Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

व्यक्तिवेध

भारत-अमेरिका यांच्यात अणुऊर्जाविषयक करारासंबंधात अमेरिकेत चर्चा चालू असताना एका भारतीय अधिकाऱ्याने पडद्यामागे ज्या हालचाली केल्या, त्या सर्वानाच चकित करणाऱ्या होत्या. हा अधिकारी परराष्ट्र खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत वॉशिंग्टनला गेला नव्हता. कार्नेजी सेंटरमध्ये त्याच वेळी असणाऱ्या एका परिषदेच्या निमित्ताने तो तिथे होता. त्या अधिकाऱ्याचे नाव आहे, डॉ. एस. जयशंकर. जुलै २००५ आणि मार्च २००६ मध्ये अमेरिका आणि भारत यांच्या दरम्यान झालेली चर्चा आणि १२३ कराराविषयीचा परस्परांचा दृष्टिकोन यातून जून २००७ मध्ये चाललेली ही चर्चा पुढे सरकत नव्हती. बुश प्रशासनातले काही अधिकारी भारताबरोबरच्या कराराविषयी एकदम टोकाच्या विरोधाची भूमिका मांडताना दिसत होते. या वेळी कार्नेजीच्या परिषदेत भाग घेणाऱ्या या अधिकाऱ्याने बुश प्रशासनाशी गुप्त बोलणी करून भारताला काय हवे आणि काय नको, याविषयी आपली स्पष्ट भूमिका मांडली. भारताला या करारात पूर्ण पारदर्शकता हवी आणि युरेनियमवर फेरप्रक्रिया करायचा अधिकारही हवा, असे डॉ. जयशंकर यांनी अमेरिकन अधिकाऱ्यांना बजावले

 

आणि हा करार पुढे सरकला. आम्ही १९६४ पासून युरेनियमवर प्रक्रिया करतो आहोत आणि आता तुम्ही आम्हाला हा अधिकार नाकारू पाहता आहात, हे योग्य नाही, असे जयशंकर यांनी त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले आणि ही चर्चा पुढे मार्गी लागली. ही चर्चा रेटण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले. त्यात जर त्यांना अपयश आले असते तर सारी चर्चाच फिसकटली असती. सिंगापूरमध्ये भारताचे राजदूत म्हणून जयशंकर यांनी यापूर्वी काम पाहिले आणि शनिवारी त्यांनी चीनमध्ये भारताच्या राजदूतपदाची सूत्रे हाती घेतली. सिंगापूरमध्ये राजदूतपदाचे काम पाहण्यापूर्वी त्यांनी जपान, श्रीलंका, हंगेरी, रशिया आदी देशांमध्ये काम पाहिले आहे. अमेरिकेतही भारतीय वकिलातीत त्यांनी काम केले आहे. डॉ. शंकरदयाळ शर्मा राष्ट्रपतिपदी असताना डॉ. जयशंकर हे त्यांचे माहिती सचिव होते. अमेरिकेचे तेव्हाचे परराष्ट्र खात्याचे उपमंत्री निकोलस बर्नस यांनी भारताने अणुऊर्जा करारात स्वत:वर बंधने घालून घ्यायला हवीत, अशी भूमिका घेतली असताना त्यांना विरोध करून त्यांना दोन पावले मागे जायला भाग पाडायचे धारिष्टय़ जयशंकर यांनी दाखविले. जयशंकर हे मुत्सद्देगिरीत कुठेही कमी नाहीत. परराष्ट्र मंत्रालयात काम करण्यापूर्वी ते १९७७ मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत दाखल झाले. डॉ. जयशंकर हे राज्यशास्त्रात एम. ए. असून त्यांनी ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ या विषयावर डॉक्टरेट मिळविली आहे. चीनमध्ये असणाऱ्या भारतीय राजदूत निरुपमा राव आता परराष्ट्र सचिवपदी दाखल होत असल्याने त्यांच्या जागी आता जयशंकर दाखल होत आहेत. निरुपमा राव यांच्यापूर्वी चीनमध्ये राजदूतपदी शिवशंकर मेनन होते. ते इस्लामाबादमध्येही होते. मेनन यांच्या निवृत्तीनंतर निरुपमा राव त्यांच्याजागी नियुक्त झाल्या. राव जेव्हा परराष्ट्र सचिवपदावरून निवृत्त होतील, तेव्हा कदाचित जयशंकर हे परराष्ट्र सचिवही होतील. जयशंकर यांना जपानी, हंगेरियन आणि रशियन या भाषाही अस्खलित येतात. त्यांच्या पत्नी क्योटो या जपानी आहेत. जयशंकर यांनी परराष्ट्र मंत्रालयात अमेरिकेविषयीचा विभाग सांभाळला आहे. कोणत्याही प्रश्नाची विचारपूर्वक सोडवणूक करायची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांविषयी अतिशय अभ्यासपूर्ण लेखन करणारे के. सुब्रह्मण्यम यांचे जयशंकर हे चिरंजीव होत. के. सुब्रह्मण्यम हे पूर्वी भारतीय प्रशासकीय सेवेत होते. सुब्रह्मण्यम हे त्यांच्या अमेरिकाविरोधी भूमिकेबद्दल काही काळ परिचित होते. आपल्या चिरंजीवांनी आपलीच भूमिका स्वीकारायला हवी, असे नाही, हे त्यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे.