Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

विविध

पाकिस्तानमध्ये इमारत कोसळून २४ ठार
कराची २ ऑगस्ट/पी.टी.आय.

येथील लिया बाजार परिसरात पाच मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत महिला आणि लहान मुलांसह २४ जण ठार झाले. शुक्रवारी अतिपावसामुळे या इमारतीची भिंत खचली होती. शनिवारी ही इमारत कोसळली त्यावेळी त्यात असणारे रहिवाशी ढिगाऱ्यामध्ये गाडले गेले. ढिगाऱ्यामधून २४ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, मृतांची संख्या आणखी वाढू शकते, अशी भीती सरकारी अधिकारी मसूद आलम यांनी व्यक्त केली.

भारतासोबत सर्व मुद्यांवर चर्चेसाठी पाकिस्तान तयार - गिलानी
इस्लामाबाद, २ ऑगस्ट/पी.टी.आय.

कोणत्याही प्रश्नाबाबत युद्ध हा उपाय नसून भारतासोबत काश्मीरसह सर्व महत्त्वपूर्ण मुद्दय़ांवर चर्चा करण्यास पाकिस्तान तयार आहे, असे प्रतिपादन पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी केले. उभय देशांमधील नागरिकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी भारत आणि पाकिस्तानमधील सर्व प्रश्नांना सोडवणे अत्यंत महत्त्वपूर्ण बनले असल्याचे मतही त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.

लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूचे गूढ कायम राहणार
शवविच्छेदनाबाबत माहिती उपलब्ध नाही
नवी दिल्ली, २ ऑगस्ट/पीटीआय

दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा १९६६ मध्ये रशियात संशयास्पद परिस्थितीत जो मृत्यू झाला होता, त्यानंतर त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन (उत्तरीय तपासणी) करण्यात आले होते काय, हा प्रश्न अनुत्तरितच राहणार आहे. दिल्ली पोलिसांना माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत याबाबत विचारणा करण्यात आली होती, पण माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूबाबत कुठलीच माहिती उपलब्ध नसल्याचे त्यांनी उत्तरात स्पष्ट केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने मात्र याबाबत अधिक स्पष्ट उत्तर दिले असून रशियात लालबहादूर शास्त्री यांचे शवविच्छेदन करण्यात आले नव्हते असे म्हटले आहे.

बुटासिंग सीबीआय चौकशीला तयार
नवी दिल्ली, २ ऑगस्ट / पी.टी.आय.

लाच प्रकरणी मुलाला अटक झाल्यानंतर अनुसुचित जाती-जमातीच्या आयोगाचे अध्यक्ष बुटासिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार देण्याच्या मुद्दय़ावर आपण ठाम असल्याचे सांगून पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी आपण चर्चा केल्याचे व चौकशीमध्ये सहकार्य करण्याचे सांगितले असल्याचे स्पष्ट केले. चौकशी योग्य प्रक्रियेने केली गेली तर आपण चौकशी करणाऱ्यांना सहकार्य करू असे स्पष्ट करून पंतप्रधानांनी आपल्याला सकारात्मक पडसाद दिले व अधिक माहिती देण्यास सांगितले, असे सांगून बुटासिंग म्हणाले की, सीबीआय आपल्याला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करीत असून आपण आपल्या पदाचा राजीनामा देणार नाही.

इस्रायलमध्ये ‘गे’ क्लबमध्ये माथेफिरुच्या गोळीबारात दोन ठार, आठ जखमी
तेल अविव, २ ऑगस्ट/पी.टी.आय.

येथील मध्यवर्ती भागात असणाऱ्या एका ‘गे’ क्लबमध्ये माथेफिरु बंदुकधाऱ्याने केलेल्या गोळीबारात दोन ठार तर आठ जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तोंडावर काळा बुरखा घातलेल्या माथेफिरु व्यक्तीने आपल्या ‘अ‍ॅटोमॅटिक’ बंदुकीतून तेल ‘अविव गे अ‍ॅण्ड लेस्बिअन असोसिएशन’च्या इमारतीत असलेल्या क्लबमध्ये शिरून बेछूट गोळीबार केला. यावेळी क्लबमध्ये उपस्थित असलेले तरुण -तरुणी गोळीबाराच्या भक्ष्यस्थानी पडले. जखमींमध्ये सर्व जण अल्पवयीन आहेत. समलैंगिक संबंधांना असलेल्या विरोधातून हा हल्ला झाला असावा असे, वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे. दरम्यान, समलैंगिक व्यक्तींच्या शहरातील इतर क्लब्जना पोलिसांनी अशा प्रकारचे हल्ले होऊ शकतात म्हणून सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

पालवाल-दिल्ली महिलांसाठी लोकल चालू करून ममतादीदींची राखी भेट
नवी दिल्ली, २ ऑगस्ट/पी.टी.आय.

येत्या पाच ऑगस्टला येत असलेल्या रक्षाबंधनानिमित्त हरयाणातील पालवाल ते दिल्ली अशी खास महिलांसाठी लोकल ट्रेन सुरू करून ममतादीदींनी महिलांना राखीची भेट दिली आहे. आठवडाअखेर पालवाल ते दिल्ली आणि पुन्हा दिल्ली ते पालवाल अशी नऊ डब्यांची लोकल ट्रेन आता खास महिलांसाठी चालविण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घोषित केले.
ही लोकल दिल्लीहून सकाळी सुटेल व सायंकाळपर्यंत पुन्हा दिल्लीला येणार असून या लोकलचा प्रवास सुमारे एका तासाचा असेल. पाच ऑगस्टला ममतादीदींच्या हस्ते या लोकलला हिरवा झेंडा दाखविण्यात येईल. या लोकलसोबत रेल्वे महिला पोलिसांचे सुरक्षेचे कडे राहणार असून या लोकलमध्ये अनधिकृतरीत्या घुसणाऱ्यांवर या महिला पोलीस कारवाई करणार आहेत. दिल्ली ते हरयाणापर्यंत अशी लोकल सुरू व्हावी ही येथील महिला वर्गाची गेल्या अनेक वर्षांंपासून मागणी होती.

युरेनियमसंदर्भात भारत २०१३ साली स्वयंपूर्ण होणार - अनिल काकोडकर
कल्पक्कम, २ ऑगस्ट/पीटीआय

अणुऊर्जा प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या युरेनियमसंदर्भात भारत २०१३ साली स्वयंपूर्ण होईल असे अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी आज येथे सांगितले. झारखंडच्या जादुगोडा येथील युरेनियम मिलचा विस्तार करण्यात आला आहे तसेच तुरामदिह येथील युरेनियम मिलचा विस्तार पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे युरेनियमच्या उत्पादनामध्ये वाढ होईल. त्याशिवाय आंध्र प्रदेशमध्ये तुम्मलापल्ले येथे युरेनियमच्या साठय़ांचा शोध घेण्याचे काम सुरू असून तेथून प्रत्यक्ष खनिज प्राप्त होण्यास २०१३ साल उजाडेल. कल्पक्कम येथील इंदिरा गांधी सेंटर ऑफ अ‍ॅटोमिक रिसर्चमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले कर्नाटकाच्या गुलबर्गा येथील गोगी येथेही युरेनियमच्या साठय़ांचा शोध सुरू आहे. हे सर्व शोधकाम पूर्ण होऊन ते प्रकल्प कार्यान्वित झाले की, २०१३ साली भारत युरेनियमच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल.

संपूर्ण झारखंड दुष्काळग्रस्त घोषित
रांची, २ ऑगस्ट/पी.टी.आय.

बिहार राज्याला एका बाजूने पुराचा वेढा पडला असतानाच त्या राज्यालगतच्या झारखंडला मात्र तेथील राज्यपालांनी दुष्काळग्रस्त घोषित केले आहे. यावर्षी झारखंडमध्ये फार कमी पाऊस झाला असून राज्यपालांच्या सल्लागार समितीने राजभवन येथे झालेल्या बैठकीअंती सदर निर्णय घेतला. या आधी याच समितीने झारखंडच्या २४ पैकी ११ जिल्हे दुष्काळग्रस्त घोषित केले होते.

मोहम्मद अली थंगल यांचे निधन
तिरुवअनंतपूरम, २ ऑगस्ट / पी.टी.आय.

इंडियन युनियन मुस्लिम लीगचे केरळमधील अध्यक्ष पनाक्कड मोहम्मद अली शिहाब थंगल यांचे शुनिवारी रात्री निधन झाले. ते ७३ वर्षांंचे होते. केरळमधील काँग्रेसच्या युतीच्या राजकारणात त्यांचा अतिशय मोलाचा वाटा होता. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन, केंद्रीयमंत्री वायलर रवी, इ. अहमद आदींनी श्रद्धांजली वाहिली . अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत जातीय व धार्मिक सलोखा राखण्याच्या कामात त्यांनी मोलाची भूमिका पार पाडली होती. मुस्लिम लीगमध्येही त्यांचा शब्द महत्त्वाचा मानला जात होता.

काश्मीरमध्ये चकमकीत चार अतिरेकी ठार
श्रीनगर :
उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्णात दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या चकमकीत चार अतिरेकी ठार झाल्याची माहिती सुरक्षा प्रवक्त्याने दिली. येथील बंगस खोऱ्यामध्ये लपलेल्या अतिरेक्यांना पकडण्यासाठी शनिवारपासून सुरक्षा दलाने शोधमोहीम उघडली आहे. या दरम्यान सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज मोठी चकमक झाली. सुरक्षादलाने अतिरेक्यांना शरण येण्याचे आवाहन केले मात्र त्यांनी गोळीबार करण्यास सुरू केल्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी सुरक्षा दलानेही गोळीबार केला. या धुमश्चक्रीत चार अतिरेक्यांना ठार करण्यात आले.

चीनमध्ये प्लेगने एकाचा मृत्यू
बीजिंग :
चीनमधील किंघाई प्रांतात न्युमॉनिक प्लेगने एक जण मरण पावला असून ११ जणांना प्लेगची बाधा झाल्याचे स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. झिकेनटान शहर हे या प्लेगचे मूळ ठिकाण असून तेथे तज्ज्ञांचे व वैद्यकीय पथक पाठविण्यात आले आहे.

बौद्ध इसमाची हत्या
पट्टाणी :
संशयित मुस्लिम बंडखोराने एका बौद्ध इसमाची दक्षिण थायलंडच्या पट्टाणी भागात हत्या केल्याचे लष्करी प्रवक्त्याने सांगितले. गेल्या पाच वर्षांत या बंडखोर गटाकडून शेकडो लोकांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. येथील रबर फॅक्टरीत सुरक्षा रक्षक असलेला हा बौद्ध इसम घरी जात असताना मोटारसायकलीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्याला गोळ्या घालून ठार केले.