Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

क्रीडा

शिवछत्रपती पुरस्कार वितरण सोहळा
युवा पिढीला खेळाकडे आकर्षित करण्याची गरज - राज्यपाल एस. सी. जमीर
मुंबई, २ ऑगस्ट/ क्री.प्र.

देशाच्या गुणवत्तावान क्रीडापटूंना दर्जेदार सरावाच्या सुविधा, दर्जेदार क्रीडासाहित्य आणि श्रेष्ठ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. भाजीपाला विकण्यापर्यंत पाळी त्यांच्यावर येऊ नये याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. ज्यांनी खेळासाठी आयुष्य वेचले त्यांच्यावर गरीबीत आयुष्य काढण्याची वेळ येऊ नये. ही परिस्थिती नाही तर आपण युवा पिढीला खेळाकडे कसे आकर्षित करणार? त्यांना कोणता संदेश देणार? अशा घणाघाती शब्दांच्या आघाताने राज्यपाल एस. सी. जमीर यांनी महाराष्ट्राच्या क्रीडारसिक समुदायाला मंत्रमुग्ध केले.

बीसीसीआय खेळाडूंच्या पाठिशी
‘व्हेअर अबाऊट’ कलमाला खेळाडूंसह बोर्डाचाही विरोध
मुंबई, २ ऑगस्ट/ क्री. प्र.

नव्या उत्तेजक प्रतिबंधक नियमावलीमुळे निर्माण झालेल्या वादावर चर्चा करण्यासाठी आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय)अधिकाऱ्यांनी तातडीची बैठक बोलवली होती. बैठकीमध्ये या नियमावलीतील काही कलमे आपल्या खासगी बाबींवर आक्रमण करणारी असल्यामुळे काही भारतीय क्रिकेटपटूंनी ही नियमावली स्वीकारण्यास नकार दिला होता आणि आज यावर बीसीसीआयने खेळाडूंना पाठिंबा दर्शविला आहे. अन्य राष्ट्रांनी वाडाची सर्व कलमे मान्य केली असून या निर्णयामुळे बीसीसीआय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमध्ये कलगीतुरा रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

मॅक् कलमचा आयपीएलला रामराम
ख्राईस्टचर्च, २ ऑगस्ट / पीटीआय

न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार होण्यासाठीच आयपीएलच्या पुढच्या पर्वात सहभागी न होण्याचा निर्णय आघाडीचा खेळाडू ब्रेन्डेन मॅक् कलम याने घेतला आहे. त्याच्या या निर्णयामुळे त्याला घसघशीत मानधनाला मुकावे लागणार आहे. डॅनियल व्हेटोरी हा कर्णधार म्हणून यशस्वी ठरला आहे. त्याने निवड समितीचे लक्ष स्वत:कडे वेधले आहे. असे असले तरी भविष्यात ही जबाबदारी पेलायला आवडेल आणि मला ती संधी मिळेल,असा विश्वास मॅक्कलम याने ‘संडे न्यूज’ शी बोलताना व्यक्त केला. मॅक्कलम प्रमाणे न्यूझीलंडच्या अनेक खेळाडूंनीसुद्धा आयपीएल आणि इतर स्पर्धामध्ये सरमिसळ झाल्याने आयपीएलमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

संदीपकुमार, कविता राऊत विजेते
ठाणे महापौर वर्षां मॅरेथॉन
ठाणे, २ ऑगस्ट/प्रतिनिधी

ठाणे महापालिकेने आयोजित केलेल्या २० व्या महापौर वर्षां मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात मध्य रेल्वेच्या संदीपकुमार याने तर महिला गटात नाशिकच्या भोसले साई सेंटरची कविता रामदास राऊत हिने विजेतेपद पटकावले. राज्यभरातील हजारो स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या स्पर्धेतील विजेत्यांना पाच लाखांची बक्षीसे देण्यात आली. वरूणराजा आणि सर्वसामान्य ठाणेकरांचा फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी खेळाडूंचा मोठय़ाप्रमाणात सहभाग लाभलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात ‘छत्रपती शिवाजी’ या लोकप्रिय मालिकेत शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून झाली.

आनंद आऊट
मैंझ, (जर्मनी), २ ऑगस्ट, वृत्तसंस्था

विश्वनाथन आनंद याला येथे चालू असलेल्या जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेबाहेर पडावे लागले आहे. या स्पर्धेचे अकरा वेळा विजेतेपद मिळविलेल्या आनंद याला या वर्षी प्राथमिक फेऱ्यांमध्ये फक्त अडीच गुण मिळविता आले. प्राथमिक फेऱ्यांमध्ये त्याला तीन पैकी दोन लढती गमवाव्या लागल्या. अंतिम फेरी गाठण्यासाठी त्याला उर्वरित सामने जिंकणे आवश्यक होते. मात्र त्याचे उर्वरित तीनही सामने अनिर्णित राहिले. अडीच गुण मिळविलेल्या आनंदला अखेर तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. आर्मेनियाचा लेव्हन अ‍ॅरोनियन हा पहिल्या तर रशियाचा इयान नेपोनिअ‍ॅशचि हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला. अ‍ॅरोनियनविरुद्धच्या लढतीत काळ्या सोंगटय़ांसह खेळणाऱ्या आनंद याला नेहमीची सफाई दाखविता आली नाही. अंतिम फेरी गाठण्याचे आनंद याचे स्वप्न या लढतीवेळीच भंगले.

‘वाडा’च्या नियमांचा फायदा खेळाडूंनाच- इयान चॅपेल
मेलबोर्न, २ ऑगस्ट/ वृत्तसंस्था

‘वाडा’च्या नियमांबाबत खेळाडूंना वाटणारी भीती सार्थ असली तरी त्याचा फायदा शेवटी खेळाडूंनाच वाढीव मानधनाच्या रूपाने मिळणार आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार इयान चॅपेल याने व्यक्त केले आहे. ‘वाडा’च्या अटींबाबत खेळाडूंना आणि वेगवेगळय़ा देशांच्या क्रिकेट संघटनांना वाटणारी भीती मी समजू शकतो. अशा प्रकारची माहिती मागविणे म्हणजे खेळाडूंच्या खासगी आयुष्यात डोकावण्यासारखेआहे. मात्र क्रिकेटमध्ये अमली पदार्थ सेवनविरोधी नियमावली काटेकोरपणे राबविली न गेल्यास या खेळातही अमली पदार्थ सेवनाची विषवल्ली पाय पसरू शकते. बेसबॉलच्या खेळाडूंबाबत असे घडलेले आहे, असे चॅपेल याने क्रिकइन्फोच्या संकेतस्थळाशी बोलताना सांगितले.

ऑस्ट्रलिया २ बाद ८०
एजबस्टन, २ ऑगस्ट/ वृत्तसंस्था

येथे सुरू असलेल्या अ‍ॅशेस मालिकेतील तिसऱ्या सामन्याच्या चौथ्या दिवशी अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा ऑस्ट्रेलियाची २ बाद ८० अशी अवस्था होती. यावेळी शेन व्ॉटसन (नाबाद ३२) आणि मायकेल हसी (नाबाद १२) खेळत होते. दुसऱ्या दिवशी दमदार सुरूवात करणाऱ्या इंग्लंडचा पहिला डाव आज ३७६ धावांमध्ये आटोपला.