Leading International Marathi News Daily

मंगळवार, ४ ऑगस्ट २००९

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ‘थोडी खुशी, थोडा गम!
बेमुदत संप अखेर रद्द !

मुंबई, ३ ऑगस्ट / खास प्रतिनिधी
घरभाडे भत्त्यांमध्ये १० ते ३० टक्के वाढ, पुढील १ एप्रिलपासून वाहतूक भत्त्यांत दुप्पट वाढ, ग्रॅच्युइटी मर्यादेत सात लाख रुपयांपर्यंत वाढ तसेच महिलांना प्रसुतीसाठी १८० दिवस रजा, महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग या मागण्या मान्य झाल्याने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आज रात्रीपासून सुरू होणारा बेमुदत संप मागे घेण्यात आला. निवडणुका जवळ आल्याने सर्व घटकांना खुश करण्याचा सपाटा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लावला असून, सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काही प्रमाणात मान्य करून त्यांचीही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबईतील एकमेव हरितपट्टय़ावर डल्ला मारण्याचा डाव
संदीप आचार्य , मुंबई, ३ ऑगस्ट

गोरेगाव येथील ‘आरे’ आरे कॉलनी हा मुंबईतील एकमेव हरितपट्टा असून, शेकडो एकरवर पसरलेल्या या मुंबईच्या ‘ग्रिन नेकलेस’वर डल्ला मारण्याचे प्रयत्न काही शक्तिशाली राजकारण्यांच्या मदतीने केले जात आहेत. यासाठी ‘आरे’ कॉलनीतील आदिवासी पाडे व झोपडपट्टय़ांतील गरिबांच्या नावे ‘एसआरए’ योजना राबविण्याचे काम सुरू आहे. यातूनच ‘आरे’च्या जमिनींवर डोळा असणारे प्रभावशाली लोक या जमिनी आपल्याला मिळाव्या यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी दुग्ध विकास विभागाकडे एकूण ६५ प्रस्ताव आल्याचे विश्वसनीयरीत्या समजते.

विलासराव आणि गोविंदराव राज्यसभेवर बिनविरोध
शिवसेनेची माघार

मुंबई, ३ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

शिवसेनेचे अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी दोन्ही जागांवर भरलेले उमेदवारी अर्ज आज मागे घेतल्याने राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख आणि राष्ट्रवादीचे सरचिटणीस गोविंदराव आदिक यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादीचे रणजितसिंह मोहिते-पाटील यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली होती. शिवसेनेचे अ‍ॅड. नार्वेकर यांनी देशमुख व आदिक या दोघांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्यास अर्धा तासाचा अवधी असताना नार्वेकर यांच्या वतीने शिवसेनेचे आमदार अरविंद नेरकर यांनी माघारीचे पत्र सादर केले.

पुण्यात शाळकरी मुलीचा स्वाइन फ्लूने मृत्यू
पुणे, ३ ऑगस्ट/प्रतिनिधी
लष्कर भागातील सेंट अ‍ॅन्स शाळेतील चौदा वर्षांची रिदा शेख ही मुलगी स्वाइन फ्लूने आज एका खासगी रूग्णालयात दगावली. स्वाइन फ्लूने घेतलेला देशातील हा पहिलाच बळी ठरला आहे. पुण्यात आतापर्यंत शंभरपेक्षा अधिक जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. राज्याचे आरोग्य संचालक डॉ. डी. एस. डाखुरे यांनी याबाबत सांगितले, की रिदा हिला संशयित म्हणून एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची तपासणी करीत असताना तिला स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले. तिचे तपासणी नमुने राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आले. तेथेही स्वाइन फ्लूचेच निदान कायम झाले. तिला नायडू रूग्णालयात हलविण्यात येणार होते, मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला हलविण्यात आले नाही. तिला कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले. त्यानंतर तिला न्यूमोनिया झाला आणि फुफ्फुसांना संसर्गही झाला. तिची प्रकृती आज खूपच खालावत गेली. सायंकाळी पाचच्या सुमारास आज तिचा बळी गेला. याबाबत या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या तपासणीचा आदेश आपण दिल्याचेही डाखुरे यांनी सांगितले.नवी दिल्लीच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेबल डिसिजेस या संस्थेकडेही रिदा शेख हिच्या तपासणीचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आज संप
राज्यातील सर्व विद्यापीठांचा कारभार ठप्प होणार
मुंबई, ३ ऑगस्ट / प्रतिनिधी
सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार वेतनवाढ देण्याच्या मागणीसाठी राज्यातील तीस हजार प्राध्यापक गेल्या वीस दिवसांपासून संपावर गेले असतानाच आता शिक्षकेतर कर्मचारीही उद्या, मंगळवारी एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर जाणार आहेत. त्यामुळे मुंबईसह राज्यातील सर्व विद्यापीठांचा कारभार ठप्प होणार आहे. मुंबई विद्यापीठातील संपाला अधिकारी संघटनेनेही पाठिंबा दिला आहे. सहाव्या वेतन आयोगाबाबत राज्य सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयात विद्यापीठांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबाबत कोणताही उल्लेख केला नसल्याने हा संप पुकारण्यात आला आहे. गेल्या वीस दिवसांपासून चालू असलेल्या प्राध्यापकांच्या संप अधिकच चिघळला आहे. प्राध्यापक व समकक्ष पदांना विद्यापीठ अनुदान आयागाने निश्चित केलेली वेतनश्रेणी व महागाई भत्ता देण्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी केली असली तरी या वेतनश्रेणी व महागाई भत्त्याचे स्वरूप संदिग्ध असून त्यामुळे उच्च-तंत्र शिक्षण क्षेत्रात मोठी उलथापालथ होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारचा निषेध करून आम्ही संप चालूच ठेवत असल्याचे ‘एमफुक्टो’ने म्हटले आहे. १९९१ ते १९९९ या कालावधीत नोकरीस लागलेल्या अधिव्याख्यात्यांना नेट-सेटच्या पात्रतेपासून सूट मिळावी याकरिता राज्य सरकारच्या वतीने विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) व केंद्र सरकारला विनंती करण्यात येईल, असेही टोपे यांनी आश्वासन दिले आहे. परंतु, यूजीसीच्या नियमावलीत ‘एक्झ्मशन’ देण्याची तरतूद आहे, सूट देण्याची तरतूद नाही. त्यामुळे राज्य सरकार शिक्षकांची दिशाभूल करीत असल्याचे ‘एमफुक्टो’ने म्हटले आहे.

क्रिकेटपटूंनी ‘वाडा’चे नियम पाळावेत
क्रीडामंत्र्यांचा बोर्डाला दणका
नवी दिल्ली, ३ ऑगस्ट / वृत्तसंस्था
उत्तेजक सेवन विरोधी संस्थेने (वाडा) क्रिकेटपटूंवर घातलेल्या अटींविरोधात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतलेल्या भूमिकेस केंद्रीय क्रीडा मंत्री एम. एस. गिल यांनी विरोध दर्शविला आहे. ‘ वाडा’ ने घातलेल्या अटींचे क्रिकेटपटूंनी खळखळ न करता पालन करावे, असे गिल यांनी नमूद केले आहे.ते म्हणाले की, उत्तेजक सेवन विरोधी संस्थेकडून घेतल्या जाणाऱ्या चाचण्यांना आपण मान्यता दिली आहे. त्यामुळे त्यांनी या संदर्भात कार्यवाहीसाठी घेतलेल्या निर्णयांना खेळाडूंनी बांधील असले पाहिजे. ‘वाडा’च्या अटींबाबत भारतीय क्रिकेटपटूंनी व्यक्त केलेल्या असंतोषाबद्दल गिल यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. क्रिकेट खेळणाऱ्या बहुतेक सर्व देशांच्या खेळाडूंनी वाडाच्या अटींना मान्यता दिली आहे. असे असताना फक्त भारतीय क्रिकेटपटूंनी त्या विरोधात उभे ठाकावे याचे आश्चर्य वाटते, असे ते म्हणाले. दरम्यान, बीसीसीआयने मात्र, हे गिल यांचे वैयक्तिक मत असू शकते, भारतीय क्रिकेट बोर्ड आणि आयसीसी यांच्यातील या मुद्यात क्रीडामंत्रालयाचा संबंध नाही. भारतीय क्रिकेट बोर्ड आपल्या भूमिकेशी ठाम आहे, असे म्हटले आहे.

सईदच्या याचिकेवरील सुनावणी बेमुदत तहकूब
इस्लामाबाद, ३ ऑगस्ट/पी.टी.आय.
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असल्याचा भारताचा आरोप असणाऱ्या जमात उद् दवा संघटनेचा प्रमुख हाफिझ मुहंमद सईद याच्या सुटकेला आवाहन देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने आज अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली. सईद याच्याविरोधात कोणताही पुरावा नसल्यामुळे त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकत नाही असा पवित्रा गेल्याच आठवडय़ामध्ये पाकिस्तानमधील नेत्यांनी घेतला होता. त्यानंतर २६/११च्या हल्ल्यात सईदचा सहभाग असल्याचे पुरेसे पुरावे पाकिस्तानकडे सुपूर्द करण्यात आले असल्याचे भारताने स्पष्ट केले. त्यानंतर दोनच दिवसांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने याचिकेची सुनावणी पुढे ढकलून कांगावा केला आहे.

सामाजिक कार्यकर्ते दीप जोशी यांना ‘मॅगसेसे’
कौलालंपूर/नवी दिल्ली, ३ ऑगस्ट/पीटीआय
आशियातील नोबेल पारितोषिक समजला जाणारा मॅगसेसे पुरस्कार यंदा भारतातील सामाजिक कार्यकर्ते दीप जोशी यांच्यासह इतर पाच जणांना जाहीर करण्यात आला. जोशी यांनी ग्रामीण समुदायांच्या विकासात मोठे कार्य केले आहे. रॅमन मॅगसेसे अ‍ॅवॉर्ड फाऊंडेशनच्या विश्वस्त मंडळाने म्हटले आहे की, जोशी यांनी ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी नवी दिशा दिली, त्यांच्या कामात शिस्त आणली. ‘हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मला आनंद झाला. पण हा पुरस्कार कुणा एका व्यक्तीचा नाही, तर तो अभिनव कल्पनेला मिळालेला पुरस्कार आहे. ही कल्पना होती ग्रामीण जनतेच्या विकासाची. ग्रामीण भागाच्या विकासासाठी सुशिक्षित लोकांनी तिथे जायला पाहिजे, त्या लोकांच्या कल्याणाची कामे केली पाहिजेत,’ असे बासष्ट वर्षांच्या दीप जोशी यांनी सांगितले.

 

प्रत्येक शुक्रवारी