Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

हाफकीन पुन्हा सुरू होणार!
सुनील माळी, पुणे, २ ऑगस्ट

पर्यावरणवादी कार्यकर्त्यां मनेका गांधी, तसेच अन्न व औषध प्रशासनाने आक्षेप घेतल्याने बंद पडलेले सरकारी हाफकीन महामंडळातील साप, िवचवाच्या विषावरील इंजेक्शनचे, तसेच रेबीज-धनुर्वाताविरोधातील इंजेक्शनचे उत्पादन येत्या दोन महिन्यांत पुन्हा सुरू होणार आहे. यामुळे

 

या इंजेक्शनचा सध्या भासणारा तुटवडा भरून निघणार आहे.
ही इंजेक्शन तयार करण्यासाठी प्रामुख्याने घोडय़ांच्या रक्ताचा वापर केला जातो. घोडय़ांचे रक्त वारंवार काढण्यात येते. हे घोडे योग्य प्रकारे ठेवण्याची गरज व्यक्त करून मनेका गांधी यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर ‘कमिटी फॉर क्रुएल्टी फॉर अ‍ॅनिमल्स’च्या सदस्यांनी भेट देऊन शिफारशी केल्या. त्यांचे पालन झाल्यावर उत्पादन काही काळासाठी सुरू करण्यात आले. मात्र त्यानंतर उत्पादनाचा उच्च दर्जा राखण्याबाबतचे काही आक्षेप अन्न आणि औषध प्रशासनाने घेतले. त्यामुळे पुन्हा उत्पादन बंद पडले. आता या प्रकल्पाची नव्याने उभारणी करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून, येत्या दोन महिन्यांमध्ये उत्पादन सुरू होईल, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष शंकरवार यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.हा प्रकल्प पुन्हा सुरू झाल्यामुळे सर्प आणि िवचवाच्या विषाविरुद्ध वापरायची प्रतिजैविके (सीरम), धनुर्वात-घटसर्प या रोगांविरुद्ध वापरायच्या लशी (व्हॅक्सिन) यांचे उत्पादन सुरू होणार आहे.
सर्पविषावरील इंजेक्शनचा सध्या तुटवडा भासतो. ही गरज खासगी कंपन्यांच्या उत्पादनाकडून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र सरकारी रुग्णालयांमध्ये सरकारी प्रकल्पातील उत्पादनांचाच प्रामुख्याने वापर केला जातो. त्यामुळे हाफकीनमधील उत्पादन पुन्हा सुरू होण्याला विशेष महत्त्व देण्यात येत आहे. मुंबई येथे मुख्यालय असणाऱ्या ‘हाफकीन’च्या िपपरी प्रकल्पात हे उत्पादन सुरू होईल.राज्यात सर्पविषाच्या इंजेक्शनच्या सुमारे दोन लाख वायल्सची गरज दरवर्षी सरकारी रुग्णालयांना लागते. िवचवाच्या विषावरील इंजेक्शनची वार्षिक गरज पंधरा ते वीस हजार वायल्सची असून, हाफकीनकडून सुमारे वीस हजार वायल्स उत्पादन होऊ शकते. िवचवाच्या विषावरील इंजेक्शनचे उत्पादन मध्यंतरी बंद पडले असले तरी त्यांचा जादा साठा अद्यापपर्यंत पुरला आहे. मात्र आता तो संपत आला असून, ऑक्टोबरच्या दरम्यान होणाऱ्या भातकापणीच्या वेळेस पुन्हा आणखी इंजेक्शन लागणार आहेत. तोपर्यंत हाफकीनचे उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे.
हाफकीनच्या िपपरी येथील प्रकल्पाच्या आधुनिकीकरणाचे काम सध्या वेगात सुरू असून, ते दोन महिन्यांत पूर्ण होईल. या आधुनिकीकरणासाठी सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये खर्च आला आहे. या उत्पादन प्रक्रियेसाठी सध्या चारशे घोडे वापरण्यात येत असून, ही संख्या लवकरच आठशेपर्यंत वाढविण्यात येईल. या कामासाठी चांगले घोडे लागतात आणि ते प्रामुख्याने लष्कराकडून घेतले जातात. मात्र लष्करातील घोडय़ांचा वापर कमी झाल्याने त्यांच्याकडून होणारा घोडय़ांचा पुरवठा कमी झाला आहे. खासगी बाजारात तितके चांगले घोडे मिळत नसल्याने त्यांचा शोध घ्यावा लागणार आहे.सर्पदंशावर विषनाशक प्रतिजैविकांचा म्हणजे सीरमचा वापर करण्यात येतो, तर पिसाळलेला कुत्रा चावला तर रेबीज हा रोग होऊ नये, यासाठी प्रतिजैविके (सीरम) आणि लस (व्हॅक्सिन) अशा दोन्हींचा वापर करण्यात येतो. लस दिल्यानंतर शरीरात प्रतिकारशक्ती म्हणजे प्रतिजैविके तयार होण्यास वेळ लागतो. तोपर्यंत प्रतिजैविके म्हणजे सीरम दिल्याने जंतू मरण्यास मदत होते.