हा सुरू होणार आहे. यामुळे या इंजेक्शनचा सध्या भासणारा तुटवडा भरून निघणार आहे. ही इंजेक्शन तयार करण्यासाठी प्रामुख्याने घोडय़ांच्या रक्ताचा वापर केला जातो. घोडय़ांचे रक्त वारंवार काढण्यात येते. हे घोडे योग्य प्रकारे ठेवण्याची गरज व्यक्त करून मनेका गांधी यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर ‘कमिटी फॉर क्रुएल्टी फॉर अ‍ॅनिमल्स’च्या सदस्यांनी भेट देऊन शिफारशी केल्या. त्यांचे पालन झाल्यावर उत्पादन काही काळासाठी सुरू करण्यात आले.

अर्नाळा समुद्रात बुडून पर्यटकाचा मृत्यू
ठाणे, २ ऑगस्ट/प्रतिनिधी

विरारजवळील अर्नाळा समुद्रकिनारी सहलीला गेलेल्या अंधेरी येथील श्रीहरी सोनकांबळे (१५) या मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी ४ वाजता घडल्याचे विरार पोलिसांनी सांगितले. श्रीहरी व त्याचे आठ मित्र मिळून अर्नाळा येथे सहलीसाठी गेले होते. समुद्राच्या पाण्यात सर्वजण पोहण्यासाठी उतरले असता श्रीहरी व त्याचा दुसरा मित्र प्रदीप कांबळे हे लाटांच्या हेलकाव्यांनी खोल समुद्रात खेचले गेले. प्रदीपने पोहत बाहेर येऊन कसेबसे आपले प्राण वाचविले. पण श्रीहरी मात्र पाण्यात बुडाला. त्याचा शोख घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. अर्नाळा येथील समुद्रकिनाऱ्यानजीक रात्रीच्या वेळी चोरून रेती उपसा करण्याचे काम मोठय़ा प्रमाणावर चालते. त्यामुळे समुद्रात मोठ-मोठे खोल खड्डे तयार झाले आहेत. भरतीचे पाणी त्यात शिरल्याने या खड्डय़ात अडकून पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्याचे अर्नाळा ग्रामपंचायतीच्या एका सदस्याने सांगितले. अर्नाळा येथील रेती उत्खनन बंद करावे, अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.

ठाणे-बेलापूर पट्टय़ात आता इंडस्ट्रियल टाऊनशिप
नारायण राणे यांची घोषणा
नवी मुंबई, २ ऑगस्ट/प्रतिनिधी

ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्टयातील उद्योजक आणि नवी मुंबई महापालिकेत मागील एका दशकाहून सुरु असलेल्या हद्दीच्या वादात उद्योजकांच्या पारडय़ात आपले वजन टाकत राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज नवी मुंबईत स्वतंत्र्य औद्योगिक वसाहत उभारण्याची घोषणा केली. ठाणे-बेलापूर औद्योगिक पटय़ास औद्योगिक वसाहतीचा दर्जा देण्याची प्रक्रिया वेगाने सुरु करण्यात येईल, तसेच येत्या सहा महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येईल, असे राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीतील लघु उद्योजकांच्या संघटनेने यावर्षी २५ व्या वर्षांत पदार्पण केले आहे. यानिमीत्ताने या संघटनेने तयार केलेल्या वेबसाईटचे उद्धाटन आज राणे यांच्या हस्ते वाशी येथीस रघुलिला मॉल येथील सभागृहात करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह-कार्यकारी अधिकारी राधेश्याम मापलवार, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त विजय नाहटा, ठाणे-बेलापूर लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष किरण चुरी, संजय मेहता आदी मान्यवर उपस्थित होते. तब्बल चार तासांहून अधिक काळ चाललेल्या या कार्यक्रमात नवी मुंबई औद्योगिक पट्टयातील लघु तसेच मध्यम उद्योजकांनी आपले गाऱ्हाणे उद्योगमंत्र्यांपुढे मांडत स्वतंत्र्य इंडस्ट्रीयल टाउनशिपची जोरकसपणे मागणी केली. औद्योगिक पट्टयातील खड्डेमय रस्ते, तुंबलेले नाले, कचऱ्यांचे ढीग याचे प्रदर्शन एका चित्रफीतीद्वारे राणे यांच्यापुढे यावेळी मांडण्यात आले. सलग तीन तास सुरु असलेल्या या मागणीसत्रानंतर राणे यांनीही उद्योजकांची बाजू उचलून धरत ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्टयाला औद्योगिक वसाहतीचा दर्जा देण्याची घोषणा केली. यासंदर्भातला अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती असला, तरी आचारसिहता लागण्यापुर्वी याविषयीची कार्यवाही सुरु होईल, असेही राणे यांनी स्पष्ट केले. सध्या राज्यात भाषिक वाद उभे केले जात असले, तरी महाराष्ट्राच्या उद्योगांच्या विकासात सर्वभाषिकांचे असलेल्या योगदानाचा राणे यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला.